Marathi Bible Reading | Wednesday 9th February 2022 | 5th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पाचवा सप्ताह 

बुधवार 

 दि. ९ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  "माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते."

संत मिंग्वेल कोर्देरो 
•वर्तनसाक्षी (१८५४-१९१०)

✝️

 शबाची राणी शलमोनाची परीक्षा पाहण्यास आली होती.  देवाचे शहाणपण लाभलेल्या शलमोनाने तिला सकारात्मक  विचार करायला लावले. इतकेच नव्हे तर शलमोनाचे शहाणपण, त्याचा सगळा थाट आणि त्याने बांधलेल मंदिर व त्याची समृध्दी पाहून तिने शलमोनाचा मोठा सन्मान केला. शबाच्या राणीने इस्त्राएलच्या महान परमोश्वराला त्याबद्धल धन्यवाद दिले.

प्रभू येशू सृष्टी व निसर्ग नियमानुसार घडणारे सर्व बदल व संरचना शुद्ध ठरवित आहे, माणसाच्या मनातून निघणारे विचार माणसाला भ्रष्ट बनवितात हे स्पष्ट करुन देत आहे. माणसाच्या शरीरात जाणारे व शरीरातून बाहेर पडणारे सर्व काही निसर्ग नियमानुसार घडते. मात्र अंतःकरणातून निघणारे वाईट विचार म्हणजेच, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्याभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूरपणा हे सर्व माणसाला भ्रष्ट बनवते. आपण आज आपल्यातून निघणाऱ्या व आपल्याला भ्रष्ट बनविणाऱ्या सर्व गोष्टींवर मनन-चिंतन करु या.आपल्या अंत:करणातून सतत चांगले व पवित्र विचार बाहेर पडावेत; देवाची स्तुति करता यावी, सर्व बंधुभगिनींना प्रेमाने वागविता यावे यासाठी आपली विचारशैली कशाप्रकारे बदलता येईल ह्याचा विचार करु या.

✝️   

पहिले वाचन १ राजे १०:१ - १०
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“शबाच्या राणीने शलमोनचे सर्व शहाणपण बघितले."
परमेश्वराच्या नावासंबधांने शलमोनची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूटप्रश्नांनी त्याची परीक्षा पाहावयास आली. आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मौल्यवान रत्ने आणि मसाले उंटावर लादून येरुशलेमला आली. शलमोनकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली. शलमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, त्याने तिला उलगडा करून सांगितले नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शलमोनचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकऱ्यांची खिदमत आणि त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्याचा तो जिना ही सगळी पाहून शवाची राणी विस्मयचकित झाली.ती राजाला म्हणाली, "आपली करणी आणि ज्ञान यांविषयीची जी कीर्ती मी आमच्या देशात ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या गोष्टीचा मला विश्वास येईना, आता पाहते तो माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण आणि समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तीहून ती अधिक आहेत. आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत. ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलच्या गादीवर स्थापले तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलवर सदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे आणि धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.” तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये आणि बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजास एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३७:५-६,३०-३१,३९-४०
प्रतिसाद :  सज्जनाच्या मुखातून ज्ञान पाझरते.

१) आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, 
त्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
 तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, 
तुझे न्याय्यत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.

२) सज्जनाच्या मुखातून ज्ञान पाझरते, 
न्यायनीती त्याच्या जिभेवर वसते. 
त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते,
त्याचे पाय घसरणार नाहीत.

३) नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते, 
संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. 
परमेश्वर त्यांना सहाय्य करतो 
आणि त्यांना मुक्त करतो; 
त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो आणि तारतो,
 कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, 
मी तुझे स्तवन करतो;
 कारण ह्या गोष्टी तू बाळकांना प्रकट केल्या.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ७:१४-२३

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते."

येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, "तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या; बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते." तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, "तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहा की काय ? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते आणि शौचातून बाहेर पडते.” (अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.) आणखी तो म्हणाला, "जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरता, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: माणसाच्या आंतून काय निघू शकते याची अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. संत मदर तेरेजाच्या जीवनातून करुणा निघते. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मंडेला यांच्या जीवनातून आपल्या देशासाठी प्रेम निघते. सिस्टर राणी मरिया ह्यांच्या आईच्या हृदयातून आपल्या मुलीच्या मारेकऱ्यासाठी क्षमा निघते. आपल्यामधून काय निघायला हवे हा सर्वस्वी निर्णय आपला असतो. आपण काय करतो, आपल्यामधून समाजासाठी, कधी माझ्या कुटुंबासाठी काय निघते? जारकर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दृष्टपणा, कपट, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा ह्या गोष्टी बाहेर पडतात आणि आपल्याला भ्रष्ट करतात.

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, सर्वदा तुझी स्तुति करण्यास व अंतर्यामी निर्मळ बनण्यास आमचे विचार, कल्पकता व कृती ह्यामध्ये पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभू दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या