सामान्यकाळातील सातवा सप्ताह
बुधवार
दि.२३ फेब्रुवारी २०२२
✝️
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे."
स्मिरणाचे बिशप
संत याकोब स्पष्टपणे आपल्या परस्परातील भांडणा संबंधाने पश्चात्ताप करुन देवाच्या अधीन होण्याचा सल्ला देत आहे. त्यासाठी नम्रता, संयम, समेट व परस्पर स्नेहभाव वाढीस लागला पाहिजे.
देव त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करीत असतो. एखादा माणूस कदाचित ख्रिस्ताचा अनुयायी नसेल किंवा शिष्यांपैकी नसेल तरी सुद्धा देव रहस्यमयरित्या त्याच्याद्वारे कार्य करु शकतो. देवाला जे योग्य वाटतात त्यांना निवडून कार्याला लावण्यासाठी देव स्वतंत्र आहे. जगात ख्रिस्ताच्या नावाने प्रामाणिकपणे आणि आत्मियतेने सुवार्ता कार्य करणारी अनेक माणसे आहेत. त्यांच्याद्वारे आजही अनेकांना आरोग्यदान व मुक्ती मिळत आहे. त्यांच्या मध्यस्थीने आणि मार्गदर्शनाने अनेकांच्या जीवनाचे परिवर्तन झाले आहे. अशा सर्व सुवार्तिकांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करु या.
धर्मशिक्षणाची, व सुवार्ता प्रसाराची मक्तेदारी केवळ आपल्याकडेच आहे असा गैरसमज असलेल्या धार्मिक नेत्यानी आजच्या वचनांवर सखोल चिंतन करावे. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या सर्वांना प्रभू येशू त्याच्या सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यास बोलावित आहे.
✝️
पहिले वाचन याकोब ४:१३-१७
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“जर प्रभूची इच्छा असेल तर तुम्हांला उद्याचे समजत नाही असे म्हणा.'
अहो ! जे तुम्ही म्हणता, “आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू", पण तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा. ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक करू," असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहा म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याला ते पाप आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४९ : २-३,६-११
प्रतिसाद : जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
१) अहो सर्व लोकहो, हे ऐका;
जगात राहणारे उच्च
आणि नीच, श्रीमंत आणि दरिद्री लोकहो,
तुम्ही सर्व कान द्या.
२) मला फसवणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेढतो.
अशा विपत्काली मी का भ्यावे ?
ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात
आणि आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.
३ ) कोणाही मनुष्याला स्वतःला मुक्त करता येत नाही,
किंवा आपल्या जिवाबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.
त्याच्या जिवाची खंडणी त्याच्या मर्यादेपलीकडे आहे.
तो आपला जीव कधीच विकत घेऊ शकत नाही,
किंवा गर्तेचा अनुभव टाळू शकत नाही.
४) तो पाहतो की, ज्ञानी मरतात, तसेच
मूढ आणि पशूतुल्य नष्ट होतात आणि
आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ९:३८-४०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. "
योहान येशूला म्हणाला, "गुरुजी आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता," पण येशू म्हणाला, "त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महकृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: “चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे पाप आहे.” (याकोब ४:१७). परमेश्वराने मानवाला एक सुंदर दान दिलेले आहे ते म्हणजे सद्सद् विवेकबुद्धी. त्याच्यामुळे त्याला चांगले काय आणि वाईट काय ह्याची जाण होते. माणूस बऱ्याच वेळेला जेव्हा स्वार्थी होतो तेव्हा तो वाईटाची साथ देत असतो. त्याला ठाऊक असते की त्याला चांगले करायचे आहे तरी पण ते तो करत नाही. म्हणून संत याकोब म्हणतो की, त्याचे पाप मोठे आहे. परमेश्वराच्या दिलेल्या दानाचा दुरूपयोग हाच आहे. बायबलमधील लाजरस व श्रीमंत माणसांची गोष्ट तुम्हाला ठाऊकच आहे. शुभवर्तमानात येशूच्या सामर्थ्यविषयी आपण ऐकतो. येशूच्या नावाची कीर्ती महान आहे. येशूचे नाव हाच आमचा आसरा आहे. हे आपण आपल्या मुखाने कबूल करू शकतो का? येशूच्या नावात कृपा, सामर्थ्य आणि शक्ती आहे. आपण त्याचा अनुभव घेतला आहे का? चला बोलूया येशू... येशू.. येशू..
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता आत्मसात करुन ती इतरांपर्यंत पोहोचविता यावी । ह्यासाठी मला प्रेरणा व पवित्र आत्म्याचे सामर्थ्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या