Marathi Bible Reading | Monday 14th February 2022 | 6th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील सहावा सप्ताह 

सोमवार  

 दि. १४ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “मला ह्या लोकांचा कळवळा येतो” 




संत सिरील आणि मेथोडिअस
-(८२-८३३)
✝️

देवाचे वचन व देवाची दया महान आहे. येशूला ओळखण्यासाठी त्याचे सामर्थ्य जाणण्यासाठी व त्याच्या योजना समजण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची कृपा आवश्यक आहे.

विश्वासाने आपले सर्वस्व प्रभूचरणी समर्पित करु या. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यास व प्रकाशाची देणगी मिळण्यास पात्र ठरावेत म्हणून प्रार्थना करु या.

✝️   

पहिले वाचन याकोब १:१-११
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

“तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो; त्यामुळे तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त होवो.”
बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, त्यामुळे तुम्ही कशातही उणे न पडता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त होवो.
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणाला दोष न लावता सर्वांना उदारपणाने देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या आणि उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.
दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमेजविले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११८:६७-६८,७१-७२,७५-७६

प्रतिसाद :  प्रभो, माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन.

१)मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, 
पण आता मी तुझे वचन पाळत आहे. 
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस; 
तुझे नियम मला शिकव.

२) मी पीडित झाल्यामुळे माझे बरे 
झाले कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. 
सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या 
तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.

३) हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत 
आणि सत्यतेने तू मला पिडले आहे हे मी जाणतो. 
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार 
तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, 
तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:११-१३

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

परुशी येऊन येशूशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या अंतःकरणात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही." नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आजची वाचने देवाच्या उदारपणाबद्दल सांगत आहेत. देव किती दयाळू, मंदक्रोध आहे. तो आपल्याला सदा दानाने संपन्न करत असतो. जो विश्वासाने त्याच्याजवळ नम्रपणे उभा असतो तो त्याला निराश करत नाही. बऱ्याच वेळेला आपण येशूकडे येतो परंतु आपल्या मनात संशय असतो. त्यामुळे आपल्या विनंत्या कधी पूर्ण होत नाहीत. ज्या ठिकाणी संशय असतो तिथे देवावरील विश्वास कसा असणार? प्रथम येशूकडे विश्वासाने दान मागूया जेणेकरून आपण त्याच्या श्रद्धेत दृढ होऊ.

प्रार्थना :  हे ज्ञानाच्या उगमा, सर्व समर्थ परमेश्वरा, आमची अंतःकरणे नम्र बनव, आमच्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा कर व आम्हाला कृपेचा प्रकाश बहाल कर, आमेन,


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या