एका प्राचीन ख्रिस्ती परंपरेनुसार संत ल्युसी ही इटलीमधील सायराकूस या ठिकाणी एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आली होती. तिचे वडील तिच्या बालपणीच मरण पावले आणि जरी ल्युसी हिने आमरण कौमार्याचे व्रत स्वीकारण्याचा व देवाशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केलेला असला तरी तिच्या विधवा आईने मात्र एका श्रीमंत परंतु मूर्तिपूजक युवकाशी तिची सोयरिक करून दिली. संत सिसिलीयाप्रमाणे आपण देखील आपल्या पतीचे मनपरिवर्तन करू आणि आपल्या पावन व्रताचा आदर राखण्यास त्याचे मन वळवू अशी आशा ती आपल्या मनाशी बाळगून होती.
ल्युसीची आई बरीच वर्षे रक्तस्रावाने पीडलेली होती. त्यामुळे तिच्या मुलीच्या सूचनेवरून ५० मैल अंतरावर असलेल्या संत आगथाच्या चमत्कारकर्त्या थडग्याला भेट देण्याचे तिने मान्य केले. तिथे ती ताबडतोब गेली आणि संपूर्णपणे बरी झाली, आपले दुखणे कायमचे बरे झाले हे पाहून ल्युसीच्या आईला अत्यानंद झाला. तिने त्या चमत्काराप्रीत्यर्थ आपल्या मुलीकडे आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यासाठी सुपूर्द केली. यापूर्वी ल्युसीने आपल्या आईला तशी विनंती अनेकदा केलेली होती. परंतु आईने मात्र त्याला मान्यता दिली नव्हती.
आपल्या भावी पत्नीने व सासूने आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीची अशी उधळपट्टी केल्याचे कानी येताच लोभी वृत्तीच्या त्या तरुणाने रागापायी लुसीला सिसिली देशाच्या गव्हर्नरकडे आणले व ती ख्रिस्ती जीवन जगत असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले.
तो काळ ख्रिस्ती लोकांच्या (डायक्लोशियन) छळाचा काळ होता. एखादा रोमन कितीही देशभक्त असला तरी चालेल परंतु तो ख्रिस्ती असण्याला सम्राटचा तीव्र विरोध होता. जणू ख्रिस्ती धर्म राष्ट्रीय एकात्मतेला आणि लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला धोकादायक होता अशीच त्यांची धारणा झाली होती.
अशा पार्श्वभूमीवर एक कट्टर ख्रिस्ती म्हणून संत ल्यूसी हिला गर्व्हनरच्या समोर उभे करण्यात आले. तिला अत्यंत भयानक आणि लज्जास्पद मानहानीला व छळाला सामोरे जावे लागले. शेवटी ती १३ डिसेंबर ३०४ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एक कुमारिका म्हणून रक्तसाक्षी बनली. एका तरवारीने तिचा गळा चिरून तिला आरपार भोसकण्यात आले होते. ज्या कंठातून ख्रिस्ताचे नाव उच्चारले जात होते तो कंठ भेदून छेदून टाकण्यात आला होता.
ती सिसिली देशातील सायराकूस प्रांताची आश्रयदाती संत आहे. डोळे येणे, घशाचे विकार, रक्तस्राव आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी तिचा धावा केला जातो.
चिंतन : ज्यांची हृदये शुद्ध आहेत तेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. - संत ल्युसी
प्रभू येशू देवाचा पुत्र सर्व सामर्थ्याने परिपूर्ण होता. सर्व मानवावर व चराचर सृष्टीवर त्याचा अधिकार होता. त्याच्या अधिकारयुक्त वाणीने त्याने माणसांतील अशुद्ध आत्म्यांना घालवून दिले. अधिकारयुक्त वाणीने समुद्रातील वादळ शांत केले. सर्वांना स्वर्गराज्याचे वारसदार बनता यावे म्हणून अधिकारयुक्त वाणीने प्रभू येशूने देवराज्याची शिकवण दिली,
प्रभू येशूने त्याचे सार्वभौमत्व प्रत्यक्षपणे प्रत्येक अद्भुत चमत्काराच्या वेळी प्रकट केलेले आहे. प्रभू येशूने त्याच्या अधिकाराचा वापर दुःखित, पीडित व पापीजनांचे तारण करण्यासाठी केला. प्रभू येशूने माणसातील दुष्टात्म्यांना काढून टाकण्यासाठी अधिकार वापरला. देवाचे प्रेम साकार करण्यासाठी अधिकार युक्त वाणीचा वापर केला, सर्वांना स्वर्गराज्य मिळावे म्हणून प्रभूने अधिकारयुक्त वाणीने सत्याची शिकवण दिली. आपण सुद्धा त्याच अधिकाराखाली प्रभूच्या आश्रयाला आलो आहोत.
