आगमनकाळातील दुसरा सप्ताह
सोमवार
६ डिसेंबर
" ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा."
बारीचे संत निकोलस
महागुरू, वर्तनसाक्षी (--- ३५०)
✝️
आशिया मायनर येथील मायरा ह्या धर्मप्रांताचे ते महागुरू होते. ख्रिस्मस काळामध्ये सांता क्लॉस किंवा नाताळबाबाची जी परंपरा ख्रिस्तसभेमध्ये सध्या प्रचलित आहे त्याचा संबंध ह्याच संत निकोलसशी आहे.
पवित्र नगरी येरूशलेम येथून तीर्थयात्रेवरून परतत असताना ते मायरा येथे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चमध्ये गेले. योगायोगाने त्या धर्मप्रांताचे महागुरूस्वामी नुकतेच मरण पावले होते आणि स्थानिक धर्मगुरूंनी असे आपसात ठरविले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या पुरुषाला नवीन महागुरू म्हणून घोषित करावयाचे. अशा प्रकारे निकोलसच्या गळ्यांत महागुरूपदाची माळ आपोआपच पडली.
डायक्लेशियन सम्राटाच्या काळात ख्रिस्ती लोकांचा जो छळ झाला त्यावेळी संत निकलस ह्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. परंतु ३१३ साली कॉन्स्टन्टाईन राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला व “यथा राजा तथा प्रजा” म्हणून त्याने ख्रिस्ती धर्म आपल्या संपूर्ण साम्राज्यात पसरावा असेही जाहीर केले. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. कॉन्स्टन्टाईन राजाने सर्व ख्रिस्ती लोकांना खास सवलती जाहीर केल्या व तुरुंगातील कैद्यांना ताबडतोब मुक्त केले. त्यामुळे संत निकोलसचा तुरुंगवास तात्काळ संपला. एक महागुरू ह्या नात्याने त्यांनी लागलीच ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये सहभाग घेतला.
• देवाने संत निकोलस ह्याच्याद्वारे अनेक अद्भुत चमत्कार घडवून आणले. मुलांसाठी असलेले त्याचे प्रेम आणि गोरगरिबांविषयी त्याला वाटणारी काळजी हा पुढे वाक्प्रचार व सुभाषितांचा विषय बनला. गरिबांवर व लहान मुलांवर त्याचे प्रेम होते (त्याचे परोपकारकार्य मात्र गोपनीय होते). कसे ते पुढील घटनेवरून दिसून येते.
एकदा एका कुटुंबातील तीन मुली उपवर झाल्या होत्या; परंतु त्यांच्या लग्नासाठी बापाजवळ पैसा नव्हता. त्यात हुंड्याचा प्रश्न तर अक्षरश: आ वासून त्या बापासमोर उभा राहिला. पहिल्या मुलीच्या लग्नावेळी वधुपित्याला आपल्या घरात कोणीतरी सोन्या-नाण्यांनी भरलेली थैली टाकल्याचे आढळून आले. त्याने गुपचूप विवाहसमारंभ उरकून घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या मुलीच्या लग्नावेळीदेखील हीच घटना घडली. मात्र तिसऱ्या लग्नाच्या वेळी हे दयाकृत्य संत निकोलस ह्यांचे होते हे सत्य लपू शकले नाही.
ह्या घटनेवरून मायराचे लोक त्याच्या जन्म दिवसाची स्मृती साजरी करताना आदल्या दिवसाच्या रात्री आपल्या मुलांसाठी घरामध्ये बक्षिसांचा पुडा ठेवून देत आणि सकाळी उठल्यावर मुलांना सांगत की, रात्री संत निकोलस येऊन तुमच्यासाठी 'गिफ्ट' (भेटवस्तू) देऊन गेले. पुढे ही प्रथा नाताळच्या मध्यरात्री म्हणजे प्रभू येशूच्या जन्म दिनाच्या रात्री पाळण्यात येऊ लागली आणि संत निकोलसचे नाव जगभर सांता क्लॉस किंवा ख्रिस्मसबाबा म्हणून प्रसिद्ध झाले.
युरोपमधल्या काही भागात मात्र, उदा. ऑस्ट्रिया सारख्या देशातील कॅथोलिक भागांमध्ये चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना ६ डिसेंबर रोजी खास भेटवस्तू दिली जाते आणि वाईट वागणूक असलेल्या खोडकर मुलांना कोळशाचा तुकडा आणि विजेचे बटण दिले जाते. तुझ्या जीवनातील काळा डाग सद्गुणाच्या प्रकाशाने उजळून काढ असा सल्लाही त्याला दिला जातो.
दक्षिण इटलीतील बारी ह्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी संत निकोलस
ह्यांचे अवशेष आणले आणि आजपर्यंत ते तेथे असल्याचे आढळते. त्या अवशेषांमध्ये आजारमुक्तीचे सामर्थ्य आहे. त्याच्या सणाच्या दिवशी संत निकोलस ह्यांची इमाज बोटीद्वारे समुद्रात नेली जाते आणि मिरवणुकीने रात्री विजेच्या झगमगाटात पुन्हा देवळात आणली जाते. हा सोहळा मोठ्या थाटा-माटात आजही साजरा केला जातो.
