Marathi Bible Reading | Tuesday 15th February 2022 | 6th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सहावा सप्ताह 

मंगळवार 

 दि. १५ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  "सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा." 

 
संत फॉस्टिनस व ज्योविता 
रक्तसाक्षी (१२०)

✝️

प्रभू येशूचे शिष्य अशा परिस्थितीत गोंधळलेले होते. हा काळ म्हणजे जणू  कसोटीचा काळ होता. सर्व शिष्य येशूच्या सहवासात होते तरी त्यांना येशूच्या सामर्थ्याचे आकलन होत नव्हते. आपण सुद्धा शिष्यांप्रमाणे गोंधळतो किंबहुना जगाच्या गोष्टींकडे आकर्षित होत असतो. सभोवतालच्या दुष्ट प्रवृत्तींचा आपल्यावर विपरीत परिणाम होत असतो. संत याकोब आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे, 'जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य.' आपली बुद्धी,  शहाणपण व आकलन शक्ती देवाचे वचन ग्रहन करण्यास कमी पडते. आपल्या सर्वांचे तारण करावयास प्रभूचे प्रभावी आणि समर्थ वचन स्वीकारल्यास सर्व  परिस्थितीत आपण सुरक्षित राहू.
 

✝️   

पहिले वाचन याकोब १:१२-१८
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“परमेश्वर कोणाला मोहात पाडीत नाही."

जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य! कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, "देवाने मला मोहात घातले," असे त्याने म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही. प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो, भुलवला जातो आणि मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. माझ्या प्रिय बंधूंनो फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही आणि जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जणू काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९४:१२-१५,१८-१९

प्रतिसाद :  हे परमेश्वरा, ज्याला तू शिस्त लावतोस तो धन्य. 

१) हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, 
ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. 
त्याला तू विपत्काली आराम देशील.

२) परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, 
तो आपले वतन सोडून देणार नाही. 
न्याय नीतिमानांकडे वळेल आणि 
सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील..

३) "माझा पाय घसरला" असे मी म्हणालो, 
तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. 
माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा
तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते..


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता 
आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दि
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:१४-२१

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा."

शिष्य भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकरी होती. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले, "सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा." तेव्हा “आपल्याजवळ भाकरी नाहीत" अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, "तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या ?" ते त्याला म्हणाले, "बारा." "तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?" ते म्हणाले, “सात.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हाला समजत नाही काय?"

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: परमेश्वर मानवाची वेळोवेळी परीक्षा घेत असतो आणि जो माणूस ह्या परीक्षेत टिकतो तो धन्य. आपल्या वैयक्तिक जीवनात आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जीवनात जळत्या भट्टीतून जो माणूस तावून बाहेर पडतो तोच सार्वकालिक जीवनासाठी टिकून राहू शकतो. ज्याप्रकारे सोने भट्टीत तावून बाहेर येते तेव्हाच त्याचा सुंदर दागिना तयार होतो. त्याचप्रकारे आपल्या आयुष्यात आपण अनेक संकटांना सामोरे जातो तेव्हाच आपण धन्य. कारण देवाची इच्छा आपण प्रमाण मानलेली आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण शिष्यांना चिंता करताना पाहतो. येशू त्यांना धीर देताना पाहतो की तुमची शारीरिक भूक भागवण्यास समर्थ आहे. केवळ विश्वास ठेवा आणि आपले कार्य विश्वासाने पार पाडा.

प्रार्थना :  हे प्रभू, सर्व मोहापासून, अनीष्टांपासून, व पाप प्रसंगापासून आमचे संरक्षण कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या