Marathi Bible Reading | Thursday 2nd December 2021 | First Week of Advent

      आगमनकाळातील पहिला सप्ताह 

गुरुवार 

२ डिसेंबर  २०२१

"माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांनाच केवळ स्वर्गराज्य मिळेल."


संत बिबियाना

कुमारिका व रक्तसाक्षी (३६३)


 रोम शहरामध्ये पाचव्या शतकात संत बिबियाना हिच्या नावाने एक ख्रिस्तमंदिर उभारण्यात आले होते. त्यामध्ये तिचा मृत देह अविनाशी अशा अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला होता. पोप संत सिम्प्लीसिऊस ह्यांनी ते मंदिर आशीर्वादित केले होते. तिचे दुःखसहन आणि त्यामागची पार्श्वभूमी ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही.

एका मौखिक परंपरेनुसार रोम शहराचे माजी प्रमुख फ्लेवियन आणि त्याची पत्नी डॅफ्रोझा ह्यांची बिबियाना ही मुलगी होती. दोघेही पती-पत्नी खूप श्रद्धाळू व धार्मिक वृत्तीचे जीवन जगत होते. त्यांच्या दृढ श्रद्धेमुळे संतापून मूर्तिपूजकांनी फ्लेवियन ह्याला तापत्या लोखंडी सळीने भाजून काढले. त्याचा चेहरा विद्रूप करून टाकला व त्याला एका जंगलात हाकलून दिले. तिथे जखमी अवस्थेत तो मरण पावला.
बिबियानाची आई हीसुद्धा आपल्या पतीप्रमाणे अतिशय भक्तिमान व साध्वी वृत्तीचे जीवन जगत होती, त्यामुळे तिचाही तसाच छळ करण्यात आला. तिला बराच वेळ एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले व शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला.
त्यांच्या मागे उरलेल्या बिबियाना आणि डेमेट्रीया ह्या दोन बहिणींना खूप दारिद्र्याचे जीवन जगावे लागले. त्यांच्याकडची सर्व संपत्ती व मालमत्ता मूर्तिपूजकांनी व त्यांच्या मातापित्याच्या मारेकऱ्यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली. पाच महिने ह्या दोन कुमारिका उघड्यावर वणवण हिंडू लागल्या. परंतु अशाही अवस्थेत उपवास व प्रार्थना करीत दोघींनी ते दिवस कृपावंत करून टाकले.
रोमचा राज्यपाल ॲप्रोनियानुस ह्याने ज्युलियन ह्या सम्राटाच्या काळात ह्या दोन्ही बहिणींना आपणासमोर हजर होण्याचा हुकूम सोडला. बिबियानाची बहीण डेमेट्रीया हिने न्यायालयामध्ये सर्वांसमक्ष आपली ख्रिस्ती श्रद्धा धैर्याने प्रकट केली. त्यानंतर ती थरथर कापू लागली आणि काही क्षणातच खाली पडली व मरण पावली.
बिवियाना हिला त्या शहरातील कुप्रसिद्ध स्त्री रूफिना हिच्या ताब्यात देण्यात आले. ती चांगली कलावंतीण होती, परंतु तिने बिबियानाला वेगळ्या पद्धतीने छळायला सुरुवात केली. परंतु रूफिनाचे सर्व प्रयत्न असफल ठरले. तिला श्रद्धेपासून आणि शुद्धतेपासून छळण्याचा रूफिनाने खूप खूप प्रयत्न केला पण सारे मुसळ केरात !
शेवटी बिबियाना हिला एका खांबाला बांधण्यात आले. काटेरी चाबकाने तिला फोडून काढण्यात आले. मरेपर्यंत तिला चाबकाचे फटके मारण्यात आले. हे सर्व तिने अगदी प्रसन्नमुखाने सहन केले आणि आपल्या मारेकऱ्यांच्या समोर तिने आपली मान टाकली.
बेवारशी कुत्र्यांनी तिचे शरीर फाडून खावे ह्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह उघड्यावर टाकून दिला. परंतु एकही कुत्रा तिच्या पवित्र शरीराला स्पर्श करण्यास धजला नाही. शेवटी दोन दिवसांनी तिच्या मातापित्यांच्या बहिणीच्या खाचेशेजारी जॉन नावाच्या धर्मगुरूंनी लिसिनिअस राजवाड्यानजीकच रात्रीच्या वेळी तिला पुरले.
  ....... 
'सात्विक राष्ट्राचे निष्ठावंत लोक आंत प्रवेश करतील' असा संदेश यशया पहिल्या वाचनात देत आहे. म्हणजेच देवाचे भय बाळगणारे, देवावर पूर्ण विश्वास ठेवणारे आणि त्याच्या आज्ञेत राहून आचरण करणारी सर्व निष्ठावंत माणसे स्वर्गराज्यात प्रवेश करतील. प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी असलेले आपण खरोखरच निष्ठावंत लोक आहोत का ह्यावर आपण आज चिंतन करु या.
 सुज्ञ आणि मूर्ख माणूस ह्यांचे स्पष्टीकरण प्रभू येशू करीत आहे. प्रभू म्हणतो,  खडकावर घर बांधणारा मनुष्य सुज्ञ असतो. सुज्ञ माणसाची श्रद्धा खडका सारखी मजबूत असते. आपल्या जीवनातील सर्व कठीण प्रसंगी तो खंबीर पणे स्थिर असतो. या उलट वाळूवर घर बांधणारा म्हणजेच पोकळ श्रद्धा असणाऱ्या माणसाचे जीवन कोसळते. आपले जीवन प्रभू येशूच्या वचनावर उभारलेले असावे. प्रभू येशूच्या वचनात माणसाच्या जीवनाचा अर्थ आणि परमेश्वराच्या कृपेचे सामर्थ्य सामावलेले आहे. परमेश्वराची वचने आपल्या जीवनात शहाणपण आणि सुज्ञता  निर्माण करीत असतात. 
     ह्या आगमन काळात आपण आपले पवित्र शास्त्र, बायबल मधून  देवाच्या शब्दांचे वाचन करुन त्यावर विशेष मनन-चिंतन करु या. आपले वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामुहिक जीवन देवाच्या वचनांवर उभारलेले असावे म्हणून प्रयत्नशील बनू या. देवाच्या दृष्टीने सुज्ञ बनू या..

