Marathi Bible Reading | Saturday 19th February 2022 | 6th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सहावा सप्ताह 

 शनिवार 

 दि.१९ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका."


संत कॉन्राड
- वर्तनसाक्षी (१२९०-१३५१)

✝️

 
कॉन्राड ह्याचा जन्म दक्षिण इटलीमधील पिएसांशा येथील श्रीमंत कुटुंबात झाला होता. वयात आल्यानंतर त्याने लष्करी विभागात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याच्या तरूण मुलीशी विवाह केला.
त्याला शिकारीचा भलताच नाद होता. एके दिवशी त्याचे भक्ष्य त्याच्या हातून निसटले. वैतागलेला आणि वैफल्यग्रस्त असा कॉन्राड अस्वस्थ झाला. बराच प्रयत्न केला तरी ते भक्ष्य त्याच्या हाती मिळेना म्हणून त्याने जंगलाला आग लावून दिली. परंतु वाऱ्याच्या अतिवेगामुळे ती आग जवळच्या शेतांना आणि राखीव रानाला लागली व ते शेते व रान जळून खाक झाले. ह्या नुकसानापाई संबंधित शेतकऱ्यांनी चुकून एका गरीब लाकूडतोड्याला ताब्यात घेतले आणि त्याचे हालहाल करून त्याला ठार मारले.
जेव्हा ही बातमी कॉन्सड ह्याच्या कानावर गेली तेव्हा त्याला अतीव दुःख झाले. आपल्या छंदापायी एका गरीब लाकूडतोड्याला आपले प्राण गमवावे लागले ही गोष्ट कॉन्राडच्या मनाला लागून राहिली. त्याला खूप पश्चात्ताप झाला. घडल्या घटनेचे प्रायश्चित्त म्हणून त्याने आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व त्याचे पैसे गोरगरिबांना वाटून टाकले व तो स्वतः फ्रान्सिसच्या तृतीय श्रेणीत दाखल झाला. त्याची पत्नी “पुअर क्लेअर” संघटनेत गेली.
कॉन्ड सिसिली येथील नोट्टो जवळच्या एका गुहेत एकांतवासात जीवन जगू लागला. त्यानंतरची ३० वर्षे दर शुक्रवारी तो नोट्टो येथील एका क्रुसापाशी गुडघे टेकून प्रार्थना करीत असे. असाच गुडघ्यांवर असताना १९ फेब्रुवारी १३५१ रोजी त्याला अकस्मात मृत्यू आला. त्याला चमत्कारांचीही देणगी लाभलेली होती. हर्नियासारख्या रोगांवर इलाज म्हणून त्याचा धावा केला जातो.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूच्या डोंगरावरिल रुपांतराच्या वृतांत  वर्णन केलेला आहे. शुभवर्तमानातून असे निदर्शनास येते की प्रभू येशू अनेकदा  डोंगरावर एकांतात प्रार्थना करण्यास जात असे  म्हणजेच आपल्या परमेश्वर पित्याबरोबर एकांकात संवाद  साधत असताना तो पित्याशी आध्यात्मिक स्वरुपात सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, प्रकाशामान व  सामर्थ्यशाली पित्याशी एकरुप झाला. साहजिकच प्रभूला सामर्थ्य आणि दिव्य  कृपा मिळत असे. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूचे दिव्य आणि  तेजाची रुपांतरण आपल्या शिष्यंसमोर प्रकट होते. त्यावेळी झालेली दिव्यवाणी हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका हा दिलेला महान संदेश आहे. कारण प्रभू  येशूच्या वचनातच त्याच्या सामर्थ्याचा व भव्यतेचा उलगडा आपल्याला होत  असते.
प्रभू येशू द्वारे हीच प्रेरणा घेऊन आपणसुद्धा परमेश्वर पित्याशी व प्रभू येशू  ख्रिस्तांशी प्रार्थनेद्वारे एकरूप होण्याचा प्रयत्न करू या. विशेषत: पहाटेच्या प्रहरी  एकांतात  प्रभूसमोर बसून त्याची कृपा अनुभव या. 

✝️   

पहिले वाचन याकोब ३:१-१०
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

"मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. "

माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे. आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्याने आपल्या कह्यात रहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला, तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवतो. तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात आणि प्रंचड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणुने फिरवली जातात. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते.जीभ ही आग आहे. ती अनीतीचे भुवन आहे. आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे; परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही ती शांतिरहित असून दुष्ट आहे आणि प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे, जो प्रभू आणि पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती आणि शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १२:२- ५,७-८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तूच आमचा सांभाळ करशील.

१) हे परमेश्वरा, सहाय्य कर,
कारण कोणी भक्तिमान उरला नाही;
मानव जातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत.
ते एकमेकांशी असत्य वागतात, 
ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात.

२) खुशामत करणारे सर्व ओठ,
फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको. 
ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ; 
 आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण ?"

३) परमेश्वराची वचने शुद्ध आहेत, 
भट्टीत सात वेळा शुद्ध करून 
जमिनीवरील मुशीत ओतलेल्या 
रुप्यासारखी ती आहेत. हे परमेश्वरा,
तूच आमचा सांभाळ करशील, 
ह्या पिढीपासून तूच आमचे कायमचे रक्षण करशील.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
वाचे वचन सजीव आणि सक्रिय असून, मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. 
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ९:२-१३

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"त्यांच्यादेखत येशूचे रुपांतर झाले."

येशूने पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले आणि तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्यांची वस्त्रे चकचकीत आणि इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणालाही परिटाला शक्य नव्हते. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक." काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली, "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका." मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तो येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.

नंतर ते पर्वतावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याच्या पुत्र मृतावस्थेतून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका." हे बोलणे मनात ठेवून मृतावस्थेतून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलिया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे ?" त्यांने त्यांना उत्तर दिले, “एलिया पहिल्याने येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय ? तथापि मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू जसा मानव होता तसा तो दैवीही होता. तो आपल्या शिष्यांना एका उंच डोंगरावर एकांती आपल्या शिष्यांना घेऊन जातो व आपले परिवर्तीत रूप त्यांना प्रकट करतो. तेथेच शिष्यांना परमेश्वर पित्याविषयी माहिती होते. ते पित्याची वाणी ऐकतात. “हा माझा प्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका.” आपली वाणी शुद्ध आहे का ? आपण आपल्या वाणीचा उपयोग शाप आणि स्तुती करण्यासाठी करतो. हे संत याकोब आपल्याला सांगतो की, अशाप्रकारच्या गोष्टी होता कामा नये. स्तोत्रकार म्हणतो, जिभेचा वापर हा देवाची स्तुती आराधना करण्यासाठी करायला हवी. आपण जेव्हा जिभेचा वापर चुकीचा करतो तेव्हा पोप फ्रान्सिस सुंदर शब्दात सांगतात, जेव्हा आपल्याला ठाऊक आहे की, आपण चुकीची वाच्यता करणार, तेव्हा जिभेला कडकडून चावा काढावा. बऱ्याच वेळेला आपल्या कटू गोडवाणीने लोक जोडू शकतात. तर आपल्या वाणीने लोक तोडले जाऊ शकतात. परमेश्वर पित्याच्या वाणीने लोक जोडले गेले. आपल्या वाणीमुळे लोक येशूकडे येतात का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वाणी एकण्यास तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास  आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या