सामान्यकाळातील आठवा सप्ताह
सोमवार
दि.२८ फेब्रुवारी २०२२
✝️
✝️
धन-दौलत, पैसा, संपत्ती, जागतिक वैभव म्हणजे श्रीमंती असे काही जणांना वाटत असते. श्रीमंती मिळविण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारी माणसे आपल्या सभोवताली वावरत आहेत. जीवन जगण्यासाठी भौतिक संपत्तीची गरज आहे,केवळ धन दौलतीचा हव्यास मनुष्याला नाशाकडे नेत असतो. म्हणूनच आजच्या प्रभूच्या वचनावर आपण चिंतन करु या.
श्रीमंती वाईट नाही किंवा प्रभू येशू श्रीमंतांच्या विरोधात नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूला सार्वकालिक जीवनाविषयी एका श्रीमंत माणसाने प्रश्न विचारला. आपण भौतिक व जागतिक गोष्टींच्या मोहजाळात अडकून न पडता स्वर्गीय संपत्तीचा ध्यास घ्यायला हवा. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण सार्वकालिक म्हणजेच स्वर्गीय जीवनाचे वारसदार आहोत, मात्र त्यासाठी त्याग, समर्पण आणि एकनिष्ठेने प्रभूला अनुसरणे गरजेचे आहे.
जागतिक श्रीमंती आणि वैभव आपल्याला देवापासून व सार्वकालिक वैभवापासून दूर घेऊन जाऊ शकतात. म्हणूनच आपण पैसा व श्रीमंतीचे गुलाम न बनता प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन १पेत्र १:३-९
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही ख्रिस्ताला पाहिले नसताही त्याच्यावर प्रीती करता आणि विश्वास ठेवता म्हणून तुम्ही अनिर्वाच्य आनंदाने भरला आहात."
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ आणि अक्षय वतन मिळवण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्याद्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहा, त्या तुम्हांसाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करता. तरी तुम्ही आता थोडावेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले. ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असा तुमचा विश्वास हा ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस त्याची प्रशंसा, गौरव आणि मान ठरावा. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसताही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १११ : १-२,५-६,९,१०
प्रतिसाद : प्रभू आपल्या कराराचे सदैव स्मरण ठेवतो.
१) परमेश्वराचे स्तवन करा. सज्जनांच्या सभेत
आणि मंडळीत मी अगदी मनापासून
परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत,
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात
२) ज्याने आपले भय धरणाऱ्यांना अन्न दिले आहे;
तो आपला करार सदा स्मरतो.
त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन
आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.
३ ) त्याने आपल्या लोकांना उद्धारदान
पाठवून दिले आहे, त्याने आपला करार
सर्वकाळासाठी नेमला आहे.
त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे.
४ परमेश्वराचे भय ज्ञानाचा होय;
त्याप्रमाणे जे वागतात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते.
त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
माझ्या देवा, तुझे मार्ग मला दाखव,
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १०:१७-२७
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुझे असेल नसेल ते विकून टाक आणि चल, माझ्या मागे ये."
येशू वाटेला लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “सर्वश्रेष्ठ गुरुजी, सार्वकालिक जीवनाचे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?" येशू त्याला म्हणाला, "मला श्रेष्ठ का म्हणतोस ? एक जो देव त्याच्यावाचून कोणी सर्वश्रेष्ठ नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत. 'खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, कोणाला ठकवू नको, आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख. " त्याने त्याला उत्तर दिले, "गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे." येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, "तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." तो फार श्रीमंत होता. म्हणून हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्टी होऊन तो निघून गेला.
तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, "देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे फार कठीण आहे." तेव्हा त्याच्या बोलण्याने शिष्य थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे." तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले की, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे ?" येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “मनुष्यांना ते अशक्य आहे, परंतु देवाला नाही; देवाला सर्वकाही शक्य आहे.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात एका गृहस्थाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येशू समर्पक शब्दांत देत आहे. गोरगरिबांची काळजी घे. कारण गोरगरीब हे आपल्याबरोबर नेहमीच आहेत. गोरगरिबांची सेवा म्हणजे स्वर्गात जाण्याचा महामार्ग. आपल्या जीवनात गोरगरिबांकडे पाहाण्याचा दृष्टीकोण कसा आहे. देवाने दिलेले दान, पैसा हा केवळ माझ्यासाठीच नसून हा त्याचाच्यासाठीसुद्धा आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आज जर आपण विसरलो तर शुभवर्तमानातील गृहस्थासारखे आपण जीवनात जाणार आहोत. जीवनात जर आनंदी राहायचे असेल तर गोरगरिबांची सेवा हाच उत्तम मार्ग आहे. येशूचे मत्तय शुभवर्तमानात अध्याय ५ मध्ये डोंगरावरील प्रवचन वाचूया व जीवनाचा आधार बनवू या...
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या