संत निकोलस हा जहाजचालक आणि प्रवाशांचा आश्रयदाता संत मानला जातो. त्यामुळे तो समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. निरपराध आणि चुकलेल्यांचाही संरक्षक आहे. तसाच तो सर्व मुलांचाही आवडता संत आहे. शिवाय तो रशिया, ग्रीस, सिसिली, लॉरेन, लाईम्रीक आणि नेपल्स ह्या देशांचा आश्रयदाता आहे.
प्रभू येशू केवळ शारीरिक आजारच नव्हे तर आध्यात्मिक आजार म्हणजेच पापांची क्षमा करणारा तारणारा आहे. स्वत:बरोबरच आपण इतरांनासुद्धा प्रभू येशू जवळ आणून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकतो. प्रभू येशू दयेचा, करुणेचा आणि प्रेमाचा महासागर आहे. त्या थोर प्रभूला आपण विश्वासाने शरण जाऊ या.
पहिले वाचन यशया ३५:१-१०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वर स्वत: येईल आणि तुमचा उद्धार करील. "
अरण्य आणि रुक्ष भूमीही हर्षतील. वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन ते उत्सव करील. लबानोनची शोभा त्याला मिळेल. कार्मेल आणि शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. थरथरणारे हात दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा, घाबऱ्या मनाच्या लोकांना म्हणा, धीर धरा. भिऊ नका. पाहा, तुमचा देव सूड घ्यायला, अनुरूप असे प्रतिफळ द्यायला येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील. बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. मुक्याची जीभ गजर करील, कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. तृषित भूमीच्या ठिकाणी उपळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू आणि लव्हाळे यासहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्यावरून अपवित्र जन जाणार नाहीत. पण तो त्याच्यासाठी, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी ते मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत. हिंस्र पशूचा तेथे शिरकाव होणार नाही. तेथे ते आढळणार नाहीत. पण तेथे उद्धरलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जयजयकार करीत सियोनात येतील. त्याच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील. दुःख आणि उसासे पळ काढतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८५ :९-१४
प्रतिसाद : पहा, आपला प्रभू परमेश्वर.
१) प्रभुदेव काय म्हणतो ते मी ऐकेन कारण
तो आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो.
त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे,
म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा
उद्धार करायला तो सिद्ध असतो.
२) दया आणि निष्ठा यांचा संगम झाला आहे.
नीती आणि शांती यांचे मिलन झाले आहे.
भूमीवरील मानवी निष्ठा वर झेप घेत आहे.
स्वर्गातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावीत आहे.
३) खरोखर, प्रभू आमची भरभराट करील.
आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल.
नीती त्याच्या आघाडीला राहील.
शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा
सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ५:१७-२६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. "
एके दिवशी येशू शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया आणि येरुशलेम येथून आलेले . परुशी आणि शास्त्राध्यापक तेथे बसले होते आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशू ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षघाती मनुष्याला बाजेवर आणले आणि त्याला आत नेऊन प्रभूसमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दाटीमुळे त्यांना आत वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, "हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." तेव्हा शास्त्री आणि परुशी असा विचार करू लागले की, हा दुर्भाषण करणारा कोण आहे ? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ? येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले. "तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीत आहात ? पापांची क्षमा झाली आहे किंवा उठून चाल, ह्यातून कोणते म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा." तेव्हा तो लागलीच त्याच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले. तो देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ख्रिस्त आम्हाला आशीर्वाद देण्यास नेहमीच समर्थ आहे, त्याची शक्ती कधीच उणी पडत नाही. परंतु केव्हा केव्हा आम्ही त्याच्या अगदी निकट असूनही आम्हाला त्याच्याकडून कोणतेच आशीर्वाद मिळत नाहीत. आम्हाला शक्ती सामर्थ्य, सुख समाधान, आनंद, सहाय्य, शहाणपण ह्या देणग्या द्याव्या म्हणून तो मोठ्या उत्सुकतेने आमच्याजवळ येतो, पण त्या देणग्या आम्हाला देणे त्याला शक्य होत नाही. तो जे काही देणार ते घेण्यास आमची तयारी असली पाहिजे. ती नसेल तर देणग्या देणे शक्यच होणारच नाही. आम्ही आमच्या अंतःकरणाची दारे एवढी घट्ट बंद करून घेतलेली असतील की, सर्वसमर्थ ख्रिस्तालाही ती उघडता येणार नाहीत, तो बाहेरचा बाहेरच राहील. आम्ही दुबळे, अशक्त जरूर आहोत. तरीपण दिव्य महासामर्थ्य शक्तीने आमच्या जीवनात देणग्यांचा वर्षाव करू शकत नाही. त्या घेण्यास आम्ही आमच्या बाजूने तयार असले पाहिजे.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, आमची तुझ्यावरील श्रद्धा बळकट करण्यास व पश्चात्तापी अंतःकरणाने सर्वस्वी तुला शरण येण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या