Marathi Bible Reading | Wednsday 1st December 2021 | First Week of Advent

     आगमनकाळातील पहिला सप्ताह 

बुधवार 

१ डिसेंबर  २०२१

मला ह्या लोकांचा कळवळा येतो.".

संत एलिजियुस (एलोई )

महागुरू(५८८-६६०)


मध्य फ्रान्समधील निमोझेस नावाच्या शहरात रोमन आईवडिलांच्या पोटी एलिझियुस जन्माला आला. लवकरच तो एक सोनार व धातूचा व्यापारी म्हणून नावारूपाला आला. फ्रान्सचा सम्राट क्लोरेअर दुसरा ह्याच्यासाठी त्याने सुवर्णमंडित राजासन तयार केले. त्यात मौल्यवान रत्नजडित अलंकारही बसविले. त्याच्या अतिपवित्र जीवनामुळे व प्रामाणिकपणामुळे त्याला मार्सेलिस येथे पैशांच्या छापखान्यात काम मिळाले. परंतु इथेही काम करीत असताना गरीब गुलामांच्या मदतीसाठी व मुक्तीसाठी त्याने दानधर्म सुरू केला. सॅक्सन, लूर, ब्रेटन अशा लोकांना त्याने खूप मोठा आशेचा किरण दाखविला. 
त्याच्या धर्मप्रांतामध्ये हजारो लोक मूर्तिपूजक होते. त्यांच्या अंधश्रद्धाळू रितीरिवाजांचे निर्मूलन करणे खूप कठीण होते. त्यांचे परिवर्तन करण्यासाठी एलिजियुस ह्याने आपल्या आयुष्याची उरली सुरली २० वर्षे सुवार्ताप्रसारात व समर्पित जीवन जगण्यात घालविली. तो १ डिसेंबर ६६० रोजी मरण पावला. तो खूप लोकप्रिय होता व आजही फ्रान्समध्ये तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. टॅक्सी ड्रायव्हर्स, सोनार व लोहार ह्यांचा तो आश्रयदाता संत होय.


यशया संदेष्ट्याला देवाचे वचन प्राप्त झाले आणि त्याने इस्त्राएलच्या मुक्तिदात्याचे व त्यांच्या भावी जीवनाचे वर्तमान  सांगितले. यशया म्हणतो, ‘सेनाधिश परमेश्वर मृत्यू कायमचा नाहीसा करतो,  प्रभू परमेश्वर सर्वांना मिष्टान्न व उत्कृष्ट द्राक्षरसाची मेजवानी देतो.’ ही वचने येशू  ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आपण पाहतो.
प्रभूयेशू प्रथम लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व रंजल्या गांजलेल्यांना आरोग्यदान देऊन बरे करतो. येशूख्रिस्ताजवळ आलेल्या सर्व प्रकारच्या लोकांना प्रभूने स्पर्श केला व त्यांच्या जीवनाचे परिवर्तन केले  येशू म्हणत आहे, ‘मला ह्या लोकांचा कळवळा येतो.' प्रभूने त्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी सात भाकरी व काही मांसे ह्यांना आशीर्वाद  दिला व चार हजाराच्या जनसमुदायाची भूक भागवली. प्रभू येशू सर्वांची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक भूक शमविणारा मुक्तिदाता आहे. त्याच्या सहवासात व चरणाशी आलेल्या सर्वांना तो कृपाशिर्वाद देऊन तृप्त करीत असतो.

✝️

पहिले वाचन : यशया  : २५: ६-१०
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभू सर्वांना त्याच्या मेजवानीसाठी आमंत्रण देतो आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो."

सेनाधीश परमेश्वर ह्या पर्वतावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो या पर्वतावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करील. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकील. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करील, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
त्या समयी ते म्हणतील, “पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास आणि हर्ष करूया." कारण परमेश्वराचा हांत ह्या पर्वतावर राहील.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २४:१-३,५-६
प्रतिसाद :  प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वसती

१) प्रभू माझा मेंढपाळ आहे. 
मला कशाची कमतरता नाही
हिरव्यागार कुरणात तो मला विसावू देतो.

