Marathi Bible Reading | First Sunday of Advent | 28 November 2021

  आगमनकाळातील पहिला रविवार  

२८ नोव्हेंबर २०२१ 

"सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा."
“तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे."



आशा  (Hope ) 

आशेचे किरण घेऊन प्रभू येशू येत आहे. 


यिर्मया संदेष्ट्याने इस्त्राएल आणि यहुदाच्या घराण्यातून धार्मिकतेचा अंकूर फुटेल असा संदेश दिला आहे. प्रभू येशूच्या आगमनाचा तो संदेश होता.  प्रभू येशूने देवाच्या योजनेप्रमाणे देह धारण केला व तारणाची योजना पूर्णत्वास नेली. प्रभू येशूने देवराज्याची शिकवण जगाला दिली आणि त्याप्रमाणे ती पाळण्यास आज्ञापिले. अंतिम समयी प्रभू येशूने अभिवचन दिले की, प्रभू पुन्हा येईल आणि सर्वांचा न्याय निवाडा होईल. प्रभू पुन्हा येईल, ह्या अभिवचनावर आपली सर्वांची श्रद्धा आहे. त्याच्या स्वागतास आम्ही तयार असावे म्हणूनच ख्रिस्तसभेने आपल्याला हा आगमन काळ दिला आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वतः आपल्या शिष्यांना काळाची लक्षणे ओळखण्यास सांगत आहे. प्रभू म्हणतो, “त्याकाळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल." तोच सर्वांचा मुक्तिसमय आहे. मुक्तिसमयाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज  असावे म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, 'सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.'आगमन काळ म्हणजे प्रभूला सामोरे जाण्याची तयारी. ह्या काळात आपण  आतापर्यंत प्रभूच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगत आहोत का, ह्यावर मनन  चिंतन करण्याचा काळ आहे.आपले मन, हृदय आणि संपूर्ण जीवन परिवर्तन करण्यासाठी आपण आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करु या, कारण मुक्तिसमय जवळ आला आहे. 

✝️

पहिले वाचन :यिर्मया ३३: १४-१६
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन ३३:१४-१६ 

“दावीदला धार्मिकतेचा अंकुर फुटेल असे मी करीन.”

प्रभू म्हणतो, “पहा इस्राएलच्या घराण्याला आणि यहुदाच्या घराण्याला जे अभिवचन मी दिले आहे ते पूर्ण करण्याचा काळ जवळ येत आहे

ते दिवस येतील तेव्हा तो काळ येईल तेव्हा राजा होण्यासाठी दावीदच्या एका नीतिमान अंकुराची मी निवड करीन. तो देशात न्यायनीती प्रस्थापित करील त्या काळी यहुदाचा उद्धार होईल येरुशलेम सुरक्षित वसेल 'प्रभूच आमचे नीतिनिधान' ह्या नावाने येरुशलेमला संबोधले जाईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २५:४-५,८-१०,१४
प्रतिसाद :  हे प्रभो, मी तुझ्यासाठी तळमळत आहे.

१) प्रभू, तुझे मार्ग मला दाखव तुझ्या वाटा मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव
 मला वळण लाव. कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.

२) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे 
तो पापी जनांना सन्मार्गाने चालायला शिकवतो. 
नम्र लोकांना न्यायपरायणता दाखवतो, 
गरिबांना आपला मार्ग प्रकट करतो.

३) परमेश्वराच्या आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांना 
प्रभूचे सर्व मार्ग प्रेमपूर्ण आणि विश्वसनीय आहेत. 
त्याचे भय धरणाऱ्यांशी प्रभूचे सख्य असते. 
तो आपला करार त्यांना प्रकट करतो.

दुसरे वाचन थेस्सलनी ३:१२,४:२
वाचक : पौलाचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"ख्रिस्ताच्या आगमनवेळी प्रभूने तुमची अंतःकरणे स्थिर पापविरहित आणि पवित्र करावीत."