आपल्यालासुद्धा कुटुंबात, समाजात, व्यवसायात व इतर ठिकाणी अधिकार मिळाले आहेत. आपण आपल्या अधिकाराचा वापर विधायक कार्यासाठी व जन कल्याणासाठी करणेच उचित ठरेल. शेवटी आपल्याला मिळालेले अधिकार देवाकडूनच प्राप्त झालेले आहेत.
पहिले वाचन गणना २४: २-७,१५-१७
वाचक : गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
"याकोब वंशातून एक तारा उदय पावेल"
बलामने दृष्टी वर करून पाहिले तो इस्राएल लोक आपआपल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहात आहेत असे त्याला दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला :
"बौरचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे, जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोब, तुझे डेरे, जे इस्राएल, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत. त्याच्या मोटांतून पाणी वाहेल. त्याच्या बीजांला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल आणि त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल."
मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला: "बौरचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो आणि ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. मी त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबमधून एक तारा उदय पावेल आणि इस्राएलामधून एक राजदंड निघेल."
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान मत्तय २१:२३-२७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानला कुणी दिला ?"
येशू मंदिरात जाऊन शिक्षण देत होता, तेव्हा प्रमुख पुरोहित आणि लोकांचे वडीलजन त्याच्याकडे आले आणि म्हणाले, "या गोष्टी करायचा तुम्हांला काय हक्क आहे? हा अधिकार तुम्हांला कुणी दिला ?" येशूने त्यांना उत्तर दिले, "मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे जर तुम्ही उत्तर दिलेत तर या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे तुम्हांला सांगेन." बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानला कुणी दिला? देवाने की माणसाने ?" त्यावर वादविवाद करीत ते एकमेकांना म्हणू लागले, "आपण जर म्हणालो, 'देवाने दिला' तर हा आपल्याला म्हणेल, 'मग तुम्ही योहानवर का विश्वास ठेवला नाही ?' बरे 'माणसाने दिला' म्हणावे तर आपल्याला जनसमुदायाची भीती आहे, कारण योहान संदेष्टा आहे असे सगळे मानतात." तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही." त्यावर येशू त्यांना म्हणाला, "मग या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मीही तुम्हांला सांगत नाही.".
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: शास्त्री परुशी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या अधिकाराविषयी प्रश्न विचारतात तेव्हा येशू त्यांना प्रतिप्रश्न करतो, 'योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून झाला होता की माणसापासून?' ह्या प्रश्नातच शास्त्री परूश्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दडलेले होते. ते असे की, जर योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासूनच असेल तर योहानाकडून बाप्तिस्मा घेणाऱ्या येशूचा अधिकारदेखील स्वर्गापासूनच आहे. शास्त्री, परुशी पेचात पकडण्याचा प्रयत्न करीत होते परंतु येशूने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. एकीकडे त्यांनी योहानावर अविश्वास दाखविला होता तर दुसरीकडे त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यामुळे कोणतेही उत्तर दिल्याने ते धोक्यात येणार होते. धोका पत्करण्यास तयार नसलेले येशूचे शिष्यत्व पत्करू शकत नाहीत हे सुचविण्यासाठी येशू त्यांना उत्तर देत नाही.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्या अधिकाराखाली आश्रय घेण्यास व कृपेचे जीवन
जगण्यास तसेच देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या