Marathi Bible Reading | Saturday 11th December 2021 Second Week of Advent |

      आगमनकाळातील दुसरा सप्ताह  

शनिवार 

 ११डिसेंबर २०२१ 

"पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले."



संत दमास्कस पहिले

परमगुरू, वर्तनसाक्षी (३०४-३८४) 

✝️   
 वैराग्याचे जीवन जगून पश्चात्तापाचा संदेश देणाऱ्या योहानाला एलिया असे संबोधण्यात आले आहे. पाण्याचा बात्पिस्मा देऊन योहानाने परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी त्या काळच्या जनतेला आवाहन केले. मात्र कठोर अंतःकरणाच्या लोकांनी त्याला ओळखले नाही. 
प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा व जीवन दाता आहे. ज्याने आपल्या क्रुसावरील समर्पणाद्वारे सर्व प्रकारच्या बंधनातून आपल्याला मुक्त केले आहे. जो आपली काळजी वाहतो त्याच्या  स्वर्ग राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरणा देतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखले आहे का ?
आजच्या पहिल्या वाचनात एलिया संदेष्टा पुन्हा येईल असे भाकित करण्यात आले आहे. एलिया हा इस्त्राएलातील एक महान संदेष्टा होता. अवर्षण दुष्काळात रानातील कावळ्यांनी एलियाला अन्न पुरविले होते. वावटळीतून तो वर स्वर्गात घेतला गेला (१ राजे १९:१९-२१) हाच एलिया प्रभू येशूच्या  रुपांतराच्या वेळी ताबोर पर्वतावर प्रकट झाला होता. व दुष्काळाविषयी त्या काळच्या आहाब राजाला त्याने संदेश दिला होता.
प्रभू येशूच्या आज्ञेत राहून त्याच्या वचनानुसार खरे ख्रिस्ती जीवन जगण्याचा आपण निर्धार करु या. प्रभू येशू पुन्हा येणार आहे, त्याला कोणत्याही क्षणी सामोरे जाण्यास आपण आपल्या मनाची तयारी करु या. तो पुन्हा येईल. ह्या आशेवरच आपण त्याच्या पुनरुत्थानाचे सहभागिदार बनणार आहोत हे स्वीकारु या.

पहिले वाचन बेन सिरा  ४८:१-४,९-११
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"एलिया पुन्हा येईल.”
एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि तीन वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास !
अग्नीच्या चक्रवातामधून, ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की, देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुनः प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील जे प्रेमाने नटवले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८०:२-३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद :  प्रभो, आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे.
करुबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा,
आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. 
तुझा पराक्रम गाजव आणि 
आमचा उद्धार करायला धावून ये. 

२) हे सर्वसमर्थ देवा, मागे फीर, 
स्वर्गातून नजर टाकून बघ. 
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने 
लावलेल्या रोपाची काळजी घे. 

३ ) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी 
समर्थ केलेल्या मानवावर 
तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही
 तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. 
आम्हांला नवजीवन दे
म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. 
पाहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे. 
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  १७:१०-१३

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला कधीच ओळखले नाही."

पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, “मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत ?"
येशूने उत्तर दिले, "एलिया येईल आणि सारे काही स्थिरस्थावर करील, पण मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल." येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहान विषयी बोलत आहे हे तेव्हा कोठे शिष्यांच्या लक्षात आले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआजची दोन्ही वाचने एलिया संदेष्ट्याचा उल्लेख करतात. यहुदी समाजात एलिया संदेष्ट्याच्या आगमनाविषयी खूप उत्सुकता होती. बाळाच्या सुंतेविषयी रिकामी खूर्ची ठेवून आजही यहुदी लोक प्रार्थना करीत असतात. 'एलिया लवकर ये म्हणजे आम्हाला मशिहाचे दर्शन घडेल.' वंल्हाडण सणाचा शेवटचा द्राक्षारस प्याला पिण्याअगोदर घरधनी छोट्या मुलाला घराचा दरवाजा उघडण्यास आणि एलिया आला आहे का हे पाहाण्यास पाठवितात. मुलाचे उत्तर नकारार्थी आल्यानंतरच तो शेवटचा प्याला प्राशन केला जातो. ख्रिस्ती धर्मियांसाठी संत योहान बाप्तिस्ताच्या रूपात एलिया आलेला आहे. त्याने आपल्या जन्माने व दुःखसहनाने येशूच्या आगमनाची सुवार्ता घोषविली.

प्रार्थना:- हे प्रभू येशू, अंतर्मनाने तुला ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे   आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या