✝️

पहिले वाचन : यशया  : २६: १-५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

  “सत्याचे पालन करणाऱ्या धार्मिक राष्ट्राचा उदय होवो."

यहुदी देशात हे गीत गातील. आमचे नगर तटबंदी केलेले आहे. तारण हेच त्याचे कोट आणि तट नेमले आहेत. वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. परमेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. उच्चस्थळी राहणाऱ्यांना त्याने खाली आणले आहे. त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे, धुळीला मिळवले आहे. नगर पायांखाली तुडवले जात आहे. गरिबांचे पाय, दीनांची पावलेदेखील त्या नगराला तुडवत आहेत.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११८:१,८-९,१९-२१,२५-२७
प्रतिसाद :  प्रभूचे नाव धारण करून येणारा धन्य आहे.

१) प्रभूला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे.
त्याचे वात्सल्य अनंत आहे.
माणसाच्या भरवंशावर राहण्यापेक्षा 
प्रभूला शरण जाणे बरे

२)माझ्याकरिता नीतिमंदिराची दारे उघडा 
मग आत जाऊन मी प्रभूला धन्यवाद देईन. 
प्रभूकडे जायचे हे दार. यातून सज्जन प्रवेश करोत. 
प्रभू तू माझे ऐकलेस, माझा उद्धारकर्ता झाला, 
म्हणून मी तुला धन्यवाद देतो. २

३) प्रभू आम्हांला वाचव प्रभू आमची भरभराट कर. 
प्रभूचे नाम धारण करून येणारा धन्य आहे. 
प्रभूसदनातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. 
प्रभू, परमेश्वर, आमचा प्रकाश आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
येरुशलेमला सुवार्ता सांगण्यासाठी आपला स्वर उंच कर पहा,
 प्रभू परमेश्वर पराक्रमी पुरुषासारखा येत आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ७: २१,२४-२७

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेल वाचन

"माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांना स्वर्गराज्य मिळेल."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले "मला प्रभुजी, प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाला स्वर्गराज्यात प्रवेश मिळेलच असे नाही. माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांनाच केवळ स्वर्गराज्य मिळेल."

"तेव्हा, हे माझे बोल ऐकून त्याप्रमाणे वागणारा प्रत्येकजण आपले घर एखाद्या खडकावर बांधणाऱ्या माणसासारखा शहाणा ठरेल. पाऊस कोसळला, पूर आला आणि सोसाट्याचा वारा त्या घरावर आदळला पण ते पडले नाही कारण ते खडकावर बांधलेले होते. तसेच माझे हे वचन ऐकून त्याप्रमाणे न वागणारा प्रत्येकजण आपले घर वाळूवर बांधणाऱ्या माणसासारखा मूर्ख ठरेल. पाऊस कोसळला, पूर आला आणि सोसाट्याचा वारा त्या घरावर आदळला तेव्हा ते पडले. अगदी कोसळून पडले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे वागणे, करणे किंवा न वागणे यावरच सर्वकाही अवलंबून आहे. दोन व्यक्तींनी येशूची वचने ऐकली होती. परंतु त्यापैकी एकाने आज्ञापालनही केले आणि खऱ्या, पक्क्या, अढळ पायावर बांधकाम केले. या दोघांनीही घरे बांधली. बाहेरून दिसण्यात ती दोन्ही घरे अगदी सारखीच होती. पण जेथे घरे बांधली ती जमीन दोन प्रकारची होती. हे दोघेजण घरे बांधण्यासाठी योग्य जमिनीचा जागेचा शोध करीत होते तेव्हा प्रथम त्यांना एक खोरे दिसले. तो सखल भाग होता. तेथे पाण्याचे नावही नव्हते आणि उन्हाळ्याच्या दिवसातही तेथे चांगले प्रसन्न वातावरण होते. सखल जागेत घर बांधणाऱ्या मनुष्याला फक्त माहिती आहे आणि तो तोंडाने बोलणारा आहे. त्याने ख्रिस्त या पायावर या आधारावर आपल्या जीवनाचे घर कधीच उभारलेले नाही. दुसऱ्या माणसाने आपले घर खडकावर बांधले, त्याचा ख्रिस्तावर खरा विश्वास आहे आणि मनःपूर्वक केलेल्या आज्ञापालनावरून त्याच्या विश्वासाची प्रचिती येते. अचानक आलेले वादळ म्हणजे या पृथ्वीवरील संकटे, अडचणी, प्रत्येकाचे जीवन या संकटांच्या कसोटीवर पारखले जाते आणि अखेरीस मरण आणि न्याय यांचे तुफाने येतात. केवळ वरकरणी धर्माचे पालन करणारा या वादळात कोठच्या कोठे उडून जातो. कारण त्याच्या पायांखाली आधारासाठी फक्त वाळूच असते.

प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझी जीवनदायी वचने श्रद्धेने आचरणात आणण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या