Marathi Bible Reading | 27th February 2022 |8th Sunday in Ordinary Time

 सामान्यकाळातील आठवा  

 रविवार 

 दि.२७ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? 



दोघेही खोल खड्डयात पडतील की नाही?

✝️

माणसाचे शब्द त्याचा स्वभाव दर्शवितात म्हणजेच जे अंतःकरणात व विचारात असते तेच शब्दाद्वारे प्रकट होत असते. माणसाच्या स्वभावाचे मूळ त्याच्या विचारात आणि आचारात दडलेले असते.

मनुष्य स्वभाव स्वतःचे दोष न पाहता इतरांचे दोष काढीत असतो  परमेश्वराने प्रत्येक माणसाला योग्यतेप्रमाणे वरदाने दिलेली असतात. म्हणुनच आपण आपल्या योग्यतेप्रमाणेच कार्यशील  असावे.  आपण  कुणाचे दोष काढू नये किंवा कुणाला आपल्या पेक्षा कमी समजू नये. परमेश्वर वाकड्या रेषेत सरळ लिहितो असे म्हणतात. आपण प्रथम स्वतःला ओळखावे  आणि मगच इतरांशी आपली तुलना करावी. प्रभू आज म्हणत आहे, प्रत्येक झाड त्याच्या फळापासून ओळखू येते. तसेच जे चांगले ते चांगलेच असू शकते. त्यासाठी आपण अंतःकरण तपासून पाहायला हवे. अंतरमनाने  प्रत्येकाची ओळख करुन घ्यायला हवी. त्यासाठी परमेश्वराचा ज्ञानाचा,  शहाणपणाचा, समंजसपणाचा आणि सामर्थ्याचा आत्मा जाणून घेऊन  परमेश्वराला आळवावे.
प्रभू येशू सर्वगुरुंचा गुरु, प्रभूंचा प्रभू आणि सामर्थ्यशाली देव आहे. त्याला आपणशरण जाऊ या. व त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा निर्धार करु या.

✝️   

पहिले वाचन बेन सिरा २७:४-७
वाचक बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"कोणत्याही माणसाचे मत ऐकल्याशिवाय त्याची स्तुती करू नये. "

सूप हलवल्याने त्यातील कचरा दिसतो, तसेच माणसाचा दुष्टपणा त्याच्या भाषेत दिसून येतो. कुंभाराच्या मडक्याची परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची परीक्षा संभाषणात होते. फळाच्या प्रकारावरून झाडाची गुणसंपन्नता दिसून येते, तसेच माणसाच्या बोलण्याच्या प्रकारावरून त्याची मनोवृत्ती कळून येते. कोणत्याही माणसाचे मत ऐकल्याशिवाय त्याची स्तुती करू नकोस, कारण मतप्रदर्शनावरून माणसाची खरी परीक्षा होते.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९२:२-३,१४-१६
प्रतिसाद : तुझे उपकारस्मरण करणे चांगले आहे. :

१) परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, 
हे सर्वोच्च देवा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे, 
प्रभातसमयी तुझे वात्सल्य 
आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे चांगले आहे.

२) नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, 
तो लबानोनवरील गंधसरूसारखा वाढेल.

३) जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत 
ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील,
वृद्धपणातही ते फळ देत राहतील, 
ते रसभरित आणि टवटवीत असतील; 
ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. 
तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.

दुसरे वाचन  १करिंथ १५:५४-५८
वाचक: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"देवाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय दिला आहे."

हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे" असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. “अरे मरणा, तुझा विजय कोठे ? अरे मरणा, तुझी नांगी कोठे ?”  मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो ! म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर आणि अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली; जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  ६:३९-४५

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“मनुष्याच्या अंत:करणात जे भरले आहे तेच त्याच्या मुखातून निघते."

येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खोल खड्डयात पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले भुसळ न पाहता आपल्या भावाला म्हणशील, 'बंधू, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे' अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.

कारण ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: “बाप तसा बेटा”, “खाण तशी माती”, “झाड तसे फळ” ह्या उक्तीनुसार माणूस ज्याप्रकारे जीवन जगतो तशाच प्रकारचे फळ त्याच्या जीवनरूपी झाडाला लागत असते. माणसाच्या जीवनात विचार, शब्द व कृती यामध्ये सुसंगती असेल तर त्याच्या जीवनाला सदाचाराची चांगली फळे लागतात. मात्र या तिन्हींमध्ये विसंगती असेल तर त्याच्या जीवन विकृतींची विषारी फळे लागत असतात. 
१. शब्दाचा यथायोग्य वापरः माणसाच्या भाषेवरून त्याची एकंदर जीवनशैली दिसून येते. शब्द संपत्ती, शब्दाचा सुस्पष्ट उच्चार, शब्दाचा यथोचित वापर यावरून त्याचे बुद्धीचातुर्य दिसून येते. एक योग्य शब्द माणसाला जसा कळसाला घेऊन जातो तसाच एक चुकीचा शब्द माणसाला रसातळाला घेऊन जात असतो. आजचे पहिले वाचन आपल्यासमोर शब्दाचे महात्म्य सादर करते. आपल्या जिभेचा योग्य वापर करून व वेळीच मौन राखून माणूस जग जिंकू शकतो कारण शब्द हे चांदीसारखे असतात तर मौन हे सोन्यासारखे असते. 
२. विचारांना योग्य दिशाः माणूस जसा विचार करतो तसा तो बनत जातो. माणसाच्या मानात येणाऱ्या विचारांवर माणसाचे नियंत्रण नसले तर जीवनात अंदाधुंदी माजते. चांगल्या व उदात्त विचारांमध्ये व्यक्तीची, समाजाची राष्ट्राची व अखिल जगाची प्रगती साधण्याची क्षमता असते. तर दुर्विचारात वा कुविचारात / अविचारात माणसाच्या अधोगतीचे बीज दडलेले असते. म्हणूनच आपण कसा विचार करतो. त्यावरही विचार होणे गरजेचे आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात मरणापलीकडचा विचार करण्यात आलेला आहे. 
३. कृतीचे योग्य नियोजनः एखाद्या झाडाला कितीही चांगली फळे आली तरी त्या फळांचे पुढे करायचे काय याविषयी जर योग्य नियोजन केले गेले नाही तर तीच फळे वाया जाण्याचा धोका संभवतो. नियोजन शून्य अनेक कृती, “एक ना धड, भाराभर चिंध्या” अशा अवस्थेत माणसाला नेतात. म्हणूनच प्रथम आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याची कृती करावी मगच दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढण्यास त्यांना हातभार लावावा, असे येशू आजच्या शुभवर्तमानात शिकवितो.

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनरूपी झाडाला कोणकोणती चांगली फळे येतात? माझे विचार मला योग्य दिशेने कृती करण्यास साहाय्यक ठरतात की अडथळारूप बनतात

प्रार्थना :  प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तुझ्यासाठी फलदायी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या