शुभवर्तमान मत्तय ९: ३५-१०:१,६-८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याचा त्याला कळवळा आला.
येशू साऱ्या शहरातून आणि गावातून फिरत होता. त्याने त्यांच्या सभास्थानांतून शिक्षण दिले, स्वर्गराज्याचा शुभसंदेश दिला आणि सर्व प्रकारच्या रोगदुखण्यांनी पीडलेल्यांना बरे केले. त्याने लोकसमुदायाला पाहिले तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले आणि पांगलेले होते. मग तो शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामगार थोडे आहेत, ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामगार पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा." येशूने मग आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावून त्यांना भुताखेतांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला.त्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा देऊन पाठवले, "इस्राएल घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. जाता जाता अशी घोषणा करा, की, स्वर्गराज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, महारोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: परमेश्वराचे आगमन मनुष्यजातीमध्ये आणि निसर्गामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणत असतात. परमेश्वराच्या आगमनाने घडून येणारे बदल यशया संदेष्टा आपल्यासमोर सादर करतो. भरभराट, समृद्धी, मार्गदर्शन, मुक्ती, संरक्षण, तृप्ती, समाधान, मनःशांती, आत्मविश्वास अशा 3 सद्गुणांनी सृष्टी मानवजात समृद्ध आहे. यशयाने मांडलेले हे चित्र प्रभू येशूच्या कार्यात पुढे कसे गेले |त्याचे वर्णन शुभवर्तमानात ऐकावयास मिळते. प्रथम येशू स्वतः हे स्वप्न सत्यात उतरवितो. त्यानंतर तो आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला सांगतो आणि तिसऱ्या टप्प्यात तो आपल्या शिष्यांना विशेष अधिकार देऊन त्यांना प्रेषितीय कामगिरीवर पाठवितो. पूर्वी इस्त्रायलपुरता मर्यादित असलेले कार्य पुढे येशू सर्व राष्ट्रांसाठी खुले करतो.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करुन तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्ही तत्पर असावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या