योहानच्या अकराव्या अध्यायात बेथानी येथील मार्था आणि मरिया ह्यांचा भाऊ लाझरस ह्याला मेलेल्यांतून जिवंत करण्याचा चमत्कार प्रभू येशूने केल्याचे विस्तृत वर्णन करण्यात आलेले आहे. मृतांतून पुन्हा उठविल्या गेलेल्या प्रभूच्या ह्या मित्राविषयी बायबलमध्ये आणखी काहीही माहिती उपलब्ध नाही. काही इतिहासकारांच्या मते तो संत पीटरबरोबर सिरिया येथे गेला.
ख्रिस्ती परंपरेनुसार यहुदी लोकांनी त्याला त्याच्या बहिणींसह एका गळत्या बोटीमधून जाफ्फाला पाठविले आणि केवळ दैवी सामर्थ्यामुळे हे कुटुंब सायप्रसच्या बेटावर सुखरूपपणे पोहोचले. तिथे उपलब्ध असलेल्या अहवालानुसार तो किती ऑन शहराचा महागुरू झाला आणि तीस वर्षांच्या यशस्वी सेवाकार्यानंतर अगदी शांतीने मरण पावला. इ.स. ८९० साली सम्राट लिओ चौथे ह्यांनी त्याच्या सन्मानार्थ एक चर्च बांधले व एक मठ उभारला. त्याचे ऊर्वरित अवशेष सायप्रस येथून कॉन्स्टॅन्टिनोपल शहरात हलविले.
प्रॉव्हेन्स येथे संत मेरी माग्दालेनाविषयी जी दंतकथा प्रसिद्ध होती तिच्या संदर्भात पाश्चात्य ख्रिस्तसभेमध्ये लाझरसच्या घटनेची आठवण करण्यात आली.. पोप बेनेडिक्ट नववे ह्यांनी एका पत्रात लिहिल्याप्रमाणे लाझरसला एका यंत्रविरहित बोटीमध्ये त्याच्या बहिणीसह बसविण्यात आले आणि गॉल देशाच्या वायव्येला सोडण्यात आले. तिथे त्याने मार्सेलिअस ह्या ठिकाणी हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. तिथेच त्याला महागुरूपद बहाल करण्यात आले आणि डॉमिशिअन राजाच्या कारकीर्दीत त्याला रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. त्याला एका गुहेमध्ये पुरण्यात आले त्याच्यावरच पुढे संत व्हिक्टरच्या नावाने एक गुरूविद्यालय उभारले गेले.
तेथून त्याचे अवशेष ऑटन येथे नेण्यात आले आणि इ.स. १९४६ साली नवीन कॅथिड्रलमध्ये त्याचे अवशेष सन्मानाने भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. येरूशलेममध्ये प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत लाझरसची स्मृती भक्तीभावाने साजरी केली जात असे. पुढे ती संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेत साजरी केली जाऊ लागली. मानवाची अपूर्णता आणि देवाचे सामर्थ्य ह्याचं प्रतीक म्हणजेच संत लाझरसचे जीवन होय .
यहुदाच्या कुळात तारणाऱ्याचा जन्म होईल व त्याची प्रतिक्षा लोक करतील ह्याचा इतिहास आपणासाठी देण्यात आला आहे. तो युगायुगाचा याजक होणार असल्यामुळे अहरोनच्या कुळातील याजकपण, त्याची प्रतिष्ठा व सन्मान आपण इतिहासात अनुभवू शकतो. ख्रिस्त राजांचा राजा होता हे दावीदाच्या कुळातील राजाची लांबलचक परंपरा पाहिल्यावर आपल्याला कळते. तारणाचा इतिहास हा प्रभूयेशू ख्रिस्ताच्या जीवनाशी निगडीत घटकांचा व घडामोडींचा इतिहास आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या बेचाळीस पिढ्या आणि त्यांच्याशी संबंधीत सर्व । घटनांवर चिंतन करीत असताना परमेश्वराचे त्याच्या तारणदायी योजनेबद्धल आभार मानू या, व त्याची सुर्वाता सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु या.
