सामान्यकाळातील सातवा
रविवार
दि.२० फेब्रुवारी २०२२
“परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते, तरी
मी आपणांवर आपला हात उगारला नाही. " शौल इस्राएलातले तीन हजार निवडक योद्धे बरोबर घेऊन दावीदचा शोध करावयास जीफ रानात निघून गेला.
तेव्हा दावीद आणि अबीशय त्या लोकांजवळ रात्रीचे गेले. तेथे जाऊन पाहतात तो शौल गाडेतळाच्या आड निजला आहे, त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अवनेर आणि इतर लोक त्याच्या सभोवार निजले आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा अबीशय दावीदला म्हणाला, देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे, तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर एकच वार असा करू द्या की, तो त्याला भेदून जमिनीत शिरेल, भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही." दावीद अबीशयाला म्हणाला, "त्याचा वध करू नको; परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहील?" तेव्हा दावीदने शौलच्या उशाजवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला आणि ते निघून गेले. ते निघून गेले तेव्हा कोणी त्यांस पाहिले नाही की ओळखले नाही आणि कोणी जागाही झाला नाही. ते सर्व निद्रिस्त होते, परमेश्वराने त्यांना गाढ निद्रा लावली होती.मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते. दावीद म्हणाला, "महाराज, हा पाहा भाला, हा घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकाला पाठवा. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या धार्मिकतेचे आणि सचोटीचे फळ देईल, आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही.
शुभवर्तमान लूक ६:२७-३८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ६:२७-३८
"जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.'
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "तुम्हा ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय ? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांस तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय ? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न आणि दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल; द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून आणि शीग भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या