आगमनकाळातील तिसरा  सप्ताह 

मंगळवार १४ डिसेंबर २०२१

“नोकरदार व वारांगना तुमच्याही अगोदर देवराज्यात जातील.”

क्रूसभक्त संत जॉन

वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५४२-१५९१)

 ✝️

 बालपणापासून त्याला देवाधर्माची व अध्यात्माची ओढ असल्यामुळे तो आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांमध्ये, धर्मगुरू तसेच धर्मभगिनींच्या सहवासामध्ये रमू लागला. आध्यात्मिक विषयावर चर्चा करणे किंवा एकत्र प्रार्थना करणे त्याला खूप आवडत असे. लवकरच त्याची अविलाच्या संत तेरेजाशी ओळख झाली आणि दोघेही आध्यात्मिक स्वभावाचे असल्यामुळे त्याची दाट मैत्री जमली.

ज्याप्रमाणे आपण धर्मभगिनींसाठी कार्मेलाईट संस्था उघडलेली आहे, त्याचप्रमाणे जॉनने देखील पुरुषांसाठी कार्मेलाईट संस्था स्थापन करावी असे मत अविलाच्या संत तेरेजाने आपला मित्र जॉन ह्याच्याकडे प्रदर्शित केले. लागलीच हे स्वप्न वास्तवात अवतरले आणि १५६८ साली डुरूएलो येथे "डिस्काल्स्ड फ्रायर्स" ह्या संघाची स्थापना झाली. संस्थापक होते क्रूसभक्त संत जॉन आणि सहसंस्थापिका अविलाची संत तेरेजा !

एका झोपडीवजा घरामध्ये पहिल्या तीन व्रतस्थ फ्रायर्सनी आपले व्रतस्थ जीवन सुरू केले. “आत्यंतिक दारिद्र्य, विरक्ती आणि दैवी चैतन्य" अशा तत्त्वांवर बेथलेहेमच्या त्या गोठ्यात (अविलाच्या संत तेरेजा त्या झोपडीला बेथलेहेमचा गोठा म्हणत असे) त्यांनी आपली संस्था उघडली. त्यानंतर शाखा, उपशाखा व अध्यात्मकेंद्रे उघडण्यात आली.

पाच वर्षे संत जॉन अविलाच्या संत तेरेजांना आणि तिच्या धर्मभगिनींना अविला येथे आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असे. परंतु धर्मसुधारकांच्या काळात (सोळाव्या शतकात धर्मसुधारक आले त्यात मार्टिन ल्यूथरचा समावेश होता) त्या दोघांना खूप मानसिक त्रास आणि आत्मक्लेश ह्यांना सामोरे जावे लागले. पोप महाशयांच्या राजदूताने दिलेले आदेश, संस्थेच्या जनरलने केलेले नियम आणि जाहीर परिषदांमध्ये घेतले गेलेले नियम ह्यांचा कुठेच मेळ बसत नव्हता.

