सामान्यकाळातील आठवा सप्ताह
मंगळवार
दि.१ मार्च २०२२
✝️
“अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने
सार्वकालिक जीवन मिळेल."
✝️
आपण देवाची आज्ञांकित मुले बनावीत व पवित्र जीवन जगावे म्हणून आवाहन करण्यात येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या प्रेषितांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली.
ख्रिस्तासाठी आणि सुवार्तेसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या सर्वांना स्वर्गीय नंदनवनात अक्षय आनंदाचे जीवन मिळाले. मात्र त्यासाठी त्यागच नाही, तर ख्रिस्ताप्रमाणे छळ व दुःख सहन करावे लागले. आपण सर्वजण प्रभू येशूचे अनुयायी आहोत. आपल्या सर्वांना आत्मत्याग, दुःख सहन व सेवाकार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. प्रभू येशूने स्वत:ला पूर्णपणे रिक्त केले व त्याने आपले सर्वस्व आपल्या तारणासाठी समर्पित केले. प्रभू येशूचे औदार्य शब्दात वर्णन करता येत नाही. आपला त्याग व औदार्य वाया जाणार नाही तर त्याच्या शंभरपटीने आपणास देवाचा आशीर्वाद मिळणार आहे.
✝️
पहिले वाचन १ पेत्र : १:१०-१६
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
बंधूंनो, ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला; त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुम्हासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहाण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. म्हणून तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार आचरण करू नका, तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४
प्रतिसाद : परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने स्वतः साठी विजय साधला आहे.
२) परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे,
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया
आणि आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी
आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने,
आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १०: २८-३१
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
पेत्र येशूला म्हणू लागला, 'पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.' येशूने उत्तर दिले, 'मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते •पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू आपणास खऱ्या शिष्यत्वाविषयी सांगत आहे. येशूचा अनुयायी होणे म्हणजे अनेक गोष्टींचा त्याग करणे. सध्याच्या परिस्थितीत कदाचित आपणास घरदार, आईवडील ह्यांना सोडावे लागणार नाही तर ख्रिस्ती मूल्यानुसार जीवन जगताना आपणांस आपल्या काही सवयी, जीवन जगण्याची शैली, राग, अहंकार ह्यांचा त्याग करणे गरजेचे आहे. येशूच्या शिकवणुकीनुसार जीवन जगत असताना आपले आचरण जगाच्या दृष्टीने विसंगत असल्यामुळे अनेक लोक आपणास सोडून जातील. आपणास अनेक संकटे, दुःख ह्यांना सामोरे जावे लागेल, पण येशू आपणांस जीवनातील घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलण्यास सांगत आहे. जगाच्या दृष्टीने जरी आपण दुःख सहन करीत असलो तरी येशू आपणास सार्वकालिक आनंदाची हमी देत आहे. जे धनवान, प्रतिष्ठित ते जगाच्या दृष्टीने श्रेष्ठ असतात पण येशू सांगतो जे जगाच्या दृष्टीने प्रथम ते माझ्यापुढे कनिष्ठ ठरतील कारण जे नम्र व
श्रद्धावंत तेच स्वर्गराज्य उपभोगतील,ख्रिस्ती ह्या नात्याने जेव्हा मला त्रास सहन करावा लागतो तेव्हा माझी प्रतिक्रिया काय असते ह्यावर मनन करू या.
प्रार्थना : हे प्रभू, सार्वकालिक जीवन देणारा तू देव आहेस. त्याग व समर्पण करुन सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या