आगमनकाळातील दुसरा सप्ताह
मंगळवार
७ डिसेंबर
"ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही."
संत अंब्रोज
महागुरू, धर्मपाल, धर्मपंडित, वर्तनसाक्षी (३४०-३९७)
✝️
गल्लीया या प्रांतात ज्यावेळी गॉल, ब्रिटन आणि स्पेन ह्या देशांचा समावेश होता त्यावेळी गल्लियाचा प्रमुख असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीच्या घरी अंब्रोज ह्याचा जन्म झाला. तेव्हा हे प्रमुखपद म्हणजे सरकारी दरबारातील सर्वोत्कृष्ट जागा होती. अशा उच्चपदस्थाच्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे अंब्रोजचे बालपण खूप सुखासमाधानात गेले.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अंब्रोजचे संपूर्ण कुटुंब रोम शहरात परतले आणि तेथील शालेय महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर अंब्रोजने कायद्याचा अभ्यास आरंभिला. त्याची कुवत आणि बुद्धिमत्ता पाहून राजा देखील प्रभावित झाला. वयाच्या ३३ व्या वर्षी सम्राटाने त्याला उत्तर इटलीचा गव्हर्नर राज्यपाल नेमले.
इथे असताना अंब्रोजने कनवाळू वृत्तीने, हळूवारपणाने आणि सुव्यवस्थित न्यायप्रदानाद्वारे मिलानच्या लोकांची मने जिंकली. जेव्हा मिलानमधील एरियनवादी पाखंड वृत्तीचे बिशप मरण पावले आणि कर्मकांडाला महत्त्व देणाऱ्या ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांमध्ये व त्याच्या अनुयायांमध्ये त्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या पदावरून वाद निर्माण झाला, अशावेळी अंब्रोजने आपला अधिकार वापरून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले व लोकांसमोर खणखणीत आवाजात एक भाषण केले. त्याने प्रभावित होऊन अचानक जमावातील एका छोट्या मुलाने आवाज दिला “बिशप अंब्रोज विशप अंब्रोज!!" त्या लहान मुलाच्या आवाजाला संपूर्ण जमावाने प्रतिसाद दिला आणि त्याला अंब्रोजने प्रखर विरोध करूनही लोकसमुदायाने त्याला नवीन विशप म्हणून निवडून दिले. विशेष म्हणजे तोपर्यंत अंब्रोजने बाप्तिस्मादेखील घेतलेला नव्हता.
मात्र ह्या घटनेमुळे अंब्रोजच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळाली. त्याने आपली वैयक्तिक मालमत्ता व गडगंज संपत्ती गोरगरीब व दीनदलितांमध्ये वाटून टाकली. आपला जमीन जुमला त्याने ख्रिस्तसभेला देऊन टाकला. ख्रिस्ती धर्मपंडितांची शिकवण आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास ह्यामध्ये त्याने आपले मन रमविले. एकाच वेळी त्याला शिकण्याचे व शिकविण्याचे काम करावे लागले. तो स्वत: एक नवशिक्या ख्रिस्ती होता आणि त्याचबरोबर लोकांचा मेंढपाळही होता. लवकरच त्याच्या छोट्या छोट्या, प्रभावी, व्यावहारिक आणि तितक्याच धाडसी प्रवचनांनी तमाम मिलानकरांना भारावून टाकले.
