सामान्यकाळातील सातवा सप्ताह
मंगळवार
दि.२२ फेब्रुवारी २०२२
✝️
“शिमोन पेत्रने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.”
संत पीटरचे आसन
- (चौथे शतक)
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पृथ्वीतलावरील प्रेषितकार्यात बारा प्रेषितांना निवडून घेतले होते. त्यातल्या बारांपैकी पेत्र, याकोब आणि योहान ह्या तिघांना त्याने आपल्या अंतर्वर्तुळात स्थान दिले होते. महत्त्वाच्या प्रसंगी तो खास ह्या तिघांना आपणासोबत घेऊन जात असे. मग तो प्रसंग आनंदाचा असो (याईराची कन्या मृतांतून पुन्हा जिवंत करणे) दुःखाचा असो (गेथशेमनी बागेतील यातनामय प्रार्थना) वा गौरवाचा असो (पर्वतावरील येशूचे वैभवशाली रुपांतर). त्यातही पेत्रला त्याने इतरांपेक्षा अधिक महत्त्वाची जबाबदारी दिलेली होती.
प्रभू येशू ख्रिस्ताचे ईश्वरी रुप ओळखून “तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात” अशी कबुली देणाऱ्या पेत्रला येशू म्हणतो, “आणखी मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तू पृथ्वीवर मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल” (मत्तय १६ : १८-१९). अशा प्रकारे खुद्द येशूने पेत्रला इतर प्रेषितांवरच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवरच्या ख्रिस्तसभेवर अधिकार दिला. जगभरची ख्रिस्तसभा पेत्रला प्रथम पोप म्हणून गौरविते.
परमगुरू म्हणून पेत्रचा हा स्मृतिसोहळा साजरा करून ख्रिस्तसभा सन्मानित करते. इ. स. ४९-५० साली येरूशलेम येथे जी प्रथम विश्वपरिषद भरली त्यात पेत्रने इतर शिष्यांना व (संत) पौलसारख्या सुवार्तिकांना अमोल मार्गदर्शन केले. (प्रे. कृ. १५). त्यावेळी त्याने जे आसन वापरले त्याचा विशेष सन्मान आजच्या सणाच्या दिवशी केला जातो. त्या आसनाला “कॅथेड्रा पेट्रीय” असे नाव आहे.व्हॅटिकनच्या प्राचीन महामंदिरात (संत पीटर बॅसिलिका) दोन आसने होती. एक मार्बल लादी वापरून तयार केलेले, ज्यावर पोपमहाशय बसून आपल्या सहकारी कार्डिनल्ससह चर्चा विनिमय करून "बिनचूक" विधाने करीत असतात. दुसरे आसन पहिल्या शतकाच्या मध्यकाळात म्हणजे इ. स. ५०-६० मध्ये विशेष लोकप्रिय आणि आदरणीय ठरलेले होते.
हे दुसरे आसन अजूनही जतन करून ठेवण्यात आले आहे. बर्निनी नावाच्या कलावंताने तयार केलेल्या ब्राँझच्या भव्य पेटीकेमध्ये ते ठेवण्यात आले आहे. हे आसन ओकच्या वृक्षापासून तयार केलेले आहे. किड्यांनी पोखरले गेल्यामुळे आता त्याच्यावर हस्तिदंती मुलामा चढविण्यात आलेला आहे. इ. स. १८६७ साली संत पीटरच्या अठराव्या हौतात्म्य शताब्दीनिमित्ताने ते रोम शहरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
संत पीटरच्या आसनाचा सन्मान हा ख्रिस्तसभेतील परमगुरूंच्या स्थानाचा सन्मान आहे. त्यांच्यासाठी दररोजच्या मिस्सामध्ये प्रार्थना करून विश्वव्यापी ख्रिस्तसभेचे ऐक्य व्यक्त केले जाते.
महागुरुस्वामी व धर्मगुरुंना मिळालेल्या अधिकाराचा वापर आपल्या सर्वांच्या भलेपणासाठीच असतो ह्याची आपण जाणीव ठेवू या.
आपण सर्वजण सामान्यजन आहोत तरी सुद्धा प्रभू येशूने आपल्या सर्वांना सुवार्ता प्रसारासाठी जबाबदारी दिलेली आहे. ख्रिस्तसभेच्या सर्व आज्ञांचे पालन करुन सर्व पवित्र संस्कारांचा आदर सन्मान करु या.
✝️
पहिले वाचन १पेत्र ५:१-४
वाचक :प्रेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"मी तुमच्याप्रमाणेच वडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी आहे.'
तुम्हातील वडिलांना, मी तुमच्याप्रमाणेच वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी आणि प्रकट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर तुमच्या हाती कळपाला आदर्श व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २३ : १-६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो.
तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो माझा जीवन ताजातवाना करतो.
२) तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो.
मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही.
कारण तू माझ्याबरोबर आहेस,
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
३) तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस.
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस,
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
४.) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
मला कल्याण आणि दया ही लाभतील.
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १६:१३-१९
वाचक :संत मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू पेत्र आहेस आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."
फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, "मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात?” ते म्हणाले, "कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलीया, कोणी यिर्मया, किंवा संदेष्टयातील कोणी एक, असे म्हणतात." तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" शिमोन पेत्रने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, "शिमोन बार्योना, धन्य तुझी! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आज ख्रिस्तसभेतील व अधिकारपदावर असलेल्यांसाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. संत पेत्राच्या पदाधिकाराचा सण. पेत्र ख्रिस्तसभेचा महत्वाचा आधारस्तंभ. पेत्राचे जीवन हे नम्र व साधेपणाचे होते. येशूवर पूर्ण विसंबून राहणे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा गुण होता. “पश्चात्ताप.” त्याने चुकीची क्षमा मागितली. आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपण क्षमा मागतो का? जेव्हा आपल्याला जाणीव होते की मी चुकलो आहे. आपल्याला नम्रपणा येतो. सौम्यपणाने आपण क्षमा मागतो. तेच नेमके पेत्राने केले. जेव्हा त्याने येशूला नाकारले तेव्हा येशूकडे तो नम्र भावनेने वळला. येशूच्या दयेमुळे त्याच्यात परिवर्तन झाले. शेवटी तो येशूसाठी प्राण देण्यास तयार होतो. आपण अधिकारपदावर असतो तेव्हा दया दाखवतो का? ख्रिस्तसभेतील सर्व अधिकाऱ्यांनी निर्भीडपणे सुवार्ता घोषवावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व धर्मगुरुस्वामी ह्या सर्वांना चांगले आरोग्य बहाल कर, त्यांच्या पवित्र कार्यावर तुझा आशीर्वाद घाल, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या