आगमनकाळातील दुसरा रविवार
५ डिसेंबर
“परमेश्वराचा मार्ग तयार करा."
स्वर्गीय शांती घेऊन प्रभू येशू येत आहे.
✝️
बारुख संदेष्टा इस्त्राएलच्या विखुरलेल्या लोकांना सांत्वनाचा संदेश देत आहे. परमेश्वर पुन्हा सर्वांना एकत्र करील व 'सात्विकतेची शांती आणि धार्मिकतेचे वैभव' प्राप्त करुन देईल, असे आश्वासनत्यांना देवाकडून मिळत आहे. विशेषतः हा संदेश ख्रिस्तजन्मापूर्वीचा होता त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जगात येण्याने तो पूर्णत्वास गेला.
'सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.' मात्र तारणाऱ्याला स्वीकारण्यास व त्याच्या दयेला पात्र ठरण्यासाठी योहानाने पश्चात्तापाचा मार्ग सुचवला आहे. आपल्या जीवनातील पाप वासना, दुष्टता, स्वार्थ, अहंकार याबद्दल योग्य ते प्रायश्चित्त करण्याची गरज आहे. आपल्या बंधु-भगिनींबरोबर समेट करुन देवाबरोबर दुरावलेले संबंध नव्याने स्थापन करण्यासाठी ख्रिस्तसभेने हा आगमनकाळ आपल्याला दिला आहे. आज आपण ख्रिस्ताला सामोरे जाण्यासाठी जीवनातील जे अडथळे व खाचखळगे आहेत त्यावर चिंतन करु या. ख्रिस्तप्रभू नव्याने जन्म घेण्यासाठी आणि विशेषत: आपले नुतनीकरण करण्यासाठी येणार आहे. प्रभू येशूला शरण जाऊन आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार करु या. देवाला आपल्या सर्वांच्या जीवनाचे तारण करायचे आहे. आपली तयारी आपण कशी करीत आहोत ?
पहिले वाचन बारुख ५: १-९
वाचक : बारूख या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वर तुमचे तेज दाखवील."
हे येरुशलेम, तू आपली दुःखाची आणि निराशेची वस्त्रे काढ आणि परमेश्वराच्या वैभवाचे सौंदर्य सदोदित परिधान कर. परमेश्वराकडून पूर्णत्वाचा अंगरखा चढव. तुझ्या डोक्यावर अनंताचा मुकूट धारण कर. कारण परमेश्वर तुझे तेज आकाशाखालील प्रत्येक राष्ट्राला दाखवणार आहे. कारण, 'पूर्णत्वाची शांती आणि समर्पित जीवनाचा सन्मान, हे परमेश्वर तुला देऊ केलेले नाव चिरकाल टिकेल. हे येरुशलेम, ऊठ, उंचवट्यावर उभी राहा आणि तुझे डोळे पूर्वेकडे लाव. पवित्र प्रभूच्या आज्ञेप्रमाणे, परमेश्वराने त्यांची आठवण ठेवली आहे, म्हणून, पाहा, तुझे पुत्र पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून पुन्हा एकत्र जमले आहेत. जाताना ते शत्रूच्या संगतीत पायी गेले होते. आता वैभवात परत आणलेल्या राजपुत्रासारखे परमेश्वर त्यांना माघारी आणील. कारण प्रत्येक उंच पर्वत आणि शाश्वत डोंगर सपाट करावेत आणि खोरी भरून जमीन सपाट करावी अशी प्रभूची आज्ञा झाली आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या गौरवाखाली इस्राएल सुरक्षित नांदू शकेल. तसेच अरण्य आणि प्रत्येक सुवासिक झाड परमेश्वराच्या आज्ञेमुळे इस्राएली लोकांना सावली पुरवील. परमेश्वर आपल्या वैभवाच्या प्रकाशाने दया आणि पूर्णता यांची जोड देऊन इस्राएली लोकांचे आनंदाने मार्गदर्शन करील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२६ :१-६
प्रतिसाद : प्रभूने आमच्यासाठी महान कार्ये केली.
१) सियोनातून नेलेल्या बंदिवानांना प्रभूने माघारी आणले
तेव्हा ते आम्हांला स्वप्नवत वाटले.
त्यावेळी आमच्या मुद्रेवर हास्य पसरले.
आमचे ओठ गाणी गाऊ लागले.
२) तेव्हा परजातीय म्हणाले “प्रभूने यांच्यासाठी
महान कार्य केले आहे.'
