सामान्यकाळातील पाचवा सप्ताह
मंगळवार
दि. ८ फेब्रुवारी २०२२
शुभवर्तमान मार्क ७:१-१३
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."
परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. (कारण परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि पेले, घागरी, पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रूढी ते पाळत असत.) ह्यावरून परुश्यांनी आणि शास्त्रांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत ?” त्याने त्याला उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असाः
“हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे; ते माझी व्यर्थ उपासना करतात,
कारण ते शास्त्र म्हणून जे शिकतात, ते असतात मनुष्याचे नियम." तुम्ही देवांची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."
आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, 'तू आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.' पण तुम्ही म्हणता, 'जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान (म्हणजे अर्पण) केले आहे, ' तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️

0 टिप्पण्या