एकदा एका युवकाची आई विशप अंब्रोज ह्यांच्याकडे आली आणि आपला मुलगा कसा हाताबाहेर गेला आहे, पापाच्या चिखलात लोळत आहे असे तिने साश्रू नयनांनी बिशपांना सांगितले. तेव्हा विशपांनी तिला धीर देत म्हटले, "बाई, ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळतेस तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही. परमेश्वर त्याला एक दिवस सन्मार्गावर आणील" आणि झालेही तसेच हा युवक हळूहळू देवळात येऊ लागला. अंब्रोजची अधिकारयुक्त वाणी आणि एखादा मुद्दा पटवून सांगण्याची हातोटी निश्चितच भाविकांच्या हृदयाला हात घालीत असे' अशी साक्ष खुद्द त्या युवकाने दिलेली आहे. पुढे हा युवक अंतर्बाह्य बदलून गेला व हिप्पो शहराचा बिशप बनला. अखिल जगतातील स्विस्तसभेत त्याला धर्मपंडित म्हणून गौरविण्यात आले. त्याचे नाव होते संत अगस्तीन,
मिलानचे बिशप अंब्रोज हे आपल्या कळपावर व्यक्तिशः लक्ष ठेवून होते. हजारो लोकांना जरी एकाच वेळी स्नानसंस्कार द्यावयाचा असला तरी प्रत्येक नवख्रिस्ती व्यक्तीला ते व्यक्तिशः भेटत असत. साधुवृत्तीचे जीवन जगत असताना ते क्वचितच जेवण घेत. संपूर्ण दिवस ते लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध असत. गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच हा भेदभाव त्यांच्या गावीही नव्हता. रात्रीच्या वेळी ते पत्रांना उत्तरे देण्यात आणि आपल्या पुस्तकांचे लिखाण करण्यात घालवीत असत. त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे ख्रिस्तसभेची भूमिका स्पष्ट केली. नैतिकता आणि प्रशासन क्षेत्रातील तिचा अधिकार समजावून सांगितला आणि शासकीय किंवा सरकारी व्यवस्थेकडे ख्रिस्तसभा संरक्षणाच्या भावनेने पाहात असते हेही ठणकावून सांगितले.
असे असूनही मिलानच्या सम्राज्ञी ज्युस्टीना आणि कित्येक दरबारी व अधिकारी लोक एरियस ह्या पाखंडवाद्याच्या मताला चिकटून होते. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तिघांच्या समानत्वावर व तितक्याच प्रमाणातील वैशिष्ट्यावर ही मंडळी विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. बिशप अंब्रोज ह्याने नव्याने उभारलेले महामंदिर राणीच्या स्वाधीन करावे म्हणून त्यांनी ३८६ साली संत अंब्रोजवर दडपणही आणले. परंतु ह्याचा परिणाम उलट झाला. पवित्र आठवड्यातील उपासनाविधीसाठी बिशप अंब्रोज आणि त्याचे ख्रिस्ती श्रद्धावंत प्रार्थना करीत आणि संत अंब्रोज ह्याने रचलेली धार्मिक गाणी व स्तोत्रे गात सतत देवळातच राहू लागली.
असा आपल्या कळपाचे लांडग्यांपासून रक्षण करणारा महान मेंढपाळ, खऱ्या ख्रिस्ती शिकवणुकीच्या हिरव्या कुरणावर त्यांना नेणारा आणि आपल्या मोजक्या शब्दातील व मधुर आवाजातील प्रवचने व गीते ह्यांच्या संथ पाण्यावर नेणारा मेंढपाळ बिशप अंब्रोज ४ एप्रिल ३९७ साली ख्रिस्तवासी झाला.
चिंतन : “जे निद्रावस्थेत जीवन जगतात त्यांना नव्हे तर जे जागृतावस्थेत असतात त्यांनाच देवाचा आशीर्वाद व कृपादाने मिळतात. - संत अंब्रोज
ह्या आगमन काळात प्रभू येशू पुन्हा एकदा नव्याने आपल्या बहकलेल्या मेंढरांचा शोध घेण्यासाठी येत आहे. त्याच्या कळपातील आज्ञाधारक आणि विश्वासु मेंढरु बनण्यासाठी आपण आपले आचरण तपासून पाहू या. त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊ या.
पहिले वाचन यशया ४०:१-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वर आपल्या लोकांचे सांत्वन करील."
तुमचा देव म्हणतो, "सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, येरुशलेमच्या लोकांना धीर द्या. त्यांना म्हणा तुमचे कष्टाचे दिवस आता संपले आहेत. तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापांबद्दल तुम्हाला पुरेपूर शिक्षा मिळून चुकली आहे."
ऐका, कुणी ओरडून सांगत आहे : "रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा, आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा. दऱ्याखोऱ्यात भराव टाका आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी भुईसपाट करा. उंचसखल जमीन सपाट करा आणि ओबडधोबड जमीन गुळगुळीत करा, म्हणजे प्रभूचे वैभव प्रकट होईल आणि सारी मानवजात मिळून ते पाहील." ही प्रभूच्या तोंडची वाणी आहे. "घोषणा कर," अशी वाणी झाली. तेव्हा मी म्हणालो, "काय घोषणा करू ?"
