Marathi Bible Reading | Thursday 24th February 2022 | 7th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सातवा सप्ताह 

गुरुवार 

 दि.२४ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
 कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल,


संत सिझेरिअस
- वैद्य (... ३६९) 
✝️

'अन्याय, अत्याचार आणि स्वार्थासाठी केलेली इतरांची पिळणूक या विरुद्ध परमेश्वर धनवानांना आणि जुलूम करणाऱ्यांना त्याचे प्रतिफळ देईल', असे संत याकोब म्हणतो. 
आजच्या शुभवर्तमानात असे म्हटले आहे की, 'विश्वासणाऱ्यास पापासाठी प्रवृत्त करणाऱ्याला समुद्रात टाकून द्यावे.' आपले शरीर हे पवित्र देवाचे मंदिर आहे, म्हणूनच आपला प्रत्येक अवयव देवाच्या गौरवासाठी आणि इतरांच्या चांगुलपणासाठी आहे. आपले हात, पाय, डोळे त्याच प्रमाणे आपले विचार पापास प्रवृत्त करणारे नसावेत, तर ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी परोपकार करणारे असावेत. आज ख्रिस्तप्रभू आपल्याला इशारा देत आहे की, 'प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल.'
देवाच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी प्रभू आपल्याला मीठाची उपमा देत आहे. मीठ जसे प्रत्येक पदार्थाची रूची वाढवते तसेच आपणसुद्धा आपल्या ख्रिस्ती जीवनाद्वारे इतरांच्या जीवनात आनंद व उत्साह निर्माण करायला हवा. आपल्या प्रत्येकाला शांतीने व प्रेमाने जीवन जगता यावे म्हणून आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करू या.



✝️   

पहिले वाचन याकोब ५:१-६
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन 
“कापणी करणाऱ्या कामकऱ्यांचा आक्रोश प्रभूच्या कानी गेला आहे."

अहो, धनवानांनो जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रुपे ह्यांवर गंज चढला आहे. त्यांचा तो गंज तुम्हांविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठवले आहे. पाहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी आणि विलास केला, वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्यांचा घात केला; तो तुम्हांस विरोध करत नाही.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४९ : १४-२०
प्रतिसाद : जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
मत्तय ५:३

१) जे अभिमानी आहेत त्यांची आणि 
त्यांचे बोलणे ज्यांस पसंत पडते 
अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे. 
मेंढरांसारखा त्यांचा शेवट गर्तेत होतो, 
तेथे मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल आणि 
धार्मिक त्यांच्यावर सत्ता चालवतील.

२) प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान 
त्याच्यावर प्रभुत्व चालवतील, 
त्यांचे देह गर्तेत नाश पावतील, 
त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही. 
परंतु देव माझा जीव गर्तेच्या कब्जातून सोडवील 
आणि तो मला आपणाजवळ घेईल.

३) कोणी मनुष्य धनवान झाला, 
त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी तू घाबरू नकोस.
 कारण तो मृत्यू पावेल तेव्हा 
बरोबर काहीच घेऊन जाणार नाही, 
त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.

४ तो जिवंत असता
आपल्या जिवाला धन्य समजून म्हणेल, 
“तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे 
लोक तुझी स्तुती करतील," 
तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल,
 त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडणार नाही.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझ्या नियमानुसार चालण्यास मला शिकव, ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   ९:४१-५०

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"दोन हात असून नरकात जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात यावे, हे तुझ्या हिताचे आहे."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पेलाभर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचित सांगतो.

विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एक डोळा होऊन देवाच्या राज्यात जाने हे तुझ्या हिताचे आहे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल ? तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: संत याकोबाचे वाचन आपल्याला न्यायाचे जीवन जगण्यास बोलावत आहे. आपल्या व्यावहारिक जीवनात न्यायभावनेने वागावे, कोणाची लुबाडणूक करू नये, फसवणूक करू नये. विशेषकरून आपल्या कामगाराची न्यायाने आणि सत्याने वागवणाऱ्याचा सर्वत्र सन्मान होत असतो. जुन्या करारातील शलमोन राजाची गोष्ट आपणांस ठाऊकच आहे. त्याचा सर्वत्र सन्मान झाला कारण तो न्यायाने, सत्याने वागला. आज प्रत्येकाची पैसे कमावयास शर्यत लागली आहे. मी कसा श्रीमंत होऊ शकतो हे सर्वजण पाहत आहेत. त्यामध्ये गरीब व गरजू लोकांची आपण पिळवणूक करतो. परंतु ते आपला विरोध करत नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, स्वर्गात त्याचे प्रतिफळ मोठे आहे. कारण ते एकमेकांबरोबर शांतीने राहतात. कारण त्यांच्या मेहनतीने ते आपले जीवन मिठासारखे रुचकर बनवतात.
प्रार्थना :  हे प्रभू येशू, आमच्या शब्दाद्वारे, कृतीद्वारे व विचाराद्वारे आम्ही  इतरांची सेवा करावी व तुझी सुर्वाता पसरावी म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या