Marathi Bible Reading | Monday 21st February 2022 | 7th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सातवा सप्ताह 

सोमवार  

 दि.२१ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.”
संत पीटर डेमियन
- (१००७-१०७२)

✝️

  
 औषधे आणि मानवी उपचाराने बरे न होणारे आजार किंवा विकारांसाठी आपण उपचारा सोबतच देवाकडे धाव घेतली पाहिजे. उपचारा  सोबत दृढ विश्वासाने केलेल्या प्रार्थनेने अनेक आजार बरे होऊ शकतात. श्रद्धेची शक्ती खूप मोठी आहे. सर्वसमर्थ परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. विश्वास, प्रार्थना आणि त्याला दिलेली कृतीचा जोड ह्याद्वारे जीवनात चमत्कार घडू शकतात.
विश्वासाचा पाया शरणागती, त्याग, समर्पण, प्रार्थना व उपवास ह्यावर ।उभारलेला आहे. आपण आपला विश्वास आज पडताळून पाहू या.

✝️   

पहिले वाचन याकोब ३:१३-१८
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

"जर तुमच्या मनात तट पाडण्याचा विचार आहे, तर ताठा मिरवू नका."

तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका आणि सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था आणि प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया आणि सफळता ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, विश्वसनीय असे आहे. पण शांती करण्यासाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १८:८-१०,१५
प्रतिसाद :  परमेश्वराचे आदेश हृदयाला आनंदित करतात.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, 
ते मनाचे पुनरुज्जीवन करते. 
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे 
तो भोळ्यांना समंजस करतो.

२) परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात. 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते.

३) परमेश्वराचे मन शुद्ध आहे, 
ते सर्वकाळ टिकणारे आहे. 
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, 
ते सर्वथैव न्याय्य आहेत.

४) हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, 
माझ्या तोंडचे शब्द आणि 
माझ्या मनांतले विचार तुला मान्य असोत.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
हे माझ्या देवा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ९:१४-२९

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"हे प्रभो, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाक."

जेव्हा येशू, पेत्र, याकोब आणि योहान यांच्यासमवेत शिष्यांजवळ आला तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे आणि त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करीत आहेत असे त्यांना दिसून आले. येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, "ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे ?" तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो, ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो आणि निपचित पडतो. त्याला बरे करावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो बरे करता येईना." ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू? कोठवर तुम्हाला वागवून घेऊ ? त्याला माझ्याकडे आणा." त्यांनी त्याला त्याच्याजवळ आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?" तो म्हणाला, “बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात आणि पाण्यात टाकले, आपल्या हातून बरे काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा आणि आम्हाला साहाय्य करा." येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.” लगेच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, “माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका!" तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिया आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ आणि पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको." तेव्हा तो आत्मा ओरडून आणि त्याला फारच पिळून निघाला आणि तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे." असेच बहुतेक म्हणाले, पण येशूने त्याला हाताला धरून उठवले आणि तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, “आम्हाला तो का काढता आला नाही ?" येशू त्यांना म्हणाला, "ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू आजच्या वाचनात एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छित आहे आणि ती म्हणजे, प्रार्थना. प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. प्रार्थनेद्वारे आपण स्वर्गाचा दरवाजा उघडू शकतो. संत तेरेजा आपल्याला सांगत आहे, शिष्य अपयशी ठरले कारण त्यांनी पाहिले की, सुवार्ता सांगण्याच्या काळात त्यांचे प्रार्थनेकडे दुर्लक्ष झाले. म्हणून जेव्हा ते कामगिरी करून परत येतात तेव्हा येशू निवांत जागी त्यांना विसावा घेण्यास घेऊन जातो. प्रार्थनेच्या सामर्थ्याने येशू देवाचे कार्य करत होता. तेच आपल्याला सुद्धा करण्यास येशू बोलावत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात प्रार्थनेला किती महत्व देतो ? येशूचे कार्य करण्यास आपणांस प्रार्थनेचे सामर्थ्य हवे. वैयक्तिक प्रार्थनेत मी माझा वेळ घालवतो का? प्रार्थना माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासाने तुला शरण येण्यास व तवठायी जीवन  आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या