प्रभूने आमच्यासाठी महान कार्ये केली
खरोखर आम्हांला किती तरी आनंद झाला.
३) दक्षिणेकडल्या रूक्ष प्रदेशात ओढे फिरून वाहू लागतात.
तसेच हे प्रभू, आम्हां बंदिवानांना माघारी आण.
आसवे गाळीत पेरणी करणारे, आनंदाने कापणी करतील.
४) पेरायचे बी घेऊन रडत घराबाहेर पडणारा
कणसाच्या पेंढ्या घेऊन
जयघोष करीत घरी परतेल.
दुसरे वाचन फिलिपे १:३-६,८-११
वाचक : पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे."
बंधुजनहो, मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता लाभली, तिच्यामुळे मी तसे करतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्याठायी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. माझ्याठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी अशी प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, अशासाठी की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे आणि देवाचे गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा
सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ३:१-६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील."
तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पोंती पिलात यहुदियाचा अधिकारी होता. हेरोद गालिलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरिया आणि त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक आणि लुसनीय अबिलेनेचा मांडलिक होता आणि हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जखऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले ते असे
“अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, 'परमेश्वराचा मार्ग तयार करा. त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सखल होईल. वाकडी सरळ होतील. खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशूच्या पुनरागमनाची पूर्वतयारी करण्यासाठी आजची वाचने आपल्यासमोर तीन मार्ग सादर करतात.
१) नूतनीकरणाची आशा : बारूख हा यिर्मया संदेष्ट्याचा सचीव होता. त्याने यिर्मयाच्या जीवनातील घडामोडी व त्याचा संदेश संकलित केलेला आहे. बाबिलोनच्या हल्ल्यात इसपू ५९७ व ५८६ दरम्यान शलमोनने वैभवशाली जेरूसलेम मंदिर उद्ध्वस्त होत ' असलेले त्याने पाहिलेले होते. यहुद्यांच्या आर्त किंकाळ्या व त्यांचा विलाप त्याच्या कानात घुमत होता. लोकांना बांधून हद्दपार अवस्थेत नेले जात असतानाचे चित्र त्याच्या नजरेसमोर येत होते. आपला गुरू यिर्मया ह्याच्याप्रमाणे बारूख आता आपल्या पुस्तकात लोकांमध्ये नूतनीकरणाची आशा प्रज्वलित करतो. येरूशलेमचे गतवैभव परत येईल असा विश्वास त्यांच्यात उत्पन्न करतो.
२) परमेश्वराच्या चांगुलपणावरील श्रद्धा : संत पॉलचे फिलिप्पै येथील लोकांवर विशेष प्रेम होते. तो थेस्सेलनिका येथे असताना त्यांनी संत पॉलच्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद देऊन गोरगरिबांसाठी व खुद्द पॉलच्या मिशन दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा केली होती. आता मात्र त्यांच्यावर ख्रिस्तविरोधकांनी हल्ला केल्यामुळे फिलिप्पै येथील ख्रिस्तमंडळी अवघड परिस्थितीला सामोरे जात होती. अशा पार्श्वभूमीवर संत पौल त्यांना नव्याने परमेश्वराच्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतो.
३) गतकाळातील पापांबद्दल पश्चात्ताप : ज्यांचे पाय भूतकाळातील चिखलात रुतलेले असतात त्यांचे हात भविष्यकाळातील वैभवशाली गगनापर्यंत पोहोचू शकत नाहीत. संत योहान बाप्तिस्ता यहुद्यांना पश्चात्ताप करून नव्याने आपले जीवन शुद्ध अंतःकरणाने जगण्यास आवाहन करीत आहे. खरे पाहता त्याचा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा हा बिगर यहुदी लोकांसाठी होता. परंतु यहुद्यांनी आपल्या पापी जीवनशैलीद्वारे परमेश्वराचा करार मोडला होता. अशी योहानाची खात्री पटलेली होती म्हणून तो त्यांनाही पश्चात्ताप करण्यास सांगतो.
आत्मपरीक्षण : आपले सध्याचे जीवन आणि भूतकाळातील जीवन ह्यांच्यात तुलना करा. कोणकोणत्या बाबतीत आपण प्रगती केलेली आहे? आणि कोणकोणत्या बाबतीत आपण मागे पडलेले आहोत? आता त्याबाबतीत काय काय करून येशूच्या पुनरागमनाची उचित तयारी करता येईल ?
प्रार्थना :-हे प्रभू येशू, जीवन व मार्ग तूच आहेस, तुला स्वीकारण्यास व तुझ्या सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या