तशात नऊ महिने जॉनला त्याच्या स्वतःच्या संस्थेतील धर्मबंधूंनी एका आखूड खोलीत कोंडून ठेवले आणि त्याच्याविषयी उगाच नाही त्या कागाळ्या करायला आणि अफवा पसरायला सुरुवात केली; परंतु देव नीतिमानांना कधीही टाकून देत नाही ह्याचा प्रत्यय स्वत: जॉनला आला. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे जसा पेत्रही देवाच्या दूताद्वारे कडक बंदोबस्त असलेल्या तुरुंगातून सोडविण्यात आलेला होता (प्रे. कृ. १२:७-११) तसाच संत जॉनदेखील चमत्कारिकरित्या त्या आखूड खोलीतून बाहेर आला. मात्र ह्या नऊ महिन्यांच्या अंधाऱ्या भूतकाळातच त्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ दृष्टान्त आणि दैवी साक्षात्काराचा प्रकाशझोत दडलेला आहे.
धर्मसुधारक आणि कार्मेलाईट संस्था ह्यांच्यात फूट पडल्यानंतर संत जॉन हा प्रांताधिकारी म्हणून कार्यभार सांभाळू लागला. त्याच्या ठायी आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता, सहानुभूती ह्यांचे जणू घडेच्या घडे भरलेले होते. शिवाय त्याचा पिंड कवीचा होता. ह्याच त्याच्या स्वभावामुळे त्याच्या हातून अलौकिक अशी सेवा आणि साहित्यनिर्मिती झालेली आहे.
पुढे पुन्हा एकदा अंतर्गत बंडाळी माजली आणि त्यामुळे त्याला आपले प्रांताधिकारीपद सोडावे लागले. त्याला दूरवरच्या एका ओसाड मठामध्ये पाठविण्यात आले. तिथे तो एकाकी होता, त्यामुळे लवकरच आजारी पडला. त्यात अपमान, गैरसमज, मानहानी ह्यांना तोंड देत अखेरीस १४ डिसेंबर १५९१ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी तो मरण पावला. येशूप्रमाणे आपल्याला देखील दुःख, हालअपेष्टा सहन करीत असताना मृत्यू यावा अशी त्यानेच केलेली प्रार्थना अशा प्रकारे ऐकली गेली.
सेगोव्हिया येथे पुरण्यात आलेला त्याचा मृतदेह आजही अविनाशी अवस्थेत पाहायला मिळतो. पुढे पोप बेनेडिक्ट तेरावे ह्यांनी त्याला १७२६ साली संतपदाचा मान बहाल केला. तो साक्षात्कारी होता. साक्षात्कारी जीवनाचं जे ईशज्ञान आहे, त्याचा विद्वान पंडित म्हणून संत जॉन क्रूसवीर ह्याला गौरविले गेलेले आहे. शिवाय त्याने लिहिलेल्या साक्षात्कारी पुस्तकांमुळे त्याला सर्व साक्षात्कारी संतांचा प्रमुख म्हणून सन्मानीत करण्यात आलेले आहे.
क्रूसभक्त संत जॉन ह्याने माऊंट कार्मेलवरील आरोहण, एका आत्म्याची काळरात्र, आध्यात्मिक स्तोत्र, प्रेमाची जिवंत ज्वाला, अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यात त्याने आध्यात्मिक जीवनाचा मूलमंत्र, तंत्र पद्धती गरज आणि गहनता ह्याचा सांगोपांग विचार सुव्यवस्थितपणे मांडलेला आहे. ह्या जगातील ऐहिक सुखापासून जो दूर आहे, जे अधिक कठीण आहे, अधिक अप्रिय आहे आणि अधिक दुःखदायक आहे त्याला मिठी मारण्यास जो तयार आहे त्यांच्यासाठी सदर पुस्तके निश्चितच कल्याणकारी आहेत.

संत जॉनची आध्यात्मिकताही खूप प्रगल्भ होती. “आपल्याला सार्वकालिक जीवन हवे असेल तर ह्या जगातील कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपण बाळगू नये. केवळ श्रद्धेच्या माध्यमातूनच आपला आत्मा देवाशी तादात्म्य पावू शकतो. एकरूप होऊ शकतो” असे परखड विचार त्याने अध्यात्मसंदर्भात लिहून ठेवलेले आहेत.
अध्यात्म्याच्या क्षेत्रात त्याने केलेल्या ह्या अजोड कामगिरीबद्दल पोप पायस अकरावे ह्यांनी त्याला २४ नोव्हेंबर १९२६ रोजी ख्रिस्तसभेचा विद्वान धर्मपंडित हा किताब बहाल केला.
चिंतन: जो आत्मा दैवी ज्ञानासाठी आसुसलेला असतो त्याला पहिल्या प्रथम क्रुसाला वेंगेत घेण्याची तयारी ठेवावी लागते. क्रूसभक्त संत जॉन 



पहिले वाचन सफन्या   ३: १-२,९-१३
वाचक : सफन्या या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“सर्व गरिबांना ख्रिस्तातील तारणाचे वचन मिळाले."

