Marathi Bible Reading | Wednesday 6th July 2022 | 14th Week In Ordinary Time

सामान्यकाळातील १४वा  सप्ताह 

बुधवार ६ जुलै २०२२

"जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'"

 संत मारिया गोरेटी

- कुमारिका, रक्तसाक्षी (१८९०-१९०२)

अगदी आधुनिक काळातील ही शुद्धतेचा आदर्श असलेली विसाव्या शतकातील  इटालीतील मार्चे प्रांतातील कोरियाल्डो येथे एका शेतमजुराच्या घरात जन्मलेल्या सात भावंडांमध्ये मारियाचा क्रमांक तिसरा होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही.. तिच्या अशिक्षित आईने मात्र आपल्या माहितीतले सर्व प्रकारचे धर्मशिक्षण घरीच शिकवून तिच्यात ख्रिस्ती सद्गुणांची जोपासना केलेली होती. मारियेचे वडील मरण पावले. त्यामुळे शेतमजुरीच्या कामाचा संपूर्ण भार तिच्या आईवर येऊन पडला. आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी मात्र मारियेने पूर्ण मनाने स्वीकारली.

वयाच्या ११ व्या वर्षी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारला. त्याची पूर्वतयारी म्हणून तिने खास आध्यात्मिक तपसाधना केलेली होती.  आतापर्यंत येशूला कोणत्याही पापाने तिने दुःखविण्याचे कौशल्याने टाळलेले होते. आज्ञाधारकपणा, नेमस्तपणा, शुद्धता आणि देवाचे भय तिच्याठायी ओतप्रोत भरून वाहात होते. परंतु आता तिने आपल्या प्रभूला संतोषविण्याचा आणि सर्वांना मदत करण्याचा जाणीवपूर्वक निश्चय केला.

कुमसाराला जायचे म्हणजे सात मैलांचे अंतर कापायचे आणि येताना तितकेच अंतर चालायचे. परंतु आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तिने तो त्याग सहजरित्या करून दाखविला.

तिच्या घराशेजारी आलेक्झांड्रो नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा आणि वासनेने होरपळत असलेला तरुण राहात होता. अनैतिक कृत्य करण्यासाठी त्याने ११ वर्षीय मारिया हिला तीन वेळा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने तिच्यावर १४ वेळा वार केले. मारिया रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि ६ जुलै १९०२ साली मरण पावली. मरता मरता तिने आपल्या आईजवळ एक इच्छा व्यक्त केली की, 'ज्या व्यक्तीने हे पापकृत्य केलेले आहे तिचे पूर्णपणे परिवर्तन व्हावे.'
देव नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. आलेक्झांड्रोने हे कृत्य केल्यानंतर तो घरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. २९ वर्षे तुरुंगात राहिला. परंतु त्या कालावधीत कित्येक वेळा त्याला मारिया गोरेटी हिने दर्शने देऊन आपल्या पापांबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आलेक्झांड्रो एका मठात गेला. तेथे त्याने आपल्या पूर्वायुष्यातील सर्व पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारली.
असे करता करता १९५० साल उजाडले. पोप पायस बारावे ह्यांनी २५ जून रोजी पवित्र वर्षानिमित्ते आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मारिया गोरेटी हिला संतपद बहाल केले. त्यावेळी इतिहासात नोंदविल्या जाव्यात अशा तीन गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे रोमच्या इतिहासात पहिल्यांदाच संत पीटर बॅसिलिकामध्ये भाविकांची एवढी प्रचंड गर्दी जमलेली होती की हा अतिभव्य सोहळा संत पीटरच्या उघड्या मैदानावर घेण्यात आला.
दुसरी गोष्ट ह्या संताच्या संतीकरणासाठी स्वतः तिची वृद्ध, अर्धागवायूने पछाडलेली आई उपस्थित होती आणि तिसरी गोष्ट आलेक्झांड्रो हा धर्मगुरू होऊन या सोहळ्यासाठी उपस्थित होता. मारिया गोरेटीने केलेली प्रार्थना ऐकली गेली होती तर !

चिंतन : मरतेसमयी मारिया गोरेटीने आपल्या आईला सांगितले, “आई, जरी त्याने माझे तुकडे केले असते तरी मी कधीच पाप केले नसते. पापापेक्षा मला मरण आले तरी चालेल.” - संत मारिया गोरेटी
  
पहिले वाचन :होशेय १०:१-३,७-८,१२
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभूला शरण जाण्याचा हा समय आहे."
परमेश्वर म्हणतो: इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षाचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात. जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या, त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले. त्यांचे हृदय बेइमान आहे; आता त्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील, तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील.
आता ते निश्चित म्हणतील: “आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही; राजा आमच्या काय कामाचा ?" शोमरोन नाश पावला आहे, त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखा आहे. इस्राएलचे पाप म्हणजे आवेनची उच्चस्थाने नाश पावतील. त्याच्या वेद्यांवर काटेकुसळे आणि काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, आम्हांस झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आम्हावर पडा.
तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हांवर धार्मिकतेची वृष्टी करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०५:२-७
प्रतिसाद :   परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहा.

१) त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; 
त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. 
त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; 
ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे
 त्यांचे हृदय हर्षित होवो.

२) परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा,
 त्याच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा, 
त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार 
आणि त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. 

३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो, 
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो, 
तो प्रभू आमचा देव आहे:
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.

जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १०:१-७
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा."
येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत: पहिला पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलीप आणि बार्थोलोम्यू, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला (येशूला) धरून देणारा यहुदा इस्कार्योत.
ह्याबारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : प्रभू येशूचे शिष्यत्व म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी एखाद्याला बोलावणे व नियुक्त करणे होय. जगाच्या दृष्टीने जर आपण पाहिले तर येशूने निवडलेले बारा शिष्य सर्वात अशक्त असे उमेदवार होते. मात्र येशूने त्यांच्यामध्ये देवाच्या शिकवणीशी एकनिष्ठ राहून अस्सल ख्रिस्ती माणसांचे गुण पाहिले. देवाचे बोलावणे हे रहस्यमय आहे. देव सामान्य लोकांना असामान्य गोष्टी / कार्य करण्यासाठी बोलावितो. शिष्याचे कार्य हे दोन्ही प्रकारचे आहे. सुवार्ता सांगणे व लोकांना बरे करणे, तसेच आपल्या शब्दाद्वारे शिकवण देणे व कृतीद्वारे कार्य करणे. इस्रायल | लोकं ही देवाची निवडलेली प्रजा होती. देवाने त्यांना निवडले व बोलावले होते त्याच्याद्वारे देवाचं प्रेम ते जगाला घोषवतील मात्र वचनभूमीत पोहचल्यावर त्यांनी अन्य देवदेवतांची पूजा सुरू केली व हृदय कठोर करून देवाच्या विरुद्ध गेले. त्यामुळेच येशू आपल्या शिष्यांना सर्वप्रथम इसरायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा असं सूचित करतो. त्याद्वारे येशूला हेच सांगायचं आहे की आपल्या मिशन कार्याचा तो प्राथमिक स्तर आहे. अंतिम स्तर म्हणजे संपूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करणे. 

प्रार्थना :हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी सुवार्ता शब्दाद्वारे व कृतीद्वारे इतरांपर्यंत योहोच विण्यास आम्हाला कृपा व धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या