Marathi Bible Reading | Thursday 17th February 2022 | 6th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सहावा सप्ताह 

 गुरुवार 

 दि.१७ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” 
 

सेर्वाईट संस्थेचे सात पवित्र संस्थापक 
- (तेरावे शतक)

✝️

    इ. स. १२३३ साली इटलीतील फ्लॉरेन्स ह्या ठिकाणी ख्रिस्तसभेतील भिक्षुकांच्या पाचव्या संस्थेची स्थापना झाली. शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत कुटुंबांतील सात तरूण मुलांना पवित्र मरियेने आपल्या स्वर्गनयन सोहळ्याच्या दिवशी दर्शन दिले. ही मुले त्यावेळी “पवित्र मरियेचे भक्त” “लॉडेसी” नामक संघटनेमध्ये प्रार्थना व भक्ती करण्यात गुंग होते. पवित्र मरियेने सेवक (सेवाईट) नामक संघ  स्थापन करण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली.
पवित्र मरियेने आपल्याला दिलेली आज्ञा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी हे तरूण शहरापासून ११ मैल दूर मोन्ते सिनारियो नामक एकांत जागी गेले. ह्या ठिकाणी पवित्र मरिया पुन्हा त्यांना भेटली व आपल्या दुःखाचे आणि क्रुसाजवळील वेदनेचे प्रतीक म्हणून ह्या तरुणांनी काळे अंगरखे वापरावेत अशी मार्गदर्शक सूचनादेखील केली आणि संत अगस्तीनच्या आचारसंहितेवर आधारीत संघ स्थापन करण्याच्या विनंतीचा तिने पुनरुच्चार केला.
हा नवा संघ अगदी अद्भुतरित्या पसरत गेला. ५० वर्षामध्ये १०,००० • युवकांनी भिक्षुक म्हणून संघात प्रवेश केला आणि १४ व्या शतकापासून क्रेत बेटावर आणि भारतात १०० हून अधिक शाखा त्यांनी उघडल्या. याशिवाय बंदिस्त खोलीत राहून प्रार्थना करू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी “क्लॉईस्टर्ड नन्स” (बंदीस्त व्रतस्थ) ची दुसरी संघटना आणि परोपकाराची व शिक्षणदानाची कृत्ये करणाऱ्या उत्साही तरूण तरुणींसाठी एक तिसरी संघटना त्यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस स्थापन केली. ह्या तिसऱ्या संघटनेच्या स्थापनेमध्ये संत ज्युलियाना फाल्कोनिएरी (सण ७ फेब्रुवारी) ह्यांचा सिंहाचा वाटा होता.
सेर्वाईट संघाची स्थापना करणाऱ्या संस्थापकांना १८८७ साली संत मालिकेतसामील करण्यात आले. त्यांचे अवशेष एकाच थडग्यांत, मोन्टे सिनारिओच्या, मठख्रिस्तालयात भाविकांसाठी ठेवलेले आहेत.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने शिष्यांना दोन प्रश्न विचारले.. "लोक मला कोण म्हणून म्हणतात ?” लोकांना वाटायचे की येशू बाप्तिस्ता करणारा योहान, एलीया किंवा संदेष्ट्यांपैकी एक असा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शब्दाद्वारे व कृत्यांद्वारे तो स्वतः देवाचा पुत्र असल्याचे प्रकट केले   होते. केवळ तो एक चमत्कारकर्ता आहे हे त्याला लोकांना पटवून द्यायचे नव्हते, तर तो देवाचा पुत्र, तारणारा, मुक्तीदाता, जीवनदाता व देवाचा अभिषिक्त आहे ह्याची जाणीव करून द्यायची होती. प्रभू येशूने दूसरा प्रश्न  शिष्यांना विचारला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्राने  आत्मविश्वासाने त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले, “आपण ख्रिस्त आहात.' "

प्रभू येशू आज तेच दोन प्रश्न आपल्या प्रत्येकाला विचारत आहे, ख्रिस्ताबरोबरचे माझे नाते काय? ख्रिस्ताची खरी ओळख मला आहे का?  ख्रिस्त माझा तारणारा आहे का? ख्रिस्ताठायी मी पवित्र व परोपकारी जीवन  जगतो का? ख्रिस्ताची सुवार्ता सांगून मी इतरांना त्याची खरी ओळख करून  देतो का ?
✝️   

पहिले वाचन याकोब २:१-९
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

"देवाने गरिबांना निवडले आहे की नाही ? पण तुम्ही गरीब माणसाचा अपमान केला आहे."

माझ्या बंधूंनो गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला आणि भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक गरीबही आला; तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, तेथे बसा.” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ बैस." तर तुम्ही आपणांमध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही ? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका, लोकदृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणांवर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? पण तुम्ही गरीब माणसाचा अपमान केला आहे. धनवान लोक तुम्हावर जुलूम करतात आणि तेच तुम्हाला न्यायसभात ओढून नेतात की नाही ? जे उत्तम नाव तुम्हाला प्राप्त झाले आहे त्यांची निंदा तेच करतात की नाही? तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर, " ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहा तर पाप करता आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३४:२-७
प्रतिसाद :   ह्या दीन माणसाने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला.

१) परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन, 
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल; 
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील. 
दीनजन हे ऐकून हर्ष करतील.

२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. 
आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या. 
मी परमेश्वराला शरण गेलो आणि 
त्याने माझा स्वीकार केला; 
त्याने माझ्या सर्व भयातून मला सोडवले.

३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले 
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. 
ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने 
तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
  देवाचे वचन स्वीकारा, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे वचन म्हणून स्वीकारा आणि वास्तविक ते असेच आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:२७-३३

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आपण ख्रिस्त आहा."

येशू आणि त्याचे शिष्य फिलिप्पीच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जावयास निघाले, तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलिया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात." तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्रने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहा." तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना ताकीद दिली.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशूची ओळख ह्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे. आपल्याला येशूमध्ये त्याचे चमत्कार भरपूर आवडतात. पण त्याचे दुःखसहन, कालवारीचा क्रूस हे आपल्याला आवडत नाही. येशू म्हणतो, कालवारीसुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. हीच येशूची खरी ओळख आहे. दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थान ही येशूची
 खरी ओळख. येशूच्या क्रुसाविना ख्रिस्ती धर्म नाही. म्हणून आपल्या जीवनात दुःख येणे वाजवी आहे. तेव्हाच पुनरुत्थानाचा मुकूट आपल्याला मिळू शकतो. आज स्वतःला विचारूया की, मला कुठला येशू ख्रिस्त आवडतो. चमत्कारिक की क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त. आपल्या ख्रिस्ती जीवनात दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजूंसारखा मी येशूला काय म्हणून ओळखितो ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुला अंतःकरणापासून ओळखण्यास, व तुझी ओळख, इतरांना करुन देण्यास आम्हाला धैर्य, शक्ती व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या