बंडखोर, भ्रष्ट आणि बलात्कारी नगरीचा धिक्कार असो. तिने वचन मानले नाही. बोध घेतला नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही. ती आपल्या देवासमीप आली नाही. मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन आणि परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नावाचा धावा एकचित्ताने करतील. कुशाच्या नद्यांपलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील. ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील. ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करशील त्याविषयी त्या दिवसात तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही. कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणाऱ्यांना तुझ्यातून नाहिसे करीन. माझ्या पवित्र पर्वतावर तू यापुढे तोरा मिरवणार नाहीस. मी तुझ्यामध्ये नम्र आणि गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील. इस्राएलचे उरलेले जन काही अनिष्ट करणार नाहीत. लबाडी करणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळावयाची नाही. ते चरतील आणि विश्रांती मिळवतील. कोणी त्यांना भिववणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ३४ :२-३,६-७,१६,१८-१९,२३
प्रतिसाद :  मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.

१) मी प्रभूला सदासर्वदा धन्यवाद देईन 
त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल. 
प्रभूविषयीचाच अभिमान माझ्या मनी बसेल.
 हे ऐकून नम्र लोकांना आनंद होईल.

२) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते. 
त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही. 
मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला 
आणि माझी संकटे हरण केली.

३) वाईट करणाऱ्यांची आठवणदेखील 
पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून 
प्रभू त्यांना विन्मुख होतो.
सात्त्विक जन धावा करतात, 
प्रभू ऐकतो, तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.

४) ज्यांची कंबर खचली आहे 
अशांच्या जवळ प्रभू असतो. 
ज्यांचे अवसान गळाले आहे 
अशांचा तो उद्धार करतो. 
प्रभू आपल्या सेवकांचे प्राण वा

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
पहा, आपला प्रभू त्याच्या लोकांचे तारण करण्यास येईल. जे त्याला भेटण्यासाठी सज्ज आहेत ते धन्य.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  २१:२८-३२

वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“योहान आला आणि त्यावर पाप्यांनी विश्वास ठेवला."

येशू मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांना म्हणाला, “तुम्हांला काय वाटते, सांगा बरे? एका माणसाला दोन मुलगे होते. तो थोरल्याकडे गेला आणि म्हणाला, 'मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.' मुलाने उत्तर दिले, 'बाबा, मी जातो' पण तो गेलाच नाही. बापाने मग जाऊन धाकट्याला तसेच सांगितले. धाकट्याने उत्तर दिले, 'मी नाही जात' पण नंतर त्याला वाईट वाटले आणि तो गेला. मग या दोघांपैकी कुणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ?”

ते म्हणाले, “धाकट्याने.” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरेच सांगतो, नाकेदार आणि वारांगना तुमच्याही अगोदर देवराज्यात जातील. योहानने तुमच्याकडे येऊन तुम्हाला सन्मार्ग दाखवला पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण नाकेदारांनी आणि • वारांगनांनी ठेवला. तुम्ही हे पाहिले तरी नंतरही तुम्ही पश्चात्ताप केला नाही आणि विश्वासही ठेवला नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआज्ञाधारक व्यक्ती परमेश्वराला प्रिय असते. इस्त्रायली लोक देवाचे निवडलेले होते. त्यांच्याकडून देवाची एकच अपेक्षा होती. आज्ञापालन नेमके त्याच बाबतीत ते कमी पडले. त्यामुळे त्यांना हद्दपारीचा कटू अनुभव घ्यावा लागला. मात्र परमेश्वर त्यांचा पूर्ण नाश करीत नाही. आज्ञाधारक लोकांना पुन्हा पवित्र भूमीत परत आणण्याची योजना तो आजच्या पहिल्या | वाचनात उलगडून दाखवितो. शुभवर्तमानातील येशूचा दाखलासुद्धा आज्ञाधारकपणा आणि आज्ञाभंग यामधील परस्परविरोध दर्शवितो. त्या दोन मुलांमध्ये एकीकडे मुख्य याजक व वडीलजन तर दुसरीकडे जकातदार व पापी ह्यांचे दर्शन घडते. ख्रिस्ती माणसाला तिसरा मुलगा बनण्यास हाक देण्यात आलेली आहे. हा मुलगा देवाला होकार देतो आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत वागत राहतो.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, श्रद्धेने आणि पश्चाताची अंतःकरणाने मी तुला शरण आलो आहे, मजवर दया कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️