आगमनकाळातील दुसरा सप्ताह
गुरुवार
९ डिसेंबर २०२१
"यहोनापेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही."
संत पीटर फोरिअर
वर्तनसाक्षी (१५६३-१६४०)
✝️
परमेश्वराने भीतीने आणि संकटांनी ग्रासलेल्या त्रस्त लोकांना त्यातून बाहेर काढले आहे.
आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ताच्या जीवनाचे महत्व पटवून देताना प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे शब्द वापरत आहे. ही महानता, श्रेष्ठता किंवा कनिष्ठता कोणत्याहि वैभव, सत्ता अथवा प्रसिद्धिच्या मार्गाने मोजता येत नाही तर जीवन जगण्याचा आणि तेही परमेश्वराच्या योजनेनुसार जगण्याचा एक दृष्टिकोन आहे. योहान बाप्तिस्ता श्रेष्ठ होता त्याची श्रेष्ठता त्याच्या महान कार्यात नसून त्याने येशू ख्रिस्ताच्या येण्याने घेतलेल्या नम्रतेमध्ये आहे. योहानाने स्वत:ची अशा ओळख करुन दिली होती की तो केवळ वाणी असून त्याच्या मागून येण्याच्या पेक्षा तो स्वत: कनिष्ठ आहे. योहानने खूप महान कार्य करुन सुद्धा प्रभू येशूसमोर तो नतमस्तक बनला. त्याने देवराज्यासाठी अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. योहानचा आणखी महत्वाचा गुण म्हणजे तो धाडसी, निडर आणि स्पष्टवक्ता होता. त्याने न डगमगता प्रभू येशू साठी मार्ग तयार केला.
प्रभू येशूच्या आगमनासाठी आपण सज्ज बनत असताना इतरांनासुद्धा हा संदेश देऊन त्यांना सुवार्तेची ओळख करुन देऊ या.
पहिले वाचन यशया ४१:१३-२०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी इस्राएलचा पवित्र प्रभू तुमचा उद्धारकर्ता आहे."
मी प्रभू तुझा देव तुझा उजवा हात आपल्या हाती धरून आहे आणि मीच तुला सांगत आहे की, तू भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करीन.
हे क्षुद्र याकोब हे दीन इस्राएल, तू भिऊ नकोस. मी इस्राएलचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारकर्ता, तुमच्या मदतीला धावून येईन. प्रभूचे हे बोल आहेत.
बघ मी तुला नवीन तीक्ष्ण अनेक दात असलेले मळणीचे यंत्र बनवीत आहे. तू डोंगराची मळणी करून त्यांचा चुराडा करशील. टेकड्यांचा तू भुगा करशील.तू त्यांना उफणशील आणि वाऱ्यावर ते उडून जातील.
वावटळ त्यांना उधळून लावील. मग प्रभूठायी तू उल्हास पावशील आणि इस्राएल पवित्र प्रभूचा अभिमान बाळगशील.
जेव्हा दीन आणि दरिद्री जनांना पाण्याची तहान लागेल आणि ते मिळणार नाही जेव्हा त्यांची जीभ तहानेने कोरडी पडेल तेव्हा मी प्रभू स्वतः त्यांची विनंती ऐकेन. मी इस्राएलचा देव त्यांचा त्याग करणार नाही मी उजाड टेकड्यांवर नद्या आणि खोल दऱ्यांतून झरे वाहवीन, जेथे वाळवंट आहे तेथे मी पाण्याचे तळे बनवीन निर्जन प्रदेशात झरे उत्पन्न करीन. वाळवंटात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी आणि कण्हेर यांची लागवड करीन. कोरडवाहू जमिनीत वन निर्माण होईल. सुरू, देवदारू आणि भद्रदारू यांची वने तेथे फोफावतील. लोक ते पाहतील आणि समजतील की, प्रभूने असे केले आहे. ते विचार करतील आणि त्यांना कळेल की इस्राएलच्या पवित्र प्रभूची ही निर्मिती आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४५ :१,९-१३
प्रतिसाद : प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे.
१)माझ्या देवराया, मी माहात्म्य वर्णीन,
सदासर्वदा तुझ्या नामाचा महिमा गाईन.
प्रभू सर्वांशी चांगला आहे त्याने निर्मिलेल्या
सर्वावर त्याची दयादृष्टी असते.
२) हे प्रभो, सर्व प्राणिमात्र तुझे स्तवन करतात.
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
३) हे परमेश्वरा, तुझ्या राज्याचे ऐश्वर्य ते वर्णितात.
तुझा पराक्रम ते कथन करतात..
तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे
शाही वैभव ते मानवजातीला जाहीर करतात.
४) तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य.
तुझी सत्ता पिढ्यान्पिढ्या टिकते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो शांतीचे वरदान घेऊन आमच्याकडे ये,
म्हणजे आम्ही सोज्वळ हृदयांनी तुझ्या
सान्निध्यात आनंद आणि जल्लोष करू
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ११:११-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ११:११-१५
“योहानपेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही.' "
येशू लोकसमुदायाला म्हणाला, "मी तर खरेच सांगतो, स्त्रीच्या पोटी आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानच्या काळापासून तर या घटकेपर्यंत स्वर्गराज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत, कारण योहानच्या काळापर्यंत सर्व संदेष्ट्यांनी आणि धर्मशास्त्राने संदेश दिले आणि हे मान्य करायची तुमची इच्छा असेल तर येणार असलेला एलिया तो हाच आहे; ज्याला ऐकायला कान असतील त्याने ऐकावे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च- नीच, गरीब श्रीमंत, ह्यांचे मोजमाप मनुष्य एका विशिष्ट पद्धतीने करतो. बहुधा त्यासाठी पैसा, सत्ता, विद्वत्ता, सौंदर्य, प्रसिद्धी, सामर्थ्य ह्यांचे निकष लावतो. परमेश्वर मात्र त्याच्या योजनेचे निकष लावतो. स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्यांमध्ये योहानाला श्रेष्ठ गणण्यात आले. कारण तो मसिहाचा अग्रदूत बनला. मात्र ज्या देवराज्यांची पूर्वतयारी त्याने केली ते पाहण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. उलट देवराज्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याला तुरुंगात जावे लागले. परंतु जे देवराज्य स्थापनेचे साक्षीदार बनले (कनिष्ठ हा शब्द प्रेषितांसाठी वापरलेला आहे) ते योहानापेक्षाही श्रेष्ठ मानण्यात आले. आगमनकाळात आपण योहानाप्रमाणे एलिया बनून मशिहाचा मार्ग तयार करायचा असतो. परंतु केवळ पूर्वतयारीपर्यंत थांबायचे नसते. देवराज्यात प्रवेश करण्यासाठी धडपडायचे असते. त्यातच श्रेष्ठत्व दडलेले आहे.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, धैर्याने जीवनाला सामोरे जाण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला शक्ति दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या