Marathi Bible Reading | Friday 11th February 2022 | 5th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पाचवा सप्ताह 

शुक्रवार 

 दि. ११ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” 

लुर्ड्सची माता  धन्य कुमारी पवित्र  मरियेचा सण 

✝️

प्रभू येशू साक्षात परमेश्वराचा पुत्र आहे म्हणुनच त्याच्या वाणीत आणि  स्पर्शात सामर्थ्य असून त्याचा स्पर्श गुणकारी स्पर्शाने आंधळे, मुके, पांगळे आणि सर्व प्रकारचे आजार बरे झाले. केवळ शारिरीकच नव्हे तर आपले आध्यात्मिक परिवर्तन करणारा प्रभूचा स्पर्श खरोखरच सामर्थ्यशाली असा आहे. आपण प्रभूचा स्पर्श अनुभवण्यासाठी त्याच्या पायापाशी शरण जाऊ या. 
ख्रिस्तसभा आज पवित्र मरियेने लुर्डस् येथे दिलेल्या दर्शनाचा व संदेशाचा सन्मान करुन सण साजरा करीत आहे. कानागावी प्रभू येशूद्वारे घर धान्याची गरज भागवून मरियेने तिच्या मध्यस्थीची महानता दाखवून दिली आहे.  पवित्र मरिया अखिल मानवावरील तिचे प्रेम व औदार्य ह्याचा उत्तम आदर्श आहे. ती अखिल मानवजातीची प्रेमळ माता बनून सर्वांसाठी प्रभू पाशी विनंती करीत असते. मरिया मातेने लुर्डस् येथे दिलेल्या दर्शनाच्या ठिकाणी हजारो भाविक आपली दु:खे व आजार घेऊन जात असतात. अनेकांना आजार मुक्ती मिळते  आणि तिच्या प्रभावी मध्यस्थिने हजारो लोकांचे जीवन परिवर्तन घडून येते. 
ख्रिस्तसभा आज जागतिक रुग्णदिन पाळत असताना पवित्र मरियामातेचा आदर्श  आपल्या जीवनात उतरविण्यासाठी प्रेरणा घेऊ या. तिचा पवित्र जपमाळेचा संदेश  स्वीकारुन आपल्या वैयक्तिक कौटुंबिक आणि सामुहिक प्रार्थनेत जपमाळेला प्रार्थनेला प्राधान्य देऊ या.

✝️   

पहिले वाचन यशया ६६:१० -१४
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, नदीप्रमाणे शांती मी तिच्याकडे वाहवितो."

“येरुशलेमबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्हासा, तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा, म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल आणि तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल."
कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती आणि पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवितो. तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.
जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन, येरुशलेममध्ये तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल.”
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र यहूदीथ १३:१८-१९
प्रतिसाद :  प्रभू देव धन्य! त्यानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली! 
१)"मुली परात्पर देवाने पृथ्वीवर साऱ्या 
स्त्रियांमध्ये तुला धन्य केले आहे. 
प्रभू देव धन्य! त्यानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली! 
आपल्या शत्रूचे शीर तोडण्यास त्यानेच तुला मार्गदर्शन केले.

२) देवाचे सामर्थ्य आठवीत असताना 
लोकांच्या मनात तू निर्माण केलेली
 आशा कधीच मावळणार नाही.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 तेव्हां मरीया म्हणाली :
'माझा जीव प्रभूला' थोर मानितो आणि 
'देव जो माझा तारणारा' त्याच्या मुळे माझा आत्मा 'उल्हासला आहे;
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान  २: १-११

वाचक :योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यातले काढून भोजनकारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभाऱ्याने चाखले, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला, "प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस वाढतो, तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत राखून ठेवला आहेस.” येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. आज आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करीत असताना त्यांची सेवाकरणारे कुटुंबीय, डॉक्टर, परिचारिका जे अहोरात्र आजाऱ्यांची सेवा करत आहेत त्यांचे आभार मानूया. लुर्ड्स मातेने बर्नाडेट नावाच्या लहान मुलीला डोंगरावरच्या नदीच्या काठी गुहेत दर्शन दिले. ही लहान गुराखी मुलगी सूर्यासारखी तेजोमय स्त्रीचा उल्लेख करताना सांगते की, ती आरोग्यदायी माता आहे. ही मुलगी आजारी होती. पवित्र मरियेच्या दर्शनाने ती आजारी मुलगी बरी होते. पवित्र मरिया तिला जगासाठी मध्यस्थी करण्यास आव्हान करते. आजच्या शुभवर्तमानात मरिया कानागावी लग्नात गेली होती. तेथे घरधन्याची अब्रू जाऊ नये म्हणून येशूला विनंती किंबहूना मध्यस्थी करते. येशू पहिलावहिला चमत्कार पवित्र मरियेच्या मध्यस्थीने काना गावी करतो. आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात जपमाळेला कोणते स्थान आहे ? आजारी व्यक्तीकडे मी कोणत्या नजरेने पाहतो. आजार पणाचा स्वीकार मी स्वेच्छेने करतो की, कुरकुर करत असतो ?

प्रार्थना : हे पवित्र मरिये, तु महान आहेस. आमच्या सर्व गरजा तू भागवतेस गरजवंताच्या सहाय्याला धावून जाण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या