Marathi Bible Reading | Saturday 26th February 2022 | 7th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील सातवा सप्ताह 

शनिवार 

 दि.२६ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
“बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, 
संत मेखतिल्ड
(कुमारिका १२४०-१२९८)
✝️
प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती करणाऱ्या काही भक्तिमान व नीतिमान संत स्त्रियामध्ये संत गुर्टुडबरोबर संत मेखतिल्ड हिचा क्रमांक खूप वरचा लागतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा संत मेखतिल्ड हिला म्हटले, “सकाळी जेव्हा तू जागी होशील तेव्हा तुझ्या मुखाद्वारे तू प्रथम माझ्या अतिपवित्र हृदयाला वंदन कर आणि स्वतःला माझ्या हाती सोपव." "
चिंतन: प्रभू येशूने मेखतिल्ड हिला दिलेल्या दृष्टांतात एकदा म्हटले होते, 'जेव्हा लोक माझ्याकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करतात तेव्हा मला आनंद होतो. त्यांच्या अपेक्षेपेक्षा मी त्यांना अधिक देण्यास सदैव तयार असतो.'



प्रार्थना निरनिराळ्या प्रकारे करता यावी म्हणून संत याकोब स्पष्ट करीत आहे. 'प्रार्थना करावी, स्तोत्रे गावी, वडील मंडळीला बोलावून तेल लावावे, ओणवून प्रार्थना करावी, विश्वासाने प्रार्थना करावी.

येशूने त्यांना जवळ घेतले. इतकेच नव्हे तर बालकांना आलिंगन देऊन प्रभूने त्यांना आशीर्वाद दिला. प्रभू येशूचा तो प्रेमळ स्पर्श किती आल्हाददायक असेल. बालकांना येण्यास मनाई करणाऱ्या शिष्यांची प्रभूने कान उघडणी केली . आपण बालकांप्रमाणे निरागस, नम्र व निष्पाप बनले पाहिजे म्हणूनच 'लहानपण देगा देवा' अशी आळवणी कराविशी वाटते. बालकांतील जे  चांगले गुण आहेत ते जोपासण्यासाठी आपण प्रेरणा स्रोत बनणे आवश्यक आहे.

प्रभू येशूचा स्पर्श, त्याचा आशीर्वाद व त्याची करुणा आपल्या प्रत्येकाला लाभावी म्हणून प्रभूच्या सहवासात जाऊ या. स्वतःबरोबरच जे प्रभूपासून दुरावले आहेत, जीवनातील समस्येमुळे दुःखी, कष्टी आहेत, आजारी आहेत अशा सर्वांसाठी  आज विशेष प्रार्थना करु या. 

✝️   

पहिले वाचन याकोब ५:१३-२०
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन 
“नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रवक असते, "

तुम्हापैकी कोणी दुःख सहन करीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावी, तुम्हीपैकी कोणी दुखणाईत आहे काय ? त्यांने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. माझ्या बंधूंनो, तुम्हांमधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरवले, तर अशा पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो, तो स्वतःचा जीव मरणापासून वाचवील आणि पापांची रास झाकील हे ध्यानात ठेवा.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४१ : १-३,८
प्रतिसाद :   माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे सादर होवो.

१ हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो,
 माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो 
तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. 
माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, 
माझे हात उभारणे 
संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे, सादर होवो.

२)हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, 
माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. तरी हे प्रभू परमेश्वरा, 
माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; 
मी तुझ्यावर भरवसा टाकला आहे, 
माझा जीव जाऊ देऊ नकोस.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   १०:१३-१६

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश देवराज्यात मुळीच होणार नाही."

येशूने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, तेव्हा शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. मग त्याने त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आपण नेहमीच म्हणत असतो, लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. कारण ती निरागस आणि निर्मळ असतात. त्यांच्यात स्वार्थ, कपट, राग कधीच नसतो. राग जरी असला तरी क्षणिक असतो. म्हणून येशू आपल्या शिष्यास सांगतो की, तुम्ही लहान मुलांसारखे निरागस होण्यास शिका. बालिश होऊ नका. आपले आजी आजोबा लहान मुलांना आंजण म्हणायचे कारण ते देवदूताप्रमाणे असतात. आपल्यात प्रत्येकात एक देवदूत लपलेले आहे. आपण तो शोधत आहोत का? आज ते आपल्यातील बालक शोधण्याचा प्रयत्न करू या. बाळक होऊन येशूकडे येऊ या.

प्रार्थना : हे प्रेमळ येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा लाभू दे, तुझा आशीर्वाद आम्हावर सर्वदा असू दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या