आगमनकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार
३० नोव्हेंबर २०२१
ॲन्ड्र्यू (आंद्रेया), प्रेषित
रक्तसाक्षी
"माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन."
रक्तसाक्षी (६०) अॅण्ड्रयू किंवा अंद्रिया (म्हणजे 'मर्द') हा योनाचा मुलगा आणि संत पीटरचा भाऊ होता. गालिलीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक कोळी म्हणून कफर्णहूम येथे तो सुखाचे जीवन जगत होता. प्रभू येशू ख्रिस्ताला योहानने मशीहा असे घोषित करण्यापूर्वी तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचा शिष्य होता. येशूला पाहताच तो सरळ पेत्रकडे गेला आणि कुठल्याही प्रकारचा साक्षीपुरावा न मागता अगदी बालकाच्या विश्वासाप्रमाणे दोघे भाऊ माणसे धरणारे कोळी होण्यासाठी येशूच्या मागोमाग निघाले. अशा प्रकारे अंद्रिया किंवा अॅण्ड्रयू हा प्रभू येशूने केलेला पहिला प्रेषित मानला जातो. पाचारण शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या ज्या वेगवेगळ्या यादया देण्यात आलेल्या आहेत त्या जर निरखून अभ्यासिल्या तर आपल्या असे लक्षात येते की, अॅण्ड्रयूचे नाव चौथ्या क्रमांकावर येते. पहिले तीन शिष्य हे येशूला अतिशय जवळ होते. पेत्र, याकोब आणि योहान.
खुद्द प्रेषितांमध्येसुद्धा संत अॅण्ड्रयूला आदराचे, सन्मानाचे व विशेष अधिकाराचे स्थान होते. जेव्हा काही हेल्लेणी लोकांनी येशूला भेटावे अशी विनंती फिलिप्पकडे केली तेव्हा बेथसैदाचा हा सुपुत्र थेट अंद्रियाकडे जातो. त्यावरून अंद्रिया हा नक्कीच येशूच्या अधिक जवळ होता हे सिद्ध होते.
पुनरुत्थानानंतर संत अॅण्ड्रयू ह्याने पश्चिम आशिया मायनर येथील तुर्कस्थान ह्या ठिकाणी स्किथियन लोकांमध्ये सुवार्ता प्रसार केला. बिझन्टाईन धर्मप्रांताचा विशेष म्हणून संत स्टाकाईज ह्याची नेमणूक खुद्द अॅण्ड्रयू ह्याने केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानंतर संत अॅण्ड्रयू हा मासेदोनिया व ग्रीक ह्या ठिकाणी आपल्या प्रेषितकार्यावर निघून गेला.
निरो राजाच्या काळात ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ करण्यात आला त्याचवेळी पात्रास येथे ३० नोव्हें. इ.स. ६० साली संत अॅण्ड्रयू ह्याला रक्तसाक्षित्वाचे मरण आले. इंग्रजीतील 'एक्स' X ह्या आकाराच्या क्रुसावर त्याचे हातपाय गच्च आवळून करकचून बांधण्यात आले. क्रुसावर खिळे न ठोकता हालहाल करून अशा प्रकारचे मरणदंड देण्याची ही पद्धत अॅण्ड्रयूसाठी वापरण्यात आली. 'एक्स' ह्या आकाराचा क्रूस संत अॅण्ड्रयूचा क्रूस म्हणून प्रसिद्ध आहे. बराच वेळ संत अॅण्ड्रयू ह्या क्रुसावर तळमळत होता. ह्या क्रुसावर भयंकर यातना सहन करीत असतानादेखील तब्बल दोन दिवस त्याने येशूच्या नावाचा जयजयकार केला व त्याला पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना ख्रिस्ताची शुभवार्ता सांगितली. दोन दिवसांनंतर तहानभुकेने व्याकूळ झालेला अॅण्ड्रयू तडफडून मरण पावला.
