परमेश्वर इस्त्राएली जनतेला आपल्या त्यांच्यावरील शाश्वत प्रीतिची जाणीव करून देत आहे. परमेश्वर इस्त्राएलला, आनंद करण्यास व निश्चिंत राहण्यास सांगून धीर देत आहे.
परमेश्वराच्या त्याच शाश्वत प्रेमाचा आणि दयेचा साक्षात्कार| घडविण्यासाठी त्याने आपला एकुलता पुत्र ह्या जगात पाठविला. प्रभू येशूच्या आगमनाने नवजीवनाची पहाट सर्वांच्या जीवनात उगवली. प्रभूने आपल्या वाणीने आणि स्पर्शाने सर्व दुःखे, आजार आणि पापांचा नायनाट केला. त्याच तारणाऱ्या प्रभू येशूच्या आगमनकाळात आपण आहोत. आपण येशूचे आपल्या जीवनात, कुटुंबात व समाजात कसे स्वागत करणार आहोत ह्यावर चिंतन करू या.
परमेश्वर जो प्रेमाचा, दयेचा व करूणेचा महासागर आहे, त्याच्या कृपेचा स्पर्श आपल्याला व्हावा आणि जाणीवपूर्वक त्याला आपल्या जीवनात स्वीकारण्यासाठी आपण योग्य ती तयारी करावी म्हणून प्रयत्नशील राहू या.
पहिले वाचन यशया ५४: १-१०
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे."
"मूल न झालेल्या वंध्ये, आनंदाने गजर कर. ज्या तुला प्रसूतिवेदना माहीत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर.. आनंदाची आरोळी मार. कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा टाकलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेऱ्याची जागा वाढव. आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे. अटकाव करू नको. आपल्या दोऱ्या लांब कर. मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे आणि डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील आणि उजाड झालेली नगरे वसतील."
“भिऊ नको. तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको. तू फजीत होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव. इस्राएलचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. टाकलेल्या आणि दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले, पण मी तुझ्यावर दया करून. तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन." असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.
"नोहाकालीन जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो. नोहाकालीन जलप्रलय भूमीवर पुनरपि येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटवणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. माझा शांतीचा करार हालणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान लूक २१:२७-३२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"योहान हा प्रभूचा मार्ग तयार करणारा दूत आहे."
योहानचे निरोप्ये गेल्यावर येशू योहानविषयी लोकसमुदायाला म्हणू लागला, "तुम्ही काय पाहायला रानात गेला होता ? वाऱ्याने हालविलेला बोरू काय ? तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय ? पहा, उंची पोषाख करणारे आणि चैन करणारे राजवाड्यात असतात. तर मग तुम्ही काय पाहायला गेला होता ? संदेष्ट्याला काय ? मी तुम्हांला सांगतो, हो, संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. पहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापढे तुझा मार्ग सिद्ध करील. असे ज्याच्याविषयी लिहिलेआहे तो तोच आहे. मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ट तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” आणि जकातदारांसह सर्व लोकांनी हे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परुशी आणि शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: हे चित्र आहे अस्थिर आणि चंचल मनुष्याचे, तो वारा येईल तशी पाठ फिरवतो. त्याला सरळ राहताच येत नाही. तो नेहमी वाकलेला असाच असतो. बरेचसे लोक असेच आहेत. काही लोक बोरुसारखे असतात. ख्रिस्तामध्ये मुळावून दृढ राहण्याऐवजी ते या जगातल्या नरम चिखलात मुळावतात आणि मग सहज उखडले जातात. त्यांना ताठ उभे राहण्यास मजबूत व नेकदार करणारी अशी दृढ, निश्चित तत्वेही नसतात. म्हणूनच वाऱ्याच्या लहरीनुसार ते वाकतात, जरा भय वाटले की ते इकडे झुकतात, कोणी काही देतो म्हटले तर ते सरळ त्याच्याकडे वळतात. जगातल्या नकली दिखावा, डामडौलाला आणि नखऱ्याला भुलून ख्रिस्तापासून दूर गेलेली सुंदर शांत जीवनाला सारखी झालेली मुले देखील वाऱ्याने हलवलेला बोरूच आहे.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, आमच्या जीवनातील सर्व प्रसंगी जागृत राहून अंती तुला भेटण्यास आम्ही उत्सुक असावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या