Marathi Bible Reading | Monday 29th November 2021 | First Week of Advent

   आगमनकाळातील पहिला सप्ताह 

सोमवार 

२९ नोव्हेंबर २०२१ 

"शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल."



संत फ्रान्सिस अँटॉनी  फासानी 

आशा  (Hope ) 

आशेचे किरण घेऊन प्रभू येशू येत आहे. 


यशया संदेष्टा तारणाऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये श्रद्धेचा आणि आशेचा दीप प्रज्वलित करीत आहे. यशया  म्हणतो, 'येरुशलेमला उज्वल भवितव्य प्राप्त होईल. सर्व प्रकारचा अंधार नाहिसा होऊन प्रज्वलित अग्निचा प्रकाश येईल. सियोनेतून धर्मशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.'
 येशूजवळ आलेला शताधिपती हा प्रचंड विश्वासाची देणगी लाभलेला माणूस होता. शताधिपतीने आपल्या आजारी चाकराला बरे करण्यासाठी चाकराकडे येण्याची विनंती न करता आपली अपात्रता व्यक्त करीत म्हटले, 'प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.  प्रभू येशूच्या सामर्थ्यावर आणि दयेवर शताधिपतीचा पूर्ण विश्वास होता. सामर्थ्यशाली प्रभूने आपल्या घरी यावे इतका मी योग्य नाही अशी कबुली त्याने दिली. केवळ त्याच्या श्रद्धेमुळेच त्याचा चाकर बरा झाला. प्रभू येशूच्या सामर्थ्यावर आणि दयेवर विश्वास ठेवून शरण जाणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणि चमत्कार घडू शकतात. 

आपण सर्वजण सुद्धा अपात्र असून प्रभू येशूने आपल्याकडे यावे एवढी पात्रता आपल्यात नाही. तरी सुद्धा प्रभू अतीपवित्र ख्रिस्तशरीर संस्कारामध्ये आपल्याकडे येत असतो. प्रभूच्या वचनात, शब्दात, स्पर्शात महान सामर्थ्य आहे. आपली प्रभू वरील श्रद्धा दृढ असायला हवी. ह्या आगमन काळात प्रभूला स्वीकारण्याची तयारी करीत असताना शताधिपतीसारखी आपली श्रद्धा मजबूत बनविण्यासाठी प्रभूला शरण जाऊ या. 

✝️

पहिले वाचन :यशया  २ :१-५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन २:१-५

"प्रभू सर्व राष्ट्रांना परमेश्वराच्या चिरशांतीच्या राज्यात एकत्रित करतो." 

आमोजचा पुत्र यशया याला यहुदा आणि येरुशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा पर्वत, पर्वतांच्या शिखरांवर स्थापण्यात येईल आणि सर्व पर्वतांहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील, देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील, “चला, परमेश्वराने आपले मार्ग आम्हांला शिकवावेत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालावे, म्हणून आपण त्याच्या पर्वताकडे, याकोबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ या.'  कारण सियोनातून धर्मशास्त्र आणि येरुशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. देशोदेशीच्या लोकांचा न्याय करील आणि ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तरवार उचलणार नाही. ते यापुढे युद्धकला शिकणार नाहीत. याकोबच्या घराण्या चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. मेघ आणि रात्रीसाठी प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील. त्याच्या सर्व वैभवावर छत्र असेल आणि दिवसा ऊन लागू नये, सावली मिळावी आणि वादळ आणि पाऊस यापासून रक्षण व्हावे, निवारा आणि आश्रय असावा म्हणून हा मंडप घालण्यात येईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १२२:१-४,८-९
प्रतिसाद :  चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ.

१) “चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ 
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. 
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.

२ ) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी
तू बांधलेली आहेस. इस्रायला घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाने
उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात.

३) माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता 
“तुझ्यामध्ये शांती वसो!” अशी मी प्रार्थना करीन. 
परमेश्वर आमचा देव याच्या मंदिराकरिता 
आणि तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण तुझी कृपादृष्टी आम्हांवर वळव म्हणजे आमचे तारण होईल.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ८: ५-११

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण स्वर्गराज्यात येतील "

येशू कफर्णहूम गावात आला, तेव्हा एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि याचना करू लागला, महाराज, माझा चाकर पक्षघाताने घरात पडून आहे आणि त्याला भयंकर वेदना होत आहेत.
येशू त्याला म्हणाला, “मी येतो आणि त्याला बरे करतो.”
पण तो शताधिपती त्याला म्हणाला, “महाराज, आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही. आपण एक शब्द फक्त उच्चारा म्हणजे माझा चाकर बरा होईल. मी एक हुकमाचा ताबेदार आहे. माझ्या हाताखाली सेवक आहेत. एखाद्याला मी जा म्हणालो, की तो जातो; दुसऱ्याला ये म्हणालो, की तो येतो; चाकराला म्हटले, हे कर, की तो ते करतो."
हे ऐकूण येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येणाऱ्यांना तो म्हणाला “मी तुम्हांला खरे सांगतो, एवढी जबरदस्त श्रद्धा मला इस्राएलातही आढळली नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर स्वर्गराज्यात पंगतीला बसतील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनकालपासून आपण आगमन काळाला सुरुवात केलेली आहे. या आठवड्यात आपण यशया संदेष्ट्याचे वाचन ऐकणार आहोत. जे विखुरलेले लोक आहेत, त्यांना एकत्र करणे ही  मसिहाच्या आगमनाची खूण इस्रायली लोकांमध्ये खूप प्रचलित होती. आपण जुन्या करारात वाचतो की बाबेलचा बुरुज बांधला जात असताना अनेक लोकांची पागांपाग झाली. मात्र पेन्टेकॉस्टच्या सणाच्या दिवशी उतरलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विविध भाषा बोलणारे असंख्य लोक एकत्र झाले. आजच्या पहिल्या वाचनात यशया नेमका हाच संदेश देतो की, परमेश्वराचे मंदिर असलेला पर्वत सर्व पर्वताहून उंच होईल. सर्व लोक तिच्याकडे ओढले जातील. लोकांना फक्त शरण आणणे हे तीचे काम नाही तर त्यांना ओढून घेणे हे तिचे कार्य आहे. यशयाची ही भविष्यवाणी प्रभू येशूमध्ये पूर्ण होईल. येशूच्या प्रेषितकार्यात यहुदी व परराष्ट्रीय एकत्र आले. आजच्या शुभवर्तमानातील जमादार हा इस्राएल बाहेरील होता. येशूमध्ये सर्वजण एकत्र आले. पवित्र मिस्सासाठी जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच मेजाभोवती प्रभू बलिदान साजरं करण्यासाठी एकत्र होतात. आपलं जीवन विखुरलेलं आहे की ख्रिस्ताभोवती केंद्रित झाले आहे ?

प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व श्रद्धेत दृढ बनण्यास मला कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या