सामान्यकाळातील १४वा सप्ताह
मंगळवार ५ जुलै २०२२
"पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा."
चिंतन : आपल्याला विरोध करणारे स्वतःचेच नुकसान करीत असतात व देवाचा क्रोध आपणावर ओढवतात. त्यामुळे त्यांच्यावर रागावण्याऐवजी आपल्याला त्यांची कीव कराविशी वाटली पाहिजे. इतकेच काय त्यांच्या अशा वर्तनाने आपण अंतर्यामी भक्कम होत जातो त्यामुळे आपण त्यांचे आभार मानायला हवेत. - संत अँथनी मेरी झॅकरी
प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला कारण, 'मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक बहकलेले होते.' प्रभू येशूने अशा सर्वांना जवळ केले. त्यांच्या व्यथा समजून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. देवाचे वचन आणि देवराज्याची घोषणा करीत प्रभू येशूने अंधांना दृष्टी, मुक्यांना वाचा व बहियांना श्रवण शक्ती दिली. आजारी, अपंग आणि पीडित जनांना विश्वासात बळकट करुन महान चमत्कारांद्वारे देवाचे प्रकटीकरण केले. प्रभू येशू सर्वांचा मेंढपाळ, सरंक्षण कर्ता, मार्गदर्शक, प्रकाश व मुक्तीदाता बनला.
आपण जर देवापासून, चांगुलपणापासून, सत्यापासून बहकून दूर गेलो असल्यास प्रभू येशूला आपला प्रभू आणि मेंढपाळ म्हणून त्याचा स्वीकार करु या. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या कृपेच्या छायेत राहण्यासाठी प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन :होशेय ८:४-७,११-१३
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन“ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात. "
परमेश्वर म्हणतो : त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यांना माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती केल्या. हे शोमरोन, तुझ्या वासराचा त्याला वीट आहे. त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यांना निर्दोषता प्राप्त करायला किती काळ लागेल? कारण हेही इस्राएलकडून झाले. कारागिराने ते केले; ते देव नव्हेत. या शोमरोनच्या वासराचे तुकडेतुकडे होतील. कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात. त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील. कारण इफ्राइमने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत. ह्या वेद्या त्याला पापमूलक झाल्या आहेत. मी त्याच्यासाठी आपल्या धर्माशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या तरी त्याला त्या परक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल आणि त्यांच्या पापांचे शासन करील; ते इजिप्तला परत जातील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११४:३-१०
प्रतिसाद : हे इस्त्राएल, परमेश्वरावर भाव ठेव.
१ ) आमचा देव स्वर्गात आहे,
त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो,
त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत,
त्या मनुष्यांच्या हातानी बनवलेल्या कृती आहेत.
२) त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही,
त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही,
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही;
त्यांना नाक आहे पण वास येत नाही.
३) त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही;
पाय आहेत पण चालता येत नाही.
त्या बनवणारे आणि त्यांच्यावर भाव ठेवणारे,
सर्व त्यांच्यासारखे बनतात
४) हे इस्राएल परमेश्वरावर भाव ठेव;
तोच त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांची ढाल आहे
हे अहरोनच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव;
तोच त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांची ढाल आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ९:३२-३८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. "
एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "इस्राएलात असे कधीही पाहण्यात मिळाले नव्हते." परंतु परुशी म्हणू लागले, हा भुतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भुते काढतो.” नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्यांच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे, ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, "पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : भूतग्रस्त मनुष्याला वाचा प्राप्त झाली या उताऱ्यावरून आपली दोन प्रकारच्या लोकांशी भेट घडते. एका बाजूला चमत्कार पाहणारा जमाव आश्चर्यचकित, अचंबित होतो. इसराएलात कधीही न पाहिलेल्या गोष्टीला ते पृष्टी देतात. तर दुसऱ्या बाजूला येशू बालजबुलाच्या साहाय्याने भुते काढतो व इतरांना बरे करतो असा आरोप त्याच्यावर केला जातो. वास्तविक समाजात दोन प्रकारचे नेतृत्व करणारे लोक असतात. एका ठिकाणी आपल्या कार्याबद्दल प्रशंसा करून स्तुती सुमनाची माळा घेऊन येणारी मंडळी तर दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यात अडथळा बनून शाब्दिक दगडमार करणारी मंडळी. दुसरे माझ्यावर दगड फेकतात याविषयी तक्रार नकरता त्या दगडाची मला फुले कशी करता येतील हे प्रभू येशू आपल्याला शिकवतो. एखाद्या प्रसंगाकडे पाहून दोन भिन्न - भिन्न प्रकारच्या प्रतिक्रिया देणारे पडसाद आपल्या कानावर पडू शकतात. आपण अर्धवट पाण्याने भरलेल्या ग्लासकडे दोन दृष्टीकोनातून पाहू शकतो. अर्धवट भरलेला ग्लास व अर्धवट रिकामी असलेला ग्लास. एकारुमालावर एक काळा डाग आपले लक्ष केंद्रित करू शकतो किंवा सफेद रंगाच्या पूर्ण रुमालावर आपलं लक्ष जाऊ शकते. आपल्याला काय बघायचे आहे व कसे बघायचे आहे हे आपल्यावर अवलंबून आहे.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस, तुला अनुसरण्यास व तुझ्या सहवासात जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या