Marathi Bible Reading | Friday18th February 2022 | 6th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सहावा सप्ताह 

 शुक्रवार 

 दि.१८ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? 
 

संत कुरियाकोस एलायस चावरा

✝️

 प्रभूच्या  मळ्यात सेवाकार्य करण्यासाठी प्रभू सर्वांना बोलावित आहे. ख्रिस्तसभा आज पहिला भारतीय असलेले संत फा. कुरियाकोस चावरा ह्यांचा स्मृति दिन साजरा करीत आहोत. प्रभू येशूंच्या हाकेला प्रतिसाद देऊन फा. कुरियाकोस ह्यांनी आपल्या जीवनाद्वारे देवाची सुवार्ता घोषवली. एक तत्वज्ञानी आणि समाज सुधारक असलेल्या संत फा. कुरियोकोस ह्यांनी तळागाळातील लोकांपर्यत ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. विशेषतः त्यांनी प्रवचने व पवित्र जपमाळेची भक्ती आणि क्रुसावरील येशूची भक्ती ह्यांना प्राधान्य दिले. त्यांनी  Carmelites of Mary Immaculate ह्या संस्थेची स्थापना केली.
प्रभू येशूच्या मळ्यात सेवाकार्य करुन संतपदाला पोहोचलेले पहिले भारतीय वंशाचे संत म्हणून संत कुरियाकोस एलायस चावरा ह्यांचा आपल्याला  अभिमान आहे. त्यांच्या मध्यस्थीद्वारे अधिकाधिक ख्रिस्ती भाविकांना  ख्रिस्ताच्या हाकेला प्रतिसाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करु या.

✝️   

पहिले वाचन याकोब २:१४-२४,२६
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

"आत्म्यावाचून शरीर निर्जीव आहे, तसा क्रियांवाचून विश्वासही निर्जीव आहे."

माझ्या बंधूंनो, माझ्याठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ ? तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय ? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अत्राची वाण आहे आणि तुम्हांमधील कोणी त्याला म्हणतो, "सुखाने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा;" पण त्याच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.कोणी म्हणेल, "तुझ्या ठायी विश्वास आहे आणि माझ्याठायी क्रिया आहे." क्रियावाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. भुतेही तसाच विश्वास धरतात आणि थरथर कापतात. अरे बुध्दीहीन मनुष्या, क्रियावाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय ? आपला बाप आब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहीत कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते. आब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियावाचून निर्जीव आहे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११२:१- ६
प्रतिसाद : ज्या मनुष्याला परमेश्वराच्या आज्ञाचे पालन करण्यामध्ये आनंद वाटतो तो मनुष्य धन्य होय.

१) परमेश्वराचे स्तवन करा 
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य! 
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल;
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल; 

२) धनसंपदा त्याच्या घरी असते; 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. 
सरळ जनांस अंध:कारात प्रकाश प्राप्त होतो. 
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत.

३) जो मनुष्य दया करतो 
आणि उसने देतो त्याचे कल्याण होते, 
तो न्यायाने आपले व्यवसाय करील. 
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन आणले.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:३४-९:१

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो स्वतःला वाचवील."

येशूने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला क्रूस उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या व्यभिचारी आणि पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.” आणखी तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला खचित सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काहीजण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशूचा अनुयायी किंवा शिष्य कोण ? जो येशूच्या वचनाचे पालण करतो तोच येशूचा अनुयायी. आज येशू आपल्याला आत्मत्याग करायला शिकवत आहे. कारण जो सत्यासाठी जगतो तो इतरांसाठी जगू शकत नाही. मीपणा सोडून आपलेपणाची, आपुलकीची आस धरणे, येशूमध्ये जीवन जगणे म्हणजे आपलेपणाचे जीवन. आजच्या शुभवर्तमानात एका वचनामुळे संत फ्रान्सिस ह्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले. संत फ्रान्सिस झेवियर ह्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि आपले संपूर्ण आयुष्य सुवार्तेसाठी खर्ची घातले. आपल्या भारतवासियांना त्याचा अभिमान असायला हवा. त्याचे पार्थिव शरीर आजतागायत गोव्याच्या बॉम जेजूस बॅसिलिकामध्ये सुरक्षित आहे. तो येशूसाठी साता-समुद्रापलीकडे आला. आपण येशूची सुवार्ता माझ्या गावात, कुटुंबात, पॅरीशमध्ये देणार का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद देऊन तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या