आगमनकाळातील तिसरा रविवार
१२ डिसेंबर २०२१
“तो 'तुमचा 'बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.".
स्वर्गीय प्रेम आनंद शांती घेऊन प्रभू येशू येत आहे.
✝️
आजच्या पहिल्या वाचनात सफन्या संदेष्ट्याद्वारे आनंदोत्सव करण्याचा संदेश देण्यात आला आहे. परमेश्वर स्वतः सर्व प्रकारच्या अनिष्टापासून इस्त्राएलचे निवारण करील. यरुशलेमवासीयांवर त्याचे प्रेम अखंडित राहील कारण स्वतः परमेश्वर त्यांच्यामध्ये वस्ती करील.
आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत व आपल्याला आनंदाचा संदेश देण्यात येत आहे.
आनंद हे पवित्र आत्म्याच्या फळापैकी एक आहे. संत पौल ह्याच पवित्र आत्म्याठायी सर्व प्रकारच्या त्रासदायक परिस्थितीत आनंद करायला सांगत आहे, कारण त्यावेळी संत पौल तुरुंगवास भोगित होता तरीसुद्धा पवित्र आत्म्याठायी तो आनंदाने प्रभूचे आभारस्तवन करीत होता. आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ता उत्साहाने आणि पवित्र आत्म्याठायी हर्षाने ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश लोकांना देत आहे. तसेच पश्चात्तापाचा संदेश देताना गरजवंतांना मदत करण्याचे व परस्पर सौख्याने आचरण करण्याचे आवाहन करीत आहे.
आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ता त्याची अपात्रता जाहीर करुन तारणारा म्हणजेच प्रभू येशूचा सन्मान करीत आहे. नम्रतेने योहान बाप्तिस्ता म्हणत आहे, ‘तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील'. प्रभूला स्वीकारण्यास आपण पात्र बनावे म्हणून स्वतःला प्रभूसमोर रिक्त करुन शरण जाऊ या. कारण सर्वकाळचा आनंद अनुभवण्यास आपण तयार असले पाहिजे.
पहिले वाचन सफन्या ३: १४-१८
वाचक : सफन्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
“प्रभू तुझ्याविषयी आनंदोत्सव करील."
सियोनकन्ये, उच्च स्वराने गा. इस्राएला, जयजयकार कर. येरुशलेमकन्ये, मन:पूर्वक उल्हास आणि उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. इस्राएलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती वाटणार नाही. त्या दिवशी येरुशलेमास म्हणतील: हे सियोन, भिऊ नकोस. तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव, सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे. तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील. त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र यशया १२ :२-६
प्रतिसाद : जयघोष करा, गजर करा,
१) “पाहा, देव माझे तारण आहे.
मी श्रद्धा ठेवीन. भिणार नाही.
कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे.
तो मला तारण झाला आहे."
तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल.
२) “परमेश्वराला धन्यवाद द्या.
त्याच्या नामाचा जयघोष करा.
राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा.
त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा."
३) “परमेश्वरापुढे गायन करा,
कारण त्याची करणी प्रतापमय आहे.
हे सर्व पृथ्वीवर विदित होवो.
अहो सियोनवासियांनो, जयघोष करा, गजर करा,
कारण इस्राएलचा पवित्र आणि थोर प्रभू तुमच्यामध्ये आहे. '
दुसरे वाचन फिलिपे ४:४-७
वाचक : पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभू समीप आहे."
प्रिय जनहो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा मी म्हणेन आनंद करा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रान्त होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राहील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे.
कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ३०:१०-१८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तर मग आम्ही काय करावे ?"
लोकसमुदायाने योहानला विचारले “तर मग आम्ही काय करावे ?” त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे." मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यावयास आले आणि त्याला म्हणाले, "गुरुजी, आम्ही काय करावे ?" त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका." शिपायांनीही त्याला विचारले, “आम्ही काय करावे." त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका आणि कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा.'तेव्हा लोक वाट पहात होते आणि हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण योहानविषयी आपल्या मनात विचार करीत होते. योहानने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील. आपले खळे अगदी स्वच्छ करण्यासाठी आणि गहू आपल्या कोठारात साठविण्यासाठी त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण भुसा तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील. आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे आणि लोकांना सुवार्तेची घोषणा करीत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आगमनकाळातील तिसरा रविवार हा उल्हास रविवार म्हणून साजरा केला जातो. धर्मगुरू पश्चात्तापाची जांभळी वसे परिधान न करता उल्हासाचे प्रतिक असलेली गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करतात. आजचे पहिले आणि दुसरे वाचन किमान २० वेळा आनंद, उल्हास, उत्सव व हर्ष असे शब्द वापरताना दिसतात. हा उल्हास साजरा करण्यासाठी ही वाचने एकूण तीन विचार आपल्यापुढे मांडतात :
१) न्यायाच्या दिवशी उल्हास खरे पाहता, सफन्याचे पुस्तक ईश्वरी न्यायाचा संदेश देणारे पुस्तक आहे. ख्रिस्ती उपासना वर्षाच्या तिन्ही चक्रांमध्ये (पहिले, दुसरे, तिसरे वर्ष) केवळ आजच्याच दिवशी सफन्याच्या पुस्तकातून वाचन घेण्यात आलेले आहे. इतरांसाठी जशी न्यायाचा दिवस भयप्रद असला तरी सियोन कन्येसाठी (म्हणजे इस्राएली लोकांसाठी) तो उल्हासाचा व आनंदाचा दिवस असेल. सफन्याचा संदेश ऐकून एका तरुणाचे इतके परिवर्तन झाले की तो एके दिवशी यहुदाचा राजा बनला. आणि त्याने जेरूसलेम मंदिराच्या परिसरात धार्मिक सुधारणा केल्या. त्याचे नाव आहे योशिया (२राजे २२-२४)
२) छळाच्या प्रसंगी उल्हास : संत पौल फिलिप्पै येथल्या लोकांना आनंद करा, उल्हास करा असे आवाहन करतो. खरे पाहता, हे लोक ख्रिस्तविरोधकांकडून छळ सहन करीत होते. त्याची सहनशीलता सर्वांना कळून यावी म्हणून पौल त्यांना आनंदात राहण्यास सांगतो. चिंता करण्याऐवजी प्रार्थना केली तर शांती लाभेल असेही तो सुचवितो. जे उत्कृष्ट व उदात्त आहे. त्याचा ध्यास घेतला तर जीवन सार्थकी लागेल अशी पौलची धारणा आहे.
(३) मशिहाच्या येण्याने उल्हास : योहान बाप्तिस्ताहा लोकांना विशेषतः लोकसमुदाय, जकातदार व शिपाई ह्यांना आपल्या जीवनात न्यायनीतीने वागावयाचे आवाहन करतो. प्रसंगी त्यांना धारेवर धरतो ते अशासाठी की, त्यांना मशिहाच्या आगमनाने उल्हास करता यावा. त्याच्या येण्याने नीतिमान व दुर्जन ह्यांच्यातील भेद (गहू व भूस) स्पष्ट होईल. नीतिमान उल्हास करतील तर दुर्जन थरथर कापतील.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचा आनंद आहे? शारीरिक, बौद्धिक, 3 भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक की आध्यात्मिक ? मशिहाच्या येण्याने मला आनंद व्हावा म्हणून मी कोणती पूर्वतयारी करीत आहे ?
प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्या आनंदात सहभागी होण्यास पात्र बनावेत म्हणून आम्हाला निर्मळ व शुद्ध बनव, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या