सामान्यकाळातील सातवा सप्ताह
शुक्रवार
दि.२५ फेब्रुवारी २०२२
बंधूंनो, तुम्ही एकमेकांविषयी कुरकुर कराल तर तुम्ही दोषी ठराल. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःखसहन आणि त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे, ह्यावरून प्रभू फार कनवाळू आणि दयाळू आहे हे तुम्हांला दिसून आले. माझ्या बंधूनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला होय म्हणावयाचे तर होय म्हणा, नाही म्हणावयाचे तर नाही म्हणा.
सर्व : देवाला धन्यवाद.
शुभवर्तमान मार्क १०:१-१२
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये."
येशू यहुदिया प्रांतात यार्देनच्या पलीकडे गेला, तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला.
परुशी तेथे आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय ?" उत्तरादाखल तो म्हणाला, "मोशेने तुम्हाला काय आज्ञा केली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” येशू त्यांना म्हणाला, "तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून 'देवाने त्यांना स्त्रीपुरूष असे उत्पन्न केले.' ह्या कारणामुळे 'पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ते एकदेह होतील.' ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते मनुष्याने तोडू नये."
नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जो कोणी आपल्या बायकोला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या