Marathi Bible Reading | Thursday 10th February 2022 | 5th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पाचवा सप्ताह 

गुरुवार 

 दि. १० फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  "जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे."




संत स्कोलास्टिका 
- कुमारिका (४८०-५४७)

✝️

 स्कोलास्टीका ही इटलीतील नर्सिया या ठिकाणी जन्मली होती. संत बेनेडिक्ट (सण ११ जुलै) ह्यांची ती जुळी बहीण होय. एकदम बालवयात तिने आपल्या भावाप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या संपत्ती व ऐश्वर्यावर पाणी सोडून त्याच्यासह सुबियाको येथे जाण्याचे व आयुष्यभर देवाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि मोठेपणी दोघेही सुबियाको येथे जाऊन ते स्वप्न पूर्ण केले. परंतु नंतर बेनेडिक्ट दक्षिण इटलीतील मोन्टे कॅसिनो येथे गेल्यामुळे तिने सुबियाको येथेच राहून बेनेडिक्टाईन आचारसंहितेवर आधारित एका कॉन्व्हेन्टची स्थापना केली. तिथे तिला बऱ्याच तरूण मुली येऊन मिळाल्या होत्या.
हे दोघे भाऊ-बहिणी वर्षातून केवळ एकदाच उपवासकाळामध्ये आध्यात्मिक गोष्टींवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भेटत असत. दोघांची आध्यात्मिक प्रगती एवढी विलक्षण झालेली होती की त्यांचे समकालीन संत ग्रेगरी महान ह्यांनी त्यांच्या एकत्र भेटीतील मौल्यवान आध्यात्मिक विचारांचे संकलन केलेले आहे. दोघांच्या शेवटच्या भेटीचे त्यांनी केलेले हृदयस्पर्शी वर्णन तर आपल्याला दोघांच्या आध्यात्मिक उदात्ततेची जाणीव करून देते.
“आपला मरणकाळ जवळ येऊन ठेपला आहे असे जाणवताच स्कोलास्टिका हिने आपल्या पवित्र भावाला विनंती केली की, आपण रात्रभर व पहाटेपर्यंत आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करू." परंतु बेनेडिक्ट हे आपल्या मठवासीय आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणारे होते. त्यामुळे अंधार पडण्याआधी आपल्याला आपल्या मठाच्या नियमानुसार परतले पाहिजे ह्याविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली. अशा वेळी स्कोलॅस्टिका हिने देवाजवळ कळकळीची याचना केली की, बेनेडिक्टच्या मनातील विचार बदलून त्याने रहावे कारण ही रात्र शेवटची रात्र आहे. तिची विनंती ऐकली गेली. एकाएकी आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या. मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या प्रचंड गडगडाटाने भूमी हादरून गेली. ह्या परिस्थितीपुढे बेनेडिक्टने हात टेकले. ही देवाची इच्छा आहे असे मानून बेनेडिक्टने आपल्या मठात परतण्याचा बेत रद्द केला. न्याय आणि शिस्तीचा कायदा प्रेमाच्या सामर्थ्यापुढे जणू पांगळा ठरला होता. दोन्ही संतांनी रात्रभर आध्यात्मिक मेजवानी झोडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आपापल्या संघात निघून गेले.
तिसऱ्या दिवशी बेनेडिक्टला निरोप मिळाला की, आपली बहीण स्वर्गवासी झालेली आहे. त्यावेळी दोघे ६७ वर्षांचे होते. बेनेडिक्टने मॉन्टेकॅसिनो येथे स्वत:साठी एक थडगे तयार ठेवले होते. त्यात त्याने आपल्या स्वतःच्या हातांनी स्कोलास्टिकाला मूठमाती दिली. थोड्याच दिवसांनी २१ मार्च रोजी त्याचीही प्राणज्योत मालवली. त्याला तिच्या शेजारीच पुरण्यात आले.
अशा प्रकारे दोन महान संतांचा एकत्र जन्म व एकत्र मृत्यू झाला (४८० ५४७). ह्या दोन संतांनी स्थापन केलेल्या व्रतस्थ संघातून १४ शतकात जवळजवळ ५०० संत ख्रिस्तसभेला देण्यात आलेले आहेत. वादळवाऱ्यात संत स्कोलास्टिकाचा धावा केला जातो.

✝️   

पहिले वाचन १ राजे ११:४ - १३
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“तू करार पाळला नाहीस म्हणून मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेईन. माझा सेवक दावीद याच्या प्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन. 

शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यांच्या नादी शलमोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनने केले, त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शलमोनने येरुशलेमच्या समोरील पहाडावर मवाबचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी एकएक उंच स्थान बांधले. ज्या विदेशी स्त्रिया आपआपल्या दैवताला धूप दाखवीत आणि यज्ञ करीत त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली.
शलमोनचे मन इस्राएलचा देव परमेश्वर याच्याकडून फ़िरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला; त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते. त्याला या बाबतीत आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको; पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही. यास्तव परमेश्वर शलमोनला म्हणाला, “माझा करार आणि मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केले त्याअर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन; पण तुझा बाप दावीद याच्याप्रीत्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही, तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन. तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही; माझा सेवक दावीद याच्याप्रीत्यर्थ आणि मी निवडलेल्या येरुशलेमप्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०६:३-४,३५-३७,४०
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर.

१) जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि 
सर्वदा नीती आचरतात ते धन्य! 
हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस,
तेव्हा माझी आठवण कर.

२) तर ते त्या राष्ट्रात मिसळले आणि 
त्यांचे आचार शिकले. 
त्यांनी त्यांच्या मूर्तीची पूजा केली, 
त्या त्यांना पाशरूप झाल्या

३) त्यांनी आपले पुत्र आणि कन्या 
ह्यांचे बळी भूतांना दिले. 
त्यामुळे परमेश्वराचा कोप 
त्याच्या लोकांवर भडकला;


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि 
जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची 
वचने आपणाजवळ आहेत.

 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ७:२४-३०

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात."

 गनेसरेत येथून निघून येशू सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफूनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली “माझ्या मुलीतून भूत काढा." तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." यावर तिने उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.” तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे." मग ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आज येशू आपली परीक्षा घेऊ पाहतो. आपण ख्रिस्ती श्रद्धेत किती दृढ किंवा मुळावलेलो आहोत हे येशू पाहू इच्छीत आहे. आपल्या जीवनात जेव्हा अनेक अडचणी येतात तेव्हा आपल्या कोणत्या हेतूने त्याला सामोरे जातो हे येशू पाहत आहे. जीवनात आजारपण, कुटुंबात अकाली मृत्यू धंद्यामध्ये आलेले नुकसान, नात्यात आलेली तफावत हे जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा आपण काय करतो? येशूवर विश्वास ठेवतो की, येशूवर अविश्वास दाखवितो. आजच्या शुभवर्तमानात हेल्लेणी बाईने येशूवर पूर्ण विश्वास ठेवला आणि तिच्या विश्वासामुळेच तिची मुलगी बरी झाली. आपल्या जीवनात आपण येशूवर विश्वास ठेवला तरच आपल्या जीवनात अलौकिक कृत्य पाहू शकतो. सर्व अडीअडचणींचा स्वीकार करून येशूवर विश्वास ठेवण्यास आपण आज तयार आहोत का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, श्रद्धेत वाढण्यास व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास मला 
प्रेरणा व शक्ति दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या