Marathi Bible Reading | Wednesday 16th February 2022 | 6th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सहावा सप्ताह 

 बुधवार 

 दि.१६ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
 " त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला "
 

संत ओनेसिमस
रक्तसाक्षी (९०)

✝️


बायबलच्या नव्या करारात पौलचे फिलेमोनला पत्र नावाचे एक छोटेसे (एक पानाचे) पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या उगमाविषयीची घटना संत ओनेसिमस ह्याच्या जीवनाशी संबंधित आहे.कलस्सै येथील फिलेमोन नावाच्या एका श्रीमंत मनुष्याच्या घरी ओनेसिमस नावाचा एक अख्रिस्ती गुलाम कार्य करीत होता. एकदा त्याच्या हातून काहीशी चूक घडली. शिक्षा होण्याच्या भीतीने ओनेसिमस आपल्या मालकाला न विचारता घरातून पळून गेला आणि रोम येथे पोहोचला.

नेमका त्याचवेळी (संत) पौल रोममध्ये आपला पहिला तुरूंगवास भोगत
होता. परंतु त्याला नजरकैदेत भेटण्याची खास मुभा देण्यात आली होती. ओनेसिमसआपल्या मनातील भीतीने थरथरत ह्या प्रेषिताच्या भेटीला गेला आणि त्याचवेळी त्याला जणू परिसस्पर्श झाला. त्याची विचारसरणी व जीवनपद्धती तात्काळ बदलून गेली. ओनेसिमसला आपल्या सोबतच ठेवून घेण्याचा संत पौलला मोह झाला.

परंतु पहिल्या प्रथम ज्या मालकाला तो फसवून आलेला आहे त्याच्याशी समेट
करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने फिलेमोनला पत्र लिहिले व ओनेसिमस
ह्याला कलस्सै येथे पाठविले.

ह्या पत्रामध्ये ओनेसिमस ह्याला केवळ गुलाम म्हणूनच नव्हे तर ख्रिस्ताठायी बंधू म्हणून फिलेमोनने स्वीकारावे अशी विनंतीवजा आज्ञा एक धर्मपिता या नात्याने पौलने फिलेमोनला केलेली होती. पौलसारख्या महान प्रेषिताचे ते पत्र वाचून फिलेमोनला खूप आनंद झाला. त्याने तात्काळ ओनेसिमस ह्याला क्षमा केली व गुलामगिरीतून मुक्त केले. इतकेच नव्हे तर पुन्हा रोम शहरात जाण्यासाठी आवश्यक ती मदतही पुरविली.
स्वत: फिलेमोन ह्यालाही संत पौलकडूनच ख्रिस्ती धर्माची दीक्षा मिळाली होती. संत पौल इफीस येथे असताना त्याने फिलेमोन ह्या श्रीमंत व्यक्तीचे परिवर्तन घडवून आणले. तिथपासून दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त बनले. पुढे फिलेमोन इफिस सोडून कलस्सै येथे गेला. त्याच्या ह्या नव्या घरी प्रारंभीचे ख्रिस्ती लोक उपासनाविधीसाठी व प्रार्थनाविधीसाठी एकत्र जमत. अशा फिलेमोनने पौलच्या पत्राचा आदर करणे साहजिकच होते. त्याचाच परिणाम म्हणून ओनेसिमससारखा गुलाम रोम शहरात जाऊन (संत) पौलचा निकटवर्तीय बनला.
काहीकाळ पौलला त्याने तिथे मदत केली आणि नंतर तो पूर्वेकडे निघून गेला. तेथील मासेदोनिया शहरातील बेरोय्या धर्मप्रांताचा बिशप म्हणून ओनेसिमस ह्याने धडाडीने कार्य केल्याचे ख्रिस्ती धर्मपरंपरा मानते.

प्रभू येशूचा गुणकारी स्पर्श त्या आंधळ्याला झाला मात्र उपचाराची  एक परिणामकारक पद्धत प्रभूने अवलंबली. परिवर्तन ताबडतोब होत नाही तर  प्रभूच्या सहवासात गेल्यावर हळूहळू आपल्याला त्याला कृपेची, ममतेची आणि आंतरिक आरोग्याची अनुभूती यते. प्रभूच्या करुणेचा व दयेचा गुणकारी स्पर्श आपल्या प्रत्येकाला व्हावा असे वाटत असेल तर संत याकोबाचा सल्ला  सर्वांना उपयुक्त आहे. संत याकोब म्हणतो, 'सर्व मलिनता व उचंबळून आलेला  दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका.'

प्रभू येशू आपल्या सर्वांना नवीन दृष्टी लाभावी व तसाच अनुभव  आपल्याद्वारे इतरांना मिळावा म्हणून पाचारण करीत आहे. लोकांनी आंधळ्या माणसाला येशूजवळ आणले, तसेच आपण सुद्धा गरजवंत, आजारी व दुष्ट बंधनात असलेल्यांना येशूजवळ आणणे, हे खरे धर्माचरण ठरेल.

✝️   

पहिले वाचन याकोब १:१९-२७
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

“वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, ऐकणारे असू नका." 

केवळ माझ्या प्रिय बंधूनो, तुम्हांला हे कळते, तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता आणि उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.

वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो आणि त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वत:ला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, ते ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो आणि त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.आपण धर्माचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल आणि तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वत:ला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११५:१-५
प्रतिसाद :   हे परमेश्वरा, जो नीतीने वागतो तो तुझ्या पवित्र पर्वतावर वस्ती करील.

१) हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण वस्ती करील?
 जो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, 
जो मनापासून सत्य बोलतो तो, 
जो आपल्या जिभेने चुगली करीत नाही तो.

२) तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, 
तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही,
तो अधर्माला तुच्छ लेखतो,
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. 

३ )तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले
तरी ती मोडत नाही,
तो आपला पैसा व्याजी लावत नाही,
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, 
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:२२-२६

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“तो आधंळा मनुष्य बरा झाला आणि सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. "

येशू आणि त्याचे शिष्य हे बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी येशूकडे आंधळ्याला आणले आणि आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकून आणि त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, "तुला काही दिसते काय ?" तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत." नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला आणि सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने सांगितले, "ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: जो माणूस सौम्य असतो तो नम्र असतो. म्हणून याकोबाचे पत्र आपणांस सांगत आहे की, सौम्यतेद्वारे कार्य करणे देवाला अभिप्राय आहे. बऱ्याच वेळेला आपण देवाचे वचन ऐकत असतो. परंतु त्याप्रमाणे आपण वागत नाही. संत याकोब आपल्याला सौम्यता धारण करण्यास सांगत आहे. संत मदर तेरेजा ह्यांच्या बोलण्यात सौम्यता होती आणि म्हणून आपण त्यांच्यात नम्रता ओतपोत भरलेली पाहतो. त्यांच्या वाणीत देवाचा गोडवा पाहतो. आपल्या वाणीत देवाचा गोडवा असतो का? आपली वाणी देवाच्या प्रेमाविषयी साक्ष देते की, देवाविषयी दुरावा निर्माण करते. आपली वाणी शुद्ध व पवित्र आहे का ? आपल्या वाणीने जगात प्रकाश येऊ शकतो. देवाचे राज्य येऊ शकते. दीनदुबळ्यांची सेवा आपण करू शकतो. मी माझ्या कुटुंबाची सेवा सौम्यतेने व नम्रतेने करतो का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू तुझ्या करुणेचा गुणकारी स्पर्श अनुभवण्यास व तुझी  वचने आचरणात आणण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या