Marathi Bible Reading | Friday 8th July 2022 | 14th Week In Ordinary Time

सामान्यकाळातील १४वा  सप्ताह 

शुक्रवार ८ जुलै २०२२

"तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. "

 
संत हेस्पेरस आणि जोई
रक्तसाक्षी (१३५)

सम्राट हेड्रियन ह्याच्या कारकीर्दीत तुर्कस्थानातील पंफुलियाच्या अट्टालिया नामक शहरात कॅटालुस नावाचा एक श्रीमंत उद्योगपती राहात होता. हेस्पेरस आणि त्याची पत्नी जोई हे या व्यापाराचे गुलाम होते. हे गुलाम जन्माने ख्रिस्ती होते. परंतु त्यांच्या श्रद्धेची पुरेशी जोपासना करण्याची संधी त्यांना न मिळाल्यामुळे ते आपल्या धर्माविषयी उदासीन होते. मात्र अशाही परिस्थितीत आपली दोन मुले सिरायकुस आणि थिओडलस ह्यांना त्यांनी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आवश्यक ते प्रोत्साहन आणि वाव दिला. आपापल्या परीने त्यांनी त्या दोघांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे ही मुले सद्गुणी बनली.

एकदा त्यांच्या ख्रिस्ती श्रद्धेची कसोटी लागण्याचा प्रसंग उद्भवला. कॅटालुस ह्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ते त्याने मूर्तीला अर्पण करण्यासाठी त्यांच्याकडे नैवेद्य पाठवून दिला. त्यावेळी आपल्या दोन्ही मुलांनी धर्माविषयी दाखविलेली उदासीनता पाहून या दोघांना धक्का बसला. त्यांची मान शरमेने खाली गेली. त्यांनी आपल्या मुलांसमोर उदाहरण घालून देण्यासाठी स्वत:हून तो नैवेद्य आपल्या मालकाकडे परत पाठवून दिला. त्यामुळे परिणामतः त्यांना अटक करण्यात आली.

त्यांची मनस्थिती अजमावून घेण्यासाठी त्यांना व्यापायासमोर हजर करण्यात आले. त्या चौघांनी उघडउघड आपली श्रद्धा प्रकट केली आणि मूर्तीना नैवेद्य अर्पण करण्यास सरळ सरळ नकार दिला. पालकांच्या भावनांना हात घालण्यासाठी व्यापाऱ्याने प्रथम दोन मुलांचा अनन्वित छळ केला. त्यांचे हाल पाहून तरी पालक आपली श्रद्धा पायदळी तुडवितील अशी आशा तो व्यापारी बाळगून होता. परंतु ज्या धैर्याने आणि विश्वासूपणाने त्यांच्या दोन मुलांनी ख्रिस्तासाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी झुंज दिली ते पाहून हेस्पेरस व जोई ह्यांना मनोधैर्य मिळाले. त्यांनी मोठ्या अभिमानाने नव्याने आपली श्रद्धा प्रकट केली.
हे पाहून व्यापारी संतापला. त्याने एका तप्त भट्टीवर दोघांना नखशिखान्त भाजून काढले. जास्टेलियन ह्यांनी पुढे कॉन्स्टॉन्टिनोपल येथे संत जोईच्या सन्मानार्थ एक चर्च उभारले. कालांतराने त्यांचे अवशेष क्लेअरमोंट येथे नेण्यात आले. आजही त्यांची भक्ती तेथे आयोजित केली जाते.

  
पहिले वाचन :होशेय १४:१-९
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आमच्या हातांनी बनविलेल्या कृतीला, 'आमच्या देवा,' असे यापुढे आम्ही म्हणणार नाही."

परमेश्वर म्हणतो : हे इस्राएल, परमेश्वर तुझा देव याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा; आणि म्हणा, “आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. असिरिया आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही; आमच्या हातांनी बनविलेल्या कृतीस, 'आमच्या देवा,' असे यापुढे आम्ही म्हणणार नाही. तुझ्याजवळ पोरक्यांस दया मिळते.”
मी त्याला वाटेवर आणीन; त्याच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्याच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्राएलला दंहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौदर्यं जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनसारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील, ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील आणि द्राक्षीप्रमाणे फळे देतील; त्यांची कीर्ती लबानोनच्या द्राक्षरसासारखी होईल.
एफ्राइमला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन, मी हिरव्यागार सरूसारखा आहे, माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी धार्मिक चालतील आणि पापीजन त्यात अडखळून पडतील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५१:३-४,८-९,१२-१७
प्रतिसाद : माझे मुख तुझी कीर्ती वर्णील.

१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून
माझ्यावर कृपा कर.
 तू आपल्या महान करूणेस अनुसरून
 माझे अपराध पुसून टाक.
मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक, 
माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर.

२) पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; 
तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. 
एजोब वनस्पतीने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन;
मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.

३) हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; 
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. 
तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस. 
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.

४) तू केलेल्या तारणांचा आनंद मला पुन्हा होऊ दे; 
उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर.
 हे प्रभो, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड,
 म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी
 माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १०:१६-२३
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 “बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे."
येशूने बारा जणांना पुढीलप्रमाणे शिकवले, पाहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे ह्याच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल; कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा; मी तुम्हांला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : देवाबद्दलचे आपले प्रेम म्हणजे देवाच्या प्रेमाला आपण दिलेला प्रतिसाद होय. देवाने मानवतेवर प्रथम प्रेम केले म्हणून आपण म्हणतो की, देव प्रेम आहे. बायबल देवाच्या प्रेमाचा खजिना आपल्यासमोर ठेवते. यशया संदेष्टा सांगतो, मातेच्या प्रेमापेक्षा देवाचे प्रेम हे महान आहे. संत योहान म्हणतो, देवाने आपल्यावर मित्राप्रमाणे प्रेम केले आहे. संत पॉल म्हणतो, आपण पापी असताना देखील देव आपल्यावर प्रेम करतो. शेवटी ख्रिस्त जसा ख्रिस्तसभेवर प्रेम करतो तसं पतीने आपल्या पत्नीवर प्रेम करावे. आजची वाचने देवाच्या प्रेमाची गहनता दर्शविते. इस्रायलने दाखविलेला प्रामाणिकपणा व देवाच्या प्रेमाला दिलेला नकार तरीसुद्धा देव इस्रायल लोकांना आणखी संधी देतो. सर्व अनिष्टापासून मी तुमचा बचाव करीन. मी सदासर्वदा तुमच्याबरोबर असेन. असे दिलासा देणारे सुखद वचन येशू आजच्या शुभवर्तमानात देतो. देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन तेच प्रेम दुसऱ्यांना देणे हा आपला आध्यात्मिक हेतू असावा. 

प्रार्थना :हे पवित्र व सामर्थ्यशाली पावन आत्म्या, ये आणि आमच्या मनातील भीती नष्ट कर आम्हाला, सुवार्ता प्रसाराचे माध्यम बनव, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या