आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याद्वारे म्हटले आहे, 'मीच परमेश्वर, प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे, हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.' अशाप्रकारे देवाचे ह्या जगातील अस्तित्व अबाधित व अधिष्ठित आहे. यशयाने दिलेला हा संदेश देव किती सामर्थ्यशाली आहे ह्याची जाणीव करून देतो.
प्रभू येशूने प्रत्यक्ष घडणाऱ्या अद्भूत कृत्यांचीसाक्ष दिली. प्रभूने म्हटले, 'आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, बहिरे ऐकतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगितली जाते.' अप्रत्यक्षपणे प्रभूने जाणीव करून दिली की जे घडत आहे ते हेच दर्शविते कि तारणारा आलेला आहे. यशयाने केलेली भविष्यवाणी पूर्णत्वास गेलेली आपण पाहतो. प्रभू येशू आजसुद्धा अनेकांच्या जीवनात अद्भूत कृत्ये करीत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व त्याला तारणारा म्हणून स्वीकारणाऱ्या सर्वांना तो जीवनदान देत आहे.
आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्व अनिष्टांपासून आपले रक्षण व्हावे. आपले परिवर्तन व्हावे आणि प्रभूच्या कृपेचा महान अनुभव आपल्याला यावा म्हणून आपण अंतर्मुख बनून प्रभूला सर्वस्वी शरण जाऊ या.
पहिले वाचन यशया ४५: ६-८,१८,२१,२५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे आकाशा, वरून वृष्टी कर."
प्रभू म्हणाला, "मीच प्रभू आहे, माझ्याशिवाय अन्य कोणी देव नाही. प्रकाशाचा जनक मीच आणि अंधकाराचाही जनक मीच. कल्याण मीच करतो आणि अरिष्टही मीच आणतो. ह्या साऱ्या गोष्टी करणारा मी प्रभू आहे. हे आकाशा, वरून वृष्टी कर. धार्मिकतेचा पाऊस पाड, हे पृथ्वी, तू उघड, म्हणजे तारण आणि धार्मिकता ही रोपाप्रमाणे उगवतील. ह्या सर्वांचा जनक मी प्रभू आहे." आकाशाचा उत्पन्नकर्ता देव प्रभू आहे. त्यानेच पृथ्वी बनवली. तिला आकार दिला आणि भक्कम केले. त्याने तिला उत्पन्न केले ते ती निर्जन राहावी म्हणून नव्हे तर लोकांनी तिच्यावर वस्ती करावी म्हणून. तेव्हा तो असे म्हणतो, "मी प्रभू आहे. माझ्याशिवाय न्यायी आणि तारणकर्ता इतर कोणी देव नाही. "
पृथ्वीवरल्या सर्व लोकांनो, तुम्ही माझ्याकडे वळा आणि आपला उद्धार करून घ्या. “कारण मी अनन्य देव आहे. मी स्वतः ची शपथ घेऊन सांगतो की, प्रत्येकजण माझ्यापुढे गुडघा टेकवील आणि माझ्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ आपल्या तोंडाने वाहील " माझ्या मुखातून सात्त्विकपणे निघालेला हा शब्द आहे त्यात बदल होणार नाही.
“न्यायनीती आणि सामर्थ्य केवळ प्रभूपाशीच आहे, असे माझ्यासंबंधी म्हणतील. ज्यांनी माझा द्वेष केला, ते लज्जित होऊन मला शरण येतील. प्रभूकडूनच इस्राएलच्या वंशजांना विजय आणि वैभव मिळेल."
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान लूक ७:१६-२३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा."
योहानने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले की, "जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पहावी ?" ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? त्याच घटकेला येशूने पुष्कळ लोकांना रोग, पीडा आणि वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. मग त्याने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा, आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजही अनेक लोकांच्या बाबतीत असे घडते की, जेव्हा सर्वकाही नीटनेटके, स्थिरस्थावर असते, सगळीकडे उजेडच उजेड दिसतो तेव्हा त्यांना वाटते आम्हांला खरोखर ख्रिस्त सापडेला आहे, तो आपला मित्र आहे असे ते मानतात, त्यांची अतःकरणे आनंदाने ओतप्रोत भरून जातात. पण पुढे अडचणी येतात. सारे काही आपल्या विरोधात आहे असे वाटते तेव्हा मग त्यांना प्रश्न पडतो, तारणारा आम्हाला खरोखर सापडला आहे का? ते स्वतःच्याच अनुभवाविषयी संशय घेऊ लागतात. पण योहानाची शंका कशी अनाठायी होती ते पहा, येशू खरोखरच ख्रिस्त- मशीहा होता. योहानाने प्रत्यक्ष करायचे कार्य आता संपले होते. आता क्लेश सोसून आणि लवकरच प्राणार्पण करून त्याने देवाचे गौरव करायचे होते. ख्रिस्ती लोकांनीही त्यांच्या निराशेच्या काळात चिंता करणेही अनाठायी आहे. या जगात काही अडचणींना, संकटांना तोंड देणे आपणाला भागच आहे. ख्रिस्त आम्हांला फुलांच्या सुखशय्येवर बसवून स्वर्गात नेत नाही, नेणार नाही. आपणाला अनेक मैलक्रूस वाहून नेला पाहिजे हे कायम लक्षात ठेवावे. आणि येशूविषयी कधी संशय न घेणे हाच आमच्या खऱ्या हिताचा मार्ग आहे.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, आमच्या जीवनात ये आणि आमच्या जीवनाचा ताबा घे, आम्हाला सर्व पापांपासून दूर कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या