त्याचा मृतदेह कॉन्स्टॅन्टिनोपल ह्या बिझन्टाईन शहरात आणला गेला आणि तिथे संत लूक व संत तिमथी यांच्या खाचेशेजारी त्याला पुरण्यात आले. इ.स. १२१० मध्ये जेव्हा धर्मयुद्धे लढली गेली तेव्हा धर्मयोद्धयांनी कॉन्स्टेंन्टिनोपल शहर काबीज केले तेव्हा संत अॅण्ड्रयूच्या शरीराचे अवशेष दक्षिण इटलीतील अमाल्फी ह्या ठिकाणी नेले. ते आजवरही ह्याच ठिकाणी ठेवण्यांत आलेले आहेत. भाविक मोठ्या भक्तीभावाने ह्या तीर्थस्थळाला आजवरही भेट देतात.
संत अॅण्ड्रयू हा प्रौढ कुमारिका, कोळी लोकांचा तसेच रशिया व स्कॉटलंड ह्या देशांचा आश्रयदाता संत म्हणून ओळखला जातो.
आपल्या क्रुसाला त्याने प्रणाम केला व म्हटले 'हे चांगल्या क्रुसा तुला प्रणाम! हे स्तुति योग्य क्रुसा! हे अतिप्रिय क्रुसा! मला तुझ्या वेंगेत घे.'
संत ॲन्ड्र्यू प्रौढ कुमारिका आणि कोळी लोकांचा आश्रयदाता संत आहे.
✝️
पहिले वाचन : रोम : १०: ९-१८
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“विश्वास संदेशाने आणि संदेश ख्रिस्ताच्या वचनाद्वारे प्राप्त होतो."
येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो आणि जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, “त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.” यहूदी आणि हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण “जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”
तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत !” असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, "हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?” ह्याप्रमाणे विश्वास संदेशाने आणि संदेश ख्रिस्ताच्या वचनाद्वारे प्राप्त होतो.
पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते.
"त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर
आणि त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले.”
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १९:२-५
प्रतिसाद : निशीदिनी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो.
१)आकाश देवाचा महिमा वर्णिते,
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.
दिवस दिवसाशी संवाद करतो,
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
२)वाचा नाही, शब्द नाही,
त्यांची वाणी ऐकू येत नाही,
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो,
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.
शुभवर्तमान मत्तय ४: १८-२२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेल वाचन
"मग लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले."
गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, "माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन." मग लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच ते तारू आणि आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ख्रिस्तसभा आज संत ॲण्ड्र्यू (प्रेषित) ह्यांचा सण साजरा करते. पवित्रशास्त्र सांगते की, येशूची भेट होण्याआधी ॲण्ड्र्यू हा योहान बाप्तिस्ताचा शिष्य होता (योहान १:४०). येशूला पाहण्याची व तो कुठे राहतो हे शोधून काढण्याची त्याची ओढ ही खऱ्या शिष्यत्वाची होती. ख्रिस्तसभेमधील संत जॉन क्रिझोस्टोम ह्यांच्या म्हणण्यानुसार - “अॅण्ड्रयूला जेव्हा पाचारण होते तेव्हा तो येशूच्या बरोबर दोन दिवस राहिला परंतु ह्या दोन दिवसात त्याला दोन देणग्या मिळाल्या. येशू मसिहा आहे हे सत्य त्याला समजले आणि सुवार्ता पसरविण्याची मिशनरी वृत्ती त्याला मिळाली.” आपला ज्येष्ठ भाऊ पेत्र ह्याला सर्वप्रथम येशू मसिहा आहे ही गोष्ट अॅण्ड्रयूने सांगितली परंतु ॲण्ड्र्यूचा नम्रपणा एवढा होता की त्याने कधी स्वतःला उंचावले नाही. येशूने पाच हजारांना भाकर व मासे देऊन चमत्कार केला. या प्रसंगात ॲण्ड्रयूने पुढाकार घेऊन - पाच भाकरी व दोन मासे येशूकडे आणले (योहान ६:८-९). येशूवरील निष्ठावंत प्रेम व्यक्त करणारा संत अॅण्ड्र्यू आपणास आदर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया.
प्रार्थना :- जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझी स्तुति गाण्यास व सुवार्ता घोषविण्यास प्रेरणा लाभावी म्हणून संत ॲन्ड्र्यूच्या मध्यस्थिने हे प्रभू, तुजजवळ प्रेरणा मागतो, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या