सामान्यकाळातील १४वा सप्ताह
गुरुवार ७ जुलै २०२२
"घरात जाताना, तुम्हांला शांती असो! असे म्हणा. "
संत पँटिनस
वर्तनसाक्षी (..... २१६)
शिष्यांच्या कार्याची रूपरेषा सांगताना प्रभू येशूने अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार शिष्यांना दिला. सर्व दुखणी म्हणजेच आजार बरे करण्याचा त्यांना अधिकार दिला. इतकेच नाही तर मेलेल्यांना उठविण्याचा अधिकार सुद्धा बहाल केला. हा अधिकार केवळ त्या बारा शिष्यांनाच नव्हे तर प्रभू येशूला स्वीकारणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती माणसाला देण्यात आला आहे. आपण सर्वजण प्रभू येशूच्या देवराज्याच्या सुवार्तेचे साक्षीदार व भागीदार बनू शकतो. प्रभू येशूने त्याच्या कृपेचे महान वरदान आपल्याला दिलेले आहे.आपण ख्रिस्ताशी एकनिष्ठ बनू या. त्याच्या कृपेच्या झऱ्यामध्ये न्हावून निघू या. त्याच्याशी एकरुप होऊन देवराज्य पसरविण्यासाठी पात्र बनावेत म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन :होशेय ११:१,३-४-८-९
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन"माझे हृदय खळबळले आहे.' "
परमेश्वर म्हणतो : इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून इजिप्तमधून बोलावले.
मीच एफ्राइमला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे; तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे ; मी क्रोधावेशाने येणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८०:२-३,१५-१६
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आपला मुखप्रकाश आम्हांवर पाड,
१) हे इस्राएलच्या मेंढपाळा, जो तू करूबारूढ आहेस
तो तू आपले तेज प्रकट कर.
तू आपला पराक्रम दाखव
आणि आम्हांला तारावयास ये.
२) हे सेनाधीश देवा, तू मागे फिर
असे आम्ही तुला विनवितो,
स्वर्गातून दृष्टी लावून पाहा
आणि ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर.
जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले,
जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा,
तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत;
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १०:७-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या."
येशूने आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे शिकवले, “जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका; कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना, तुम्हांला शांती असो! असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही, त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास नक्की सांगतो. 'न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशांना सोपे जाईल. "
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : देवाबद्दलचे आपले प्रेम म्हणजे देवाच्या प्रेमाला आपण दिलेला प्रतिसाद होय. देवाने मानवतेवर प्रथम प्रेम केले म्हणून आपण म्हणतो की, देव प्रेम आहे. बायबल देवाच्या प्रेमाचा खजिना आपल्यासमोर ठेवते. यशया संदेष्टा सांगतो, मातेच्या प्रेमापेक्षा देवाचे प्रेम हे महान आहे. संत योहान म्हणतो, देवाने आपल्यावर मित्राप्रमाणे प्रेम केले आहे. संत पॉल म्हणतो, आपण पापी असताना देखील देव आपल्यावर प्रेम करतो. शेवटी ख्रिस्त जसा ख्रिस्तसभेवर प्रेम करतो तसं पतीने आपल्या पत्नीवर प्रेम करावे. आजची वाचने देवाच्या प्रेमाची गहनता दर्शविते. इस्रायलने दाखविलेला प्रामाणिकपणा व देवाच्या प्रेमाला दिलेला नकार तरीसुद्धा देव इस्रायल लोकांना आणखी संधी देतो. सर्व अनिष्टापासून मी तुमचा बचाव करीन. मी सदासर्वदा तुमच्याबरोबर असेन. असे दिलासा देणारे सुखद वचन येशू आजच्या शुभवर्तमानात देतो. देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन तेच प्रेम दुसऱ्यांना देणे हा आपला आध्यात्मिक हेतू असावा.
प्रार्थना :हे प्रभू येशू, ख्रिस्ता, तुझ्या औदार्याबद्दल व कृपादानाबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो. इतरांपर्यंत तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी मला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या