Marathi Bible Reading | Saturday 9th July 2022 | 14th Week In Ordinary Time

सामान्यकाळातील १४वा  सप्ताह 

शनीवार ९ जुलै २०२२

“भिऊ नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे."



 गोर्कुम (हॉलंड ) चे रक्तसाक्षी - 

संत निकोलस पिएल आणि त्याचे सहकारी (१५७२)

सोळाव्या शतकात कॅल्विन नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला. मात्र पुढे त्याने ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीविरुद्ध उघड उघड बंड पुकारले आणि कॅल्विनिझम नावाची विचारसरणी मानणाऱ्यांचा एक पंथ स्थापन केला. प्रॉटेस्टंट पंथासमानच त्यांची शिकवण होती. कालांतराने हा पंथ इतका व्यापक बनला की त्यांनी कॅथलिक शिकवण पाळणाऱ्या लोकांचा छळ करायला सुरवात केली.
हॉलंडमधील गोर्कुम या धर्मप्रांतात त्यांनी एक मोठे अमानुष हत्याकांड घडवून आणले. १९ धर्मगुरू आणि व्रतस्थांना त्यांनी ठार मारले. त्यापैकी बारा जणांना केवळ अतिपवित्र साक्रामेंतातील येशूच्या खऱ्या उपस्थितीवरील विश्वासापायी क्रुसावर खिळण्यात आले. त्यात एक धर्मगुरू तब्बल ९० वर्षांचे वृद्ध होते.
उरलेल्या सात जणांपैकी जेम्स लाकॉप्स ह्यांना शिडीवर उलटे टांगवण्यात आले आणि सहा जणांना खांबावर टांगून मारण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची निर्जीव शरिरे एका सार्वजनिक खड्ड्यात टाकण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इ. स. १६१६ पर्यंत म्हणजे १९४४ वर्षापर्यंत त्यातील एकही देह कुजला नाही. पुढे त्यांचे अवशेष बेल्जियम येथील क्रुसेल्सच्या फ्रान्सिस्कन चर्चमध्ये पुरण्यात आले. इ. स. १८६७ साली त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले.
आपणा प्रत्येकाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व सामर्थ्याने आपण प्रभूची सुवार्ता  घोषविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्नशील बनू या.

पहिले वाचन :यशया  ६:१-८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. "
उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते; त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहासहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी आणि दोहोंनी तो उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, "पवित्र! पवित्र ! पवित्र ! सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय." घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले आणि मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, "हाय हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, "पाहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे." तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, "मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल ?" तेव्हा मी म्हणालो, "हा मी आहे, मला पाठव."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९३:१,२,५
प्रतिसाद : परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे.

१) परमेश्वर राज्य करतो,
त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; 
परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव 
घालून कंबर कसली आहे.

२ )म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही; 
तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे. 
तू अनादिकालापासून आहेस.

३ )तुझे निर्बंध अभंग आहेत. 
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा,
तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि 
ते मनापासून पाळावयास मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १०:२६-३३
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन   
"जे शरीराचा घात करतात त्यांना भिऊ नका.”

येशू आपल्या बारा प्रेषितांना म्हणाला, "गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही; शिष्याने गुरूसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्याला बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना किती तरी अधिक म्हणतील!" ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा आणि शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही ? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातल्या पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : गुरु व शिष्य यांचे नाते घनिष्ठ आहे हा महत्त्वाचा संदेश आजच्या वाचनात सापडतो. संदेष्टा यशयाला आपल्या अपात्रतेची जाणीव झाली. आपण देवाच्या पवित्रतेचे उल्लंघन केलेले आहे व आपण अशुद्ध लोकांच्या सहवासात राहतो. परंतु प्रभूच्या स्पर्शाने त्याची मलीनता धुतली गेली. "मी आहे, घाबरू नको.” या कनवाळू पित्याच्या वाणीने यशयाला स्फुर्ती मिळाली. येशूच्या शिष्यांना देखील अपमान, छळ, तिरस्कार, भीती अपेक्षित होती. येशू त्यांना आश्वासन देतो, “भिऊ नका, पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” सर्व पुरावे तुमच्या विरुद्ध गेले तरी सर्व गोष्टी परमेश्वर पित्याच्या नियंत्रणाखाली आहेत. प्रभू त्यांना एक अट देतो ती म्हणजे जर तुम्ही माझ्याशी व माझ्या शिकवणीशी एकनिष्ठ राहिलात तर तुम्ही खरे शिष्य म्हणून पृथ्वीवर झळकाल. बऱ्याचवेळा • मोठ्या उत्साहाने आपण एखादी गोष्ट सुरु करतो परंतु शेवट मात्र निराशेने होतो कारण आपली चिकाटी व एकनिष्ठता गळून पडते. आपण मध्येच सोडून देतो. येशूपासून प्रेरणा घेऊया व मोठ्या उत्साहाने कुठलाही गाजावजा न करता एखादी गोष्ट सुरु करावी व त्यांच्यात मन गुंतून ठेवावे म्हणून प्रयत्न करूया.

प्रार्थना :हे प्रभू येशू, देवराज्याच्या सुवार्तेची साक्ष योग्य रितीने देण्यासाठी आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.
  

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या