पहिले वाचन उत्पत्ती ५०:२,८-१०
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही.'
याकोबने आपल्या मुलांना बोलावले व म्हटले, "याकोबच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका. तुमचा बाप इस्राएल याच्याकडे कान द्या. हे यहुदा, तुझे बंधू तुला धन्यवाद देतील. तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुटी धरील.
तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा, सिंहणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील."
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान मत्तय १:१-१७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:१-१७
"दावीदचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यापर्यंतची वंशावळ."
आब्राहामचा वंशज येशू ख्रिस्त, ह्याची वंशावळ : आब्राहाम हा इसहाकचा बाप, इसहाक याकोबचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहुदा, पेरेस आणि जेरह याचा बाप (यांची आई तामार) पेरेस हेसरोनचा, हेसरोन रामचा, राम अम्मीदाबचा, अम्मीनादाब नहशोनचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजचा बाप (बवाजची आई राहाब), बवाज ओबेदचा बाप (ओबेदची आई रुथ) ओबेद इशायचा आणि इशाय राजा दावीद याचा बाप.
दावीद शलमोनचा बाप होता (शलमोनची आई पूर्वी उरियाची बायको होती). शलमोन रहबामचा, रहबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यहोशाफाटचा, यहोशाफाट योरामचा योराम उज्जियाचा, उज्जिया योथामचा, योथाम आहाजचा, आहज हिज्कियाचा, हिज्किया मनश्शेचा, मनश्शे आमोनचा, आमोन योशियाचा योशिया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप, या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले. बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर: यखन्या शलतीएलाचा बाप, शलतीएल जरुब्बाबेलचा, जरुब्बाबेल अबिहूदचा, अबिहूद एल्यकीमचा, एल्याकीम अज्जूरचा, अज्जूर सादोकचा, सादोक याखीम एलिहूदचा, एलिहूद एलाजारचा, एलाजार मत्तान, याकोबचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.अशारीतीने आब्राहामपासून दावीदपर्यंत एकंदर चौदा पिढ्या, दावीदपासून बाबिलोन येथे हद्दपार होईपर्यंत चौदा पिढ्या, बाबिलोन येथे हद्दपार झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या झाल्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जीवनात आपण प्रत्येकजण पूर्ण-अपूर्ण ह्या वाटेवर जणू प्रवास करीत असतो. प्रत्येकजण अपूर्ण आहे आणि परिपूर्णतेकडे आपली वाटचाल चालू आहे. श्रद्धेच्या प्रवासाचे देखील असेच असते. अब्राहामच्या काळापासून सुरू झालेला प्रवास येशूपर्यंत पोहचला तो खाचखळग्यातून आणि | आडवळणांतून प्रभू येशूच्या वंशावळीमध्ये नमूद करण्यात आलेल्या तामार, राहाब, रुथ आणि बाथशिबा ह्या स्त्रियांच्या जीवनावरून ह्या प्रवासातील अपूर्णता स्पष्ट होते. मात्र मरियेचा उल्लेख करून संत मत्तय आध्यात्मिक परिपूर्णता सूचित करतो. चौदा पिढ्यांचे तीन गट मत्तय सादर करतो. सात हा जर परिपूर्ण आकडा मानला तर चौदा ही दुप्पट परिपूर्णता आणि चौदा गुणिले तीन म्हणजे बेचाळीस पिढ्या. तीन हा आकडा त्रैक्यस्वरूप परमेश्वराशी संबंधित असल्यामुळे इथे ही आध्यात्मिक परिपूर्णता अपेक्षित आहे. मानवाची वाटचाल मात्र अपरिपूर्णतेतून परिपूर्णतः असावी.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्या आगमनाची वाट पाहत असताना तुला आमच्या अंतःकरणात स्वीकारण्यास पात्र बनावेत म्हणून तुझी कृपा दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या