Marathi Bible Reading | Friday 10th December 2021 Second Week of Advent |

     आगमनकाळातील दुसरा सप्ताह  

शुक्रवार 

 १०डिसेंबर २०२१ 

"ज्या मार्गाने तुम्ही जायला हवे त्या मार्गाने मी तुम्हांला नेतो."

लॉरेटाची धन्य कुमारी मारिया माता 

✝️
  योहान बाप्तिस्ता अज्ञात वासात राहून अगदी साधे जीवन जगत होता, तर प्रभू येशू ख्रिस्त पापीजनांचा मित्र बनला. म्हणून त्या दोघांविषयी त्या पीढीच्या लोकांमध्ये निराशा होती. तसे पाहता योहान बाप्तिस्ताने  तारणाऱ्याचा मार्ग दाखविला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची सुर्वाता  पसरविली, पण लोक मात्र त्यांच्या जीवनशैलीने समाधानी झाले नाहीत. त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन हे प्रवाहाच्या विरुद्ध असल्याचे लोकांना जाणवत  होते. 
आपण चिंतन करुया की त्याकाळच्या पीढीप्रमाणेच आजची पीढीसुद्धा देवराज्याची शिकवण आत्मसात करायला तयार नाहीत. प्रेम, सेवा, क्षमा, समेट, शांती व इतर जीवनमुल्ये जीवनात उतरविण्यास कठीण वाटतात.
जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि आनंदित परिवर्तनासाठी परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. नीतिमुल्ये व आध्यात्मिकता अंगिकारल्यावरच परमेश्वराचा आशीर्वाद लाभत असतो. 

ख्रिस्तसभा आज लोरेटोची धन्य कुमारी मरिया माता हिचा सन्मान करीत आहे. लोरेटोचे तिर्थस्थान युरोपमधील लूर्डस् आणि फातिमा ह्या नंतर तिसऱ्या स्थानावर येते. १२९१ साली धर्मयुद्धानंतर १० डिसेंबर १२९४ साली नाझरेथातून ध.कु. मरियेच्या घरांचे अवशेष आणि इतर पवित्र वस्तू लोरेटो येथे आणल्या गेल्या. ह्याच घरात गाब्रियल दुताने मरियेला दर्शन दिले होते. रोम पासून तिन तासांच्या अंतरावर असलेल्या ह्या तिर्थस्थानाची स्थापना १९९८ साली झाली. ख्रिस्ती श्रद्धा जोपासून तिची भरभराट करण्याचे ते एक महत्वाचे  स्थान निर्माण झाले आहे. 


पहिले वाचन यशया ४८:१७-१९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरविले असते तर किती छान झाले असते."

तुमचा उद्धारकर्ता इस्राएलचा पवित्र प्रभुदेव असे म्हणतो, “मी तुमचा प्रभुदेव आहे. तुमच्यासाठी जे हितकारक असेल त्याचेच मी तुम्हांला शिक्षण देतो. ज्या मार्गाने तुम्ही जायला हवे त्या मार्गाने मी तुम्हांला नेतो.
माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरवले असते तर किती छान झाले असते. मग निरंतर वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुम्हाला शांती लाभली असती. तुमची सात्त्विकता सागराच्या लाटांप्रमाणे भरून वाहिली असती.
तुमचा वंशविस्तार वाळूसारखा विपुल झाला असता तुमची संतती रेतीच्या कणांसारखी अगणित झाली असती त्यांचा नाश व्हावा किंवा नावनिशाणी मिटावी असे मी घडू दिले नसते." 
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १:१-४,६
प्रतिसाद :  प्रभो, तुझ्यामागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. 

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही,
पापीजनांच्या वाऱ्याला उभा रहात नाही, 
किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, 
उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, 
त्याच्या धर्मशास्त्राचे रांत्रदिवस मनन करतो तो धन्य

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते, 
यथाकाळी त्याला बहर येतो, 
त्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो असतो.
 तो हाती घेतो ते सर्व सफळ होते.

३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
पाहा, आपला राजा, 
जगाचा मालक येईल. 
तो आपल्याला दोरखंडाच्या बंधनातून मुक्त करील 
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  ११:१६-१९

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“त्यांनी योहानचे ऐकले नाहीच परंतु परमेश्वरपुत्राचेसुध्दा त्यांनी ऐकले नाही."

येशू म्हणाला, “या पिढीची मी कोणाशी तुलना करू ? चावडीवर जमलेली मुले आपल्या सवंगड्यांना म्हणतात, 'आम्ही बासरी वाजविली पण तुम्ही नाचला नाही, आम्ही विलापगीत गायले पण तुम्ही शोक केला नाही.' त्याप्रमाणे ही पिढी आहे. 
कारण योहान आला त्याने उपवास केला आणि द्राक्षरस घेतला नाही, तर सगळे म्हणतात 'त्याला भूत लागले आहे' मानवपुत्र आला आणि तो खातोपितो तर सगळे म्हणतात, 'बघा, कसा खादाड आणि दारूबाज आहे, हा नोकरदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे.' पण देवाचे ज्ञान रास्त आहे हे खऱ्या ज्ञान्यांच्या कृत्यांवरून पटते."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआजच्या शुभवर्तमानात लोकगीते व शोकगीते गाण्याच्या यहुद्यांच्या परंपरेचा आधार घेत येशू तात्कालीन पिढीचा तठस्थ मनोवृत्तीविषयी आश्चर्य व्यक्त करतो. यहुदी समाजात लग्नसमारंभासाठी खास गाणी गाणाऱ्याचा गट बोलावला जाई. येशू हा प्रतिकारकरित्या स्वर्गराज्यातला वर पृथ्वीतलावर अवतरला. परंतु यहूदी समाजाने त्याबद्दल जल्लोष केला नाही. याउलट त्याच्यावर शिंतोडे उडवले. यहुदी समाजात अत्यंविधीसाठी पावा वाजविणारे व विलापगीते गाणारे त्यांचे गट बोलावले जात. योहान बाप्तिस्ताने पश्चात्तापाचा संदेश देऊन परमेश्वर आपल्यासाठी कसा शोक करीत आहे हे सूचित केले. परंतु यहूदी समाजाने त्याची संभावना केली. तटस्थ राहिल्यामुळे त्यांना खरे ज्ञान लाभू शकले नाही.

प्रार्थना:- हे पवित्र माते, तुझ्या विश्वासामुळे आणि आज्ञाधारकपणामुळे आम्हाला देवाचे दर्शन घडले. आम्हासाठी तुझ्या पुत्राकडे विनंती कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या