सामान्यकाळातील पाचवा सप्ताह 

शनिवार  

 दि. १२ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “मला ह्या लोकांचा कळवळा येतो” 


संत गौडेन्शिअस
- महागुरू, वर्तनसाक्षी (३६०-४२७)
✝️

प्रभू येशने त्याच्या मागोमाग येणाऱ्या व आध्यत्मिक भोजनाची आस  लागलेल्या हजारो माणसांना पोटभर अन्न दिल्याचे चारही शुभवर्तमानात  आढळून येते. पाच भाकरी व दोन मासे घेऊन पाच हजारांपेक्षा जास्त माणसांना येशूने भोजन दिल्याचे चारही शुभवर्तमानात आढळून येते. मात्र सात भाकरी आणि काहीं मासे ह्यांचे चार हजारांना भोजन देऊन उरलेल्या सात पाट्या जेवण ह्या चमत्काराची नोंद मत्तय (१५:३२-२७) व मार्क (८:१-२०) ह्या । शुभवर्तमानात आढळते.

प्रभू येशूने केवळ शारीरिक नव्हे तर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांची आध्यात्मिक भूक भागविली. कारण ते सर्व जेवून तृप्त झाले. तृप्तता ही शरीराची नसते तर मनाची व अतःकरणाची तृप्तता त्यांना लाभली. त्यानंतर आपण पाहतो की बरेचसे अन्न उरले व त्यांनी ते गोळा केले. ह्याचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे भोजनासाठी अनेकांना बोलविले होते परंतु ते आले नाहीत. परमेश्वर सर्वांना त्याच्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास बोलवित असतो. दुसरा अर्थ असा की देवाच्या आशीर्वादाने सर्व बाबतीत विपुलता येते. देवाच्या आशीर्वादाने माणसांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. ह्या चमत्काराचे खरे पूर्णत्व पवित्र ख्रिस्त शरीर साक्रांमेन्तात झाले आहे. प्रभूने म्हटलेच आहे, 'मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यवर विश्वास ठेवतो त्याला कघीही तहान लागत नाही' (याहोन ६-३५).
आपली भूक शमविणारा, तहान भागविणारा व आपल्या गरजा, आकांक्षा व इच्छा तृप्त करणाऱ्या प्रभूच्या राजासनाजवळ मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होऊ या. 

✝️   

पहिले वाचन राजा १२:२६-३२; १३:३३-३४
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"यराबामने सोन्याची दोन वासरे तयार केली. "
यराबाम आपल्या मनात म्हणाला, “हे राज्य दावीदच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे, लोक येरुशलेमला यज्ञ करावयास गेले तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल आणि ते मला जिवे मारून पुन्हा यहुदाचा राजा रहबाम याचे पुनः होतील." म्हणून राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची दोन वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे येरुशलेमला जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्राएला, ज्या देवांनी तुला इजिप्त देशातून आणले तेच हे पाहा." त्याने एका वासराची बेथेल येथे आणि दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापास कारण झाली, कारण दानापर्यंतचे लोक ह्यांपैकी एका वासराच्या दर्शनाला जाऊ लागले. त्याने उच्चस्थानी मंदिरे बांधली आणि सर्व लोकांतून याजक नेमले, ते लेवीचे वंशज नव्हते. मग यराबामने आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यहुदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवरील होमबली अर्पिले; त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासराप्रीत्यर्थ यज्ञ केले आणि आपण केलेल्या उच्चस्थानांच्या याजकांना बेथेल येथे ठेवले.

एवढे झाले तरी यराबामने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही, त्याने उच्चस्थानांचे याजक सगळ्या लोकांतून नेमले; आपण उच्चस्थानाचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यांना त्याने संस्कार केला. या गोष्टीने यराबामच्या घराण्या पाप लागले आणि याचा परिणाम म्हणून त्याचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०:६ - ७, १९-२०, २१ २२
प्रतिसाद :  हे देवा,तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर.

१)आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे; 
आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. 
आमच्या पूर्वजांनी इजिप्त देशात असताना तुझ्या 
अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही. 

२) त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, 
ओतीव मूर्तीची पूजा केली. 
त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी 
गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली.

३) ते आमच्या उद्धारक देवाला विसरले; 
त्याने इजिप्त देशात महत्कृत्ये, 
हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, 
तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, 
माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:१-१०

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी पाठवून दिले तर ते वाटेने कासावीस होतील, त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत." त्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात ते तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या ?” त्याने त्यांना विचारले, “तुम्हांजवळ किती भाकरी आहेत?" ते म्हणाले, “सात." नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसावयास सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या आणि उपकारस्तुती करून त्या मोडल्या आणि वाढण्याकरिता आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि त्यांनी लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यांना त्यांनी आशीर्वाद देऊन तेही वाढायला सांगितले. ते जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू आज चार हजार लोकांना भोजन देतो. येशूला लोकांचा नेहमीच कळवळा येतो. म्हणजेच आपणा प्रत्येकाविषयी येशू नेहमी दया दाखवत असतो. आपण आज स्वतःला विचारूया की, शुभवर्तमानातील लोकांप्रमाणे मी येशूजवळ त्याचे वचन ऐकण्यासाठी येतो का? पवित्र | मिस्साबलिदानात मी भक्तीने सहभागी होतो का? मिस्साबलिदानाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन कसा आहे ? मिस्साबलिदानाची तयारी मी कशी करतो ? येशू आपली शारीरिक भूक |भागवण्यास समर्थ आहे. येशूला आपल्या शारीरिक गरजाविषयी आपल्या अगोदर जाणीव आहे. आपण जेव्हा अडीअडचणीत असतो तेव्हा आपल्या अगोदर त्याला आपला कळवळा आलेला असतो. आपल्याला केवळ त्याच्या जवळ राहण्याची गरज आहे. मी तयार आहे का

प्रार्थना :  हे जीवनादात्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुजवर प्रेम करुन तुझ्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️