Marathi Bible Reading | 13th February 2022 | 6th Sunday in Ordinary Time

सामान्यकाळातील सहावा 

रविवार   

 दि. १३ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “तुम्ही धन्य, कारण स्वर्गाचे राज्य तुमचे आहे.” 




✝️

परमेश्वराला जीवनात अग्रस्थान देऊन विश्वासाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणारी माणसे खरोखरच धन्य असतात. माणसांवर आणि भौतिक गोष्टींवर विश्वास ठेवून जागतिक जीवनात रममाण होणाऱ्यांच्या वाट्याला संकटे आणि दु:खे येतात, त्यांचे जीवन निष्क्रिय बनते. मात्र परमेश्वरावर विश्वास ठेवणारे जीवनात यशस्वी व फलद्रुप बनता प्रभू येशू धन्योद्गार काढत असतानाच दुःखोद्गारपण काढत आहे. प्रभू येशूने देवराज्याची शिकवणूक देतांना स्पष्टपणे म्हटले की, 'देवाचे राज्या तुमचे आहे.' देवप्रीति, परस्परप्रीति, सेवा, दयाळूपणा, क्षमाशीलता, समेट, शांती अशा सर्व स्तरावर प्रभू येशूने  देवराज्याचा संदेश दिला. गरीब, भूकेले, शोकग्रस्त, दु:खी, पीडित,  आजारग्रस्त आणि भूतग्रस्त अशा सर्वांनाच प्रभूने त्याच्या सामर्थ्यशाली  वैभवाने जीवनदान दिले व मुक्ति मिळवून दिली. विशेषत: गरीबांचा कैवारी  असलेल्या प्रभूने धनवानांचा आणि समाजावर बंधने लादणाऱ्या पुढाऱ्यांचा निषेध केला. ज्यांच्याविषयी धन्योद्गार काढले त्यांना स्वर्गात प्रतिफळाचे ! आश्वासन दिले. मात्र धनवानांना आणि अन्यायी जनांना म्हटले की, 'तुमची केवढी दुर्दशा होणार.'

प्रभू येशू आपल्याला संबोधून कोणते उद्गार काढीत आहे. आपण अन्यायग्रस्त व दुःखित आहोत की तृप्त आणि लोभी आहोत ? प्रभू करुणेचा आणि दयेचा सागर आहे, म्हणूनच आपण परस्परप्रीतिची आज्ञा पाळून सर्वांना बंधु प्रीतिने बागवावे म्हणून प्रभूकडे कृपा व प्रेरणा मागू या

✝️   

पहिले वाचन यिर्मया १७:५-८
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"यराबामने सोन्याची दोन वासरे तयार केली. "
"जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो तो शापित आहे. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य!" परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो आणि ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल आणि जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी आणि प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविश्व परमेश्वर आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील. उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १:१- २,३,४.६ ३९:५
प्रतिसाद :  जो मनुष्य देवावर भाव ठेवतो तो धन्य होय!

१)जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, 
पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही 
आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, 
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, 
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य!

२)जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, 
ते आपल्याला हंगामी फळ देते, 
ज्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही 
तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३) दुर्जन तसे नाहीत.
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. 
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.

दुसरे वाचन पौल १५:१२.१६-२०
वाचक :पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे. "
ख्रिस्त गेलेल्यांतून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येकजण म्हणतात हे कसे? कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि • ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहा आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ज्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो. तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथम फळ असा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे
ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक ६:१७.२०-२६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया आणि येरुशलेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास आणि आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता.

तेव्हा त्याने आपल्या शिष्याकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो, दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे."

“अहो जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल."

“अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल."

"मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाववाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य!"

त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्याचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत.

“परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहा!"

“अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमची

केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हाला भूक लागेल." “अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल."

"जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: “आपला भूतकाळ देवाच्या दयेवर सोपवा, आपला वर्तमानकाळ त्याच्या प्रेमावर सोपवा आणि आपला भविष्यकाळ त्याच्या दानशूरतेवर सोपवा.” असे उद्गार संत अगस्तीन ह्यांनी काढलेले आहेत. काळ कोणताही असला तरी नजर आणि मनःस्थिती प्रभू परमेश्वरावरच खिळलेली असावी. आजच्या तिन्ही वाचनात माणसापुढे जीवन व मरण, शाप व आशीर्वाद,  आशा व निराशा असे पर्याय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. माणसाला निवडीचे स्वातंत्र्य देऊन देवाने त्याचा सन्मान केलेला आहे. परंतु माणसानेच ह्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून परमेश्वराचा अपमान केलेला आहे. १. शापित आणि आशीर्वादित परमेश्वरावर भरवसा ठेवण्याऐवजी जी व्यक्ती मानवावर हवाला टाकते ती शापित आहे. असे आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया आपल्याला सांगतो. तर परमेश्वरावर भाव ठेवणारा पुरुष जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा फलद्रूप व हिरवागार असेल, म्हणजेच आशीर्वादित असेल असेही तो सांगतो. स्तोत्र १ मध्येही नीतिमान व दुर्जन ह्यांच्यात हाच फरक असल्याचे सांगण्यात आलेले आहे. २. भौतिक व पारमार्थिक जीवन : भौतिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा मरणोत्तर किंवा पारमार्थिक जीवनावर विश्वास नसतो. त्यामुळे “खा, प्या, मजा करा” असा मंत्र ते जपत असतात तर पुनरुत्थानानंतरच्या जीवनावर श्रद्धा ठेवणारे ह्या जगात सात्विक, त्यागी व पवित्र जीवन जगू शकतात असे आजचे दुसरे वाचन आपल्याला सांगते. ३. धन्योद्गार आणि दुःखोद्गार : शुभवर्तमानात येशू दीन, भुकेलेले, रडणारे आणि छळ सहन करणारे याविषयी धन्योद्गार काढतो. याउलट, धनवान, तृप्त, आनंदी आणि लोकप्रिय अशांची दुर्दशा होणार असे दुःखोद्गार काढतो. आत्मपरीक्षण : परमेश्वराने माझ्यासमोरकोणकोणते पर्याय ठेवलेले आहेत? योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी मी माझ्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करतो का? येशू माझ्याविषयी धन्योद्गार काढील की दुःखोद्गार ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू तुझ्या आज्ञा पाळून परस्पराची सेवा करण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या