बंधुजनहो, जशी आमची प्रीती तुम्हांवर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर आणि सर्वांवर वाढवून विपुल करो, त्याने तुमची अंतःकरणे स्थिर, पापविरहित आणि पवित्र करावीत म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व संतांबरोबर परत येईल त्यावेळी तुम्हाला देव आपला पिता याच्यासमोर निर्दोष असे उभे राहता येईल. बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही त्याप्रमाणेवागत आहात त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी, कारण प्रभू येशूच्या वतीने ज्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे. तू सिद्ध केलेले तारण आम्हांला प्रदान कर. 
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:२५-२८,३४-३६

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे"

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले “आकाशात सूर्य चंद्र आणि तारे ह्यांच्यामध्ये अद्भुत चिन्हे दिसू लागतील, तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभीत होऊन गोंधळात पडतील. भयाने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे गर्भगळीत होतील. आकाशातील शक्ती कंपायमान होतील. त्याकाळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावरून येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे रहा आणि वर पहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे."
“तुम्ही सावध रहा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंत: करणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला फासाप्रमाणे अकस्मात पकडील; कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवायला आणि मनुष्याच्या पुत्राप्रमाणे उभे रहायला समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआगमनकाळाच्या पहिल्या रविवारपासून ख्रिस्तसभा आपल्या नवीन उपासना वर्षाला सुरूवात करीत असते. हा आगमनकाळ दोन टप्प्यात विभागण्यात आलेला असतो. पहिल्या भागात आगमनकाळातील पहिल्या रविवारपासून १६ डिसेंबरपर्यंत ख्रिस्तसभा आपल्या लेकरांना प्रभू येशूच्या द्वितीय आगमनाची पूर्वतयारी करण्याविषयी मार्गदर्शन करीत असते. तर १७ ते २४ डिसेंबरपर्यंत येशूच्या पहिल्या येण्याचा सोहळा (नाताळ, ख्रिस्तजयंती) साजरा करण्याच्या हेतूने त्यांची पूर्वतयारी करीत असते. आजच्या उपासनेतील वाचने आपल्याला येशूच्या पुनरागमनाची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करतात : 
१) निराश न होता आशेने ख्रिस्ताच्या येण्याची तयारी करावी : बाबिलोनच्या हद्दपारीमध्ये दुःखसहन करीत असलेल्या इस्राएल जनतेला यिर्मया संदेष्टा आशेचा किरण दाखवीत आहे. परमेश्वर देव त्यांना एका नवीन जीवनाची देणगी लवकरच देणार आहे. या आशेने त्यांनी प्रतिकूल परिस्थितीला आशेने सामोरे जावे असे तो त्यांना सुचवितो. अशाच आशेने ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहावी. 
२) ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी प्रेमाने आणि शुद्ध हृदयाने करावी : संत पौलने थेस्सलनीकाकरांस लिहिलेले पहिले पत्र हे नव्या करारातील पहिले ख्रिस्ती साहित्य मानले जाते. (इससी सन ५१) तोपर्यंत ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहून लोकांच्या मनात शंका व अधीरता उत्पन्न झालेली काही होती. त्यांनी प्रेमाने व शुद्ध हृदयाने ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करावी असे. संत पॉल सुचवितो. 
३) ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी जागरूकतेने व दक्षपणे करावी : संत लूकने आपले शुभवर्तमान ८०-९० सालादरम्यान लिहिले. तोवर ख्रिस्ती लोकांची श्रद्धा डळमळू लागलेली होती. धार्मिक निर्बंध पाळण्यात शिथिलता आणि ढिलेपणा आलेला होता. काहीजण आपल्या पूर्वीच्या पापी व्यसनांकडे व सवयींकडे वळू लागलेले होते. त्यांनी जागृत राहावे, दक्ष असावे (सरळ उभे राहा, आपली मस्तके उंच करा) असा सल्ला त्यांना देण्यात आलेला आहे. 
आत्मपरीक्षण : ख्रिस्ताचे पुनरागमन आणि आपल्या जीवनातील, कुटुंबातील गतकाळाचे वैभव परत मिळविण्याची इच्छा ह्यांच्यात आपण कसा मेळ घालाल ? चांगले दिवस येण्यासाठी आपण कोणती पूर्वतयारी करीत आहोत ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, सर्वदा तुझ्या आज्ञेत राहून वचनात वाढण्यास प्रेरणा व
कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या