आगमनकाळातील पहिला सप्ताह
शुक्रवार
३ डिसेंबर २०२१
"पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.
सुवार्तिक संत फ्रान्सिस झेवियर,
धर्मगुरू (भारतासाठी) सोहळा
परमेश्वराचे यिर्मयाला पाचारण झाले तेव्हा त्याने आपली अपात्रता दर्शविली, . राष्ट्रांचा संदेष्टा होण्यासाठी यिर्मयाला देवाने बोलविले व । यिर्मयाने इस्त्राएल व यहुदास देवाच्या आज्ञेप्रमाणे प्रबोधन केले. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाने अरीपगातील लोकांना खऱ्या जिवंत देवाची ओळख करुन दिली,
ख्रिस्तसभा आज भारताचा सुवार्तिक संत फ्रान्सिस झेविअरचा सण साजरा करीत आहे. शुभवर्तमानात म्हटले आहे. 'लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवित आहे'. श्रीमंत घराण्यातील अत्यंत विद्वान असलेला फ्रान्सिस बायबल मधील एका अमृत वचनाने प्रेरित झाला आणि ख्रिस्ताच्या मळ्यातील प्रभावी सुवार्तिकबनला. वादळ, वारा, पाऊस, ऊन, संकटे, दु:खे व कोणत्याही विरोधाला न जुमानता संत फ्रान्सिसने ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या प्रभावी प्रवचनांद्वारे व जीवनाद्वारे पसरविली. विशेषत: जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन आणि भारतामध्ये संत फ्रान्सिस झेविअरने ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार केला. संत फ्रान्सिसला भारताचा प्रेषित आणि धर्मप्रसाराचा आश्रयदाता म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताने अनेकांना सेवाकार्य व सुवार्ता प्रसार करण्यास पाचारण केलेले आपण पाहतो. आज प्रभूयेशू आपणासर्वांना पाचारण करुन त्याची सुवार्ता पसरविण्यास आवाहन करीत आहे. 'पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत’. संत फ्रान्सिस झेवियरचा आदर्श आपल्याला अंगिकारता यावा म्हणून विशेष प्रार्थना करू या. प्रभूच्या वचनाशी व ख्रिस्ती श्रध्देशी एकनिष्ठ राहून सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन : यिर्मया :१: ४-८
वाचक :यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”
तेव्हा मी म्हणालो, “अहो, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे.” मग परमेश्वर मला म्हणाला, “ 'मी केवळ बाळ आहे' असे म्हणू नकोस, ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि तुला आज्ञापीन ते बोल. त्यांना तू भिऊ नकोस. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचन :
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन १७:२२-२८
वाचक : "आपण त्याच्याठायी जगतो, वागतो आणि आहो."
पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला :"अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदूतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, 'अज्ञात देवाला' ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले सर्व काही निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहात नाही आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्यांची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत, अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासून दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो.' तसेच कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे, तुमच्या 'आपण वास्तविक त्याचा वंश आहो.'
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७१:१-६,१५,१७
प्रतिसाद : मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन.
१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे,
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.
तू आपल्या न्यायनीतीने माझा उध्दार कर,
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.
२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी
निवासाचा खडक हो,
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस
कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस.
हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.
३) कारण हे प्रभो, परमेश्वरा,
तूच माझे आशास्थान आहेस,
माझ्या तरुणपणापासून माझे श्रध्दास्थान आहेस.
जन्मापासून तूच माझा आधार आहेस,
मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस.
४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि
तू सिध्द केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.
हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस
आणि मी आजपर्यंत तुझी अदभुत कृत्ये वर्णिली आहेत.
दुसरे वाचन इफिस ३:१-१३
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“खिस्ताचे रहस्य आता प्रकट करून दाखवले आहे आणि तेच अभिवचन परराष्ट्रीय लोकांनाही दिले आहे."
मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. देवाची ती कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हांला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्टयांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांना कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.
देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृध्दीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिध्दीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्याद्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हांला भूषणावह आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
शुभवर्तमान लूक १०: १-१६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत."
प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, "पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला पाठवत आहे, पाहा. पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो,' असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा मी, 'देवाचे राज्य तुमच्याजवळ आले. आले.' तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा : ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील झाडून तुमची तुम्हांला परत करतो, तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.' मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल.”
" हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार ! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सीदोन ह्यात घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोणपाट आणि राख अंगांवर घेऊन बसून पश्चाताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सीदोन ह्यांना सोपे जाईल. हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उच्चपदाला पोहचशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.“जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ७२ जणांच्या प्रेषित कार्याचा उल्लेख करून लूकने येशूच्या कार्याची व्याप्ती आणि निवड किती मोठी आहे तेच दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. येशूने ह्या ७२ प्रेषितांना जे मार्गदर्शन केलेले आहे त्यावरून येशूच्या कार्याचे महात्म्य स्पष्ट होते. तो दोघां-दोघांना कामगिरीवर पाठवितो. कारण दोघांची साक्ष खरी मानली जायची. शिवाय परस्परांवरील प्रेमाद्वारे ते लोकांना आपल्या शिष्यत्वाचे दर्शन घडू शकणार होते. ज्यांच्याकडे जावे ते क्रूर लांडगे असण्याची शक्यता येशूने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे निष्पाप कोकराची नम्र व विमल मनोवृत्ती त्यांनी धारण करावी अशी येशूची त्यांना शिकवण आहे. सोबत त्यांनी पिशवी, झोळी किंवा वाहणा घेऊ नयेत. त्याऐवजी त्यांनी पूर्णपणे देवपित्यावर विसंबून राहावे असे येशू त्यांना सुचवितो. त्यांनी वाटेने कुणाला मुजरा करण्यास वेळ दवडू नये कारण प्रेषितकार्य तातडीचे आहे. प्रेषितकार्याचा खराखुरा मार्ग येशूने आपल्या जीवनातून दाखवून दिलेला आहे. तो अंगिकारण्यास आपणांस प्रेरणा मिळत राहावी व परमेश्वराचे कार्य अधिकाअधिक बहरावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना :- हे परमेश्वरा, तुझे राज्य ह्या भूतलावर यावे व तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचविता यावी म्हणून आम्हास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या