"मानवजात म्हणजे गवत, तिचे सौंदर्य म्हणजे वनातल्या रानफुलाचे सौंदर्य. गवत सुकते, फूल कोमेजते. कारण प्रभूची फुंकर त्याच्यावर पडते. खरेच मानव म्हणजे गवतच. गवत सुकते, फूल कोमेजते, परंतु आमच्या देवाचा शब्द चिरकाल टिकतो."हे सियोनासाठी शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, उंच पर्वतावर चढ. हे येरुशलेमसाठी शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, मोठ्याने बोल. भिऊ नको, आपला आवाज चढव. यहुदाच्या नगरांना सांग, “हा पहा तुमचा देव." आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभूदेव येत आहे. बघा, त्याच्या हातात सत्ता आहे. त्याच्या कमानी म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक तो घेऊन येत आहे.
तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्याबरोबर आहे. एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करील. लहान कोकरांना तो वेंगेत उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढ्यांना सांभाळून नेईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७२ :१-२,७-८,१२-१३,१७
प्रतिसाद : आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे.
१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा.
पृथ्वीवरील समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा.
प्रभूचे गुणगान करा. त्याच्या नामाचा धन्यवाद गा.
त्याने केलेल्या उद्धाराची दिवसेंदिवस घोषणा करा.
२) देशोदेशी त्याचा महिमा वर्ण साऱ्या मानवजातीला
त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.
सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, प्रभू राजा आहे.
तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.
३) आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.
समुद्र आणि त्यातले प्राणी गर्जना करोत.
मळे आणि त्यातले सगळे खूश होवोत.
मग बनातले सारे वृक्ष
प्रभूसमोर आनंदाने गाऊ लागतील.
कारण तो येणार आहे.
४)पृथ्वीचा न्याय करायला तो येणार आहे.
तो सात्त्विकतेने जगाचा न्याय करील.
मानवजातीचा यथार्थ न्याय करील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभो, ये, उशीर लावू नकोस आपल्या लोकांना क्षमादान दे.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १८:१२-१४
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला काय वाटते? एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातले एखादे वाट चुकले तर बाकीची नव्याण्णव डोंगरात सोडून त्या चुकलेल्या मेंढराला तो शोधत फिरत नाही काय? मी तुम्हाला खरेच सांगतो, ते सापडले की, न चुकलेल्या नव्याण्णव में ढराबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आनंद त्याला होतो. त्याचप्रमाणे या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी माझ्या स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: मेंढपाळ त्या थकल्या भागल्या मेंढराला टाकून चालवीत घरी नेत नाही. सौम्य, स्नेहळ मेंढपाळ असे कधीच करीत नाही. तो खाली वाकून त्या मेंढराला उचलून आपल्या खांद्यावर घेतो, आणि घरी परत आणतो. ख्रिस्त क्रुसावर मेला तेव्हा त्याने आमचे पाप वाहून नेले हे आपणासर्वांना माहित आहे. आम्ही सारा भार, सारे ओझे त्याच्यावर सोपवावे हेही आम्ही जाणून आहोत. पण ख्रिस्ताला केवळ आमची पापेच नाही, केवळ आमची ओझी आणि काळजीच नाहीत तर आम्हा स्वतःलाही वाहून न्यायचे आहे. या पृथ्वीवरील कोणताही माणूस कधी बहकून भरकटत गेला तर त्याबद्दल वाईट वाटण्याऐवजी आस्था ख्रिस्ताला आहे का? त्याला माणसाविषयी एवढे वाटते का? एखाद्या मेंढपाळाचे चुकलेले मेंढरू तो शोधून घरी परत आणतो तेव्हा त्याचा आनंद आम्हाला समजतो. एखाद्या आईचे चुकलेले, हरवलेले मुल कोणी तिला परत आणून देते तेव्हा तिला होणारा आनंदही आम्हाला समजतो. परंतु आम्ही येशूला सापडलो, त्याने आम्हाला उचलून पुन्हा घरी परत आणले तेव्हा त्याच्या अंतःकरणाला आनंदाने भरून आलेला हा विचार एवढा भक्कम करणारा आहे की क्षणभर तो खरा आहे असे वाटतच नाही.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या