२) मला तो प्रशांत जलाशयाकडे नेतो 
मला तो नवजीवन देतो. 
आपल्या स्वभावानुरूप मला तो सन्मार्ग दाखवतो.

३) माझ्या शत्रूच्या देखत 
तू माझ्यासाठी मेजवानी करतोस. 
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक केला आहेस 
माझा पेला ओसंडत आहे.

४) खरेच, आयुष्यभर मला सुखाचे 
आणि प्रेमाचे दिवस लाभतील आणि
 प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वसती करीन.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता आहे.
परमेश्वर आमचा राजा आहे. तो आम्हांला तारील.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १५: २९-३७

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेल वाचन

"येशू अनेकांना बरे करतो आणि भाकरींचा चमत्कार करतो."

येशू सोर नि सिदोन भागातून निघून गालील सरोवराच्या बाजूने पुढे डोंगराळ भागात गेला आणि तेथे बसला. तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे लोटल्या. लंगडे, पांगळे, आंधळे, मुके अशा अनेकांना लोकांनी आणून येशूच्या पायांवर घातले. तेव्हा येशूने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, पांगळे बरे झाले, लंगडे चालू लागले आणि आंधळ्यांना दिसू लागले हे पाहून लोक चकित झाले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाला धन्यवाद दिले.मग आपल्या शिष्यांना जवळ बोलावून येशू त्यांना म्हणाला, "मला या जनसमुदायाची दया येते. गेले तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत. त्यांना खायला काही नाही. त्यांना उपाशी परत पाठवायची माझी इच्छा नाही, कारण कदाचित वाटेत ते कासावीस होतील.” “या निर्जन प्रदेशात एवढ्या मोठ्या जमावाला खाऊ घालायला पुरेशा भाकरी आम्हांला कुठून मिळणार ?” शिष्यांनी त्याला विचारले. येशू त्यांना म्हणाला, “किती भाकरी आहेत तुमच्याजवळ ?" “सात आणि थोडे लहान मासे," ते म्हणाले. मग लोकांना जमिनीवर बसायची आज्ञा करून येशूने त्या सात भाकरी आणि मासे घेतले, देवाचे आभार मानून त्यांचे तुकडे केले आणि शिष्यांजवळ ते दिले. शिष्य ते लोकसमुदायाला वाढत गेले. तेव्हा ते सगळे जेवून तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले ते सात पाट्या भरले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनप्रारंभीच्या ख्रिस्तसभेमध्ये भाकरीच्या चमत्काराला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झालेले होते. रोमच्या कॅटाकोम्बमध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या ख्रिस्ती चित्रकलेमध्ये ह्या चमत्कारात दडलेला पवित्र मिस्साच्या उगमाचे प्रतिबिंब पडलेले आहे. खरे पाहता शुभवर्तमानकारांनी प्रत्यक्ष ह्या घटनेचे वर्णन लेखी स्वरूपात आपल्या शुभवर्तमानामध्ये करण्यापूर्वीच हे चमत्कार आणि त्यांचा पवित्र मिस्साशी असलेला संबंध मौखिक किंवा तोंडी परंपरेमध्ये अभिप्रेत असावा. काही तज्ञांच्या मते कदाचित पवित्र मिस्सा - विषयीचे धर्मशिक्षण ख्रिस्ती होऊ पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना देताना भाकरींच्या चमत्कारांचा आधार हमखास धर्मशिक्षकांनी घेतलेला असावा. अरण्यात जाणे, सहभोजन घेणे, प्रेषित आणि येशूचा सहवास लाभणे, जेवून तृप्त होणे, गटागटात बसणे ह्या सगळ्या कृती प्रारंभीच्या ख्रिस्तसभेतील पवित्र मिस्साच्या वेळी तयार होणाऱ्या धार्मिक वातावरणाची चिन्हे मानली जातात. त्याच दृष्टीकोनातून आपण जेव्हा पवित्र मिस्साबलीतील भाषा आणि भाकरीच्या चमत्कारातील भाषा ह्यांची तुलना करतो तेव्हा तेव्हा त्यांचा परस्परसंबंध असल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो..

प्रार्थना :- हे प्रभू, तुझ्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र बनावेत म्हणून आम्हाला तुझा करुणायुक्त स्पर्श कर, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या