Marathi Bible Reading | 15th Sunday In Ordinary Time | 10th July 2022 |

सामान्यकाळातील १५ वा सप्ताह 

रविवार १० जुलै  २०२२

 " जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर."
  

(“पण माझा शेजारी कोण?”)

“शाश्वत जीवन प्राप्ती, "

. परमेश्वर देव आपला  निर्माणकर्ता आणि दयाळू पिता आहे. आपल्या जीवनाचे संरक्षण करून तो आपल्यावर अनंत प्रीति करीत असतो. म्हणूनच परमेशरावर प्रीति करणे व  त्याची प्रार्थना व आराधना करणे रास्त आहे.

प्रीति हा ख्रिस्ती माणसाचा सर्वात मोठा सद्गुण आहे, कारण स्वतः परमेश्वराने आपल्या अंतःकरणात प्रीतिचे बीज पेरलेले आहे, म्हणूनच देव व मानव यासंबंधाने प्रीति करणे गरजेचे आहे. ख्रिस्ताने शाश्वत जीवन प्राप्तीसाठी प्रातिची दुहेरी आज्ञा पाळायला सांगितले आहे. ती  म्हणजे परमेश्वरावरा, स्वतःवर तसेच इतरांवर सुद्धा प्रेम करावे. मानवी प्रेमाचा  हा उगम देवामधून झाला आहे. परमेश्वराने आपल्या जीवनात घडविला तोच अविष्कार आपण सुद्धा आपल्या जीवनात इतरांसाठी त्याग करुन घडवून आणायचा आहे, कारण प्रीति परोपकारी आहे!


✝️   
पहिले वाचन :अनुवाद ३०:१०-३४
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे वचन तर अगदी तुझ्याजवळ आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल.
मोशेने लोकांना म्हटले, “तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा आणि विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे संपूर्ण मनाने आणि संपूर्ण जिवाने वळलास तर असे होईल,
“ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही आणि ती तुझ्या अवाक्याबाहेर नाही, ती स्वर्गात नाही; आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हांला ऐकवील असे तुला म्हणावे लागणार नाही. ती समुद्रापलीकडे नाही; 'आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठीती कोण आणील आणि आम्हांला ती ऐकवील' असे तुला म्हणावे लागणार नाही. हे वचन तर तुझ्या अगदी जवळ, म्हणजे तुझ्या मुखात आणि तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६९:१४,१७, ३०-३१,३३-३४,३६- ३७
प्रतिसाद :हे पाहून दीन हर्ष करतील.

१ )मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल
 अशा समयी तुझी प्रार्थना करतो.
 हे देवा, तू आपल्या विपुल दयेला अनुसरून 
आणि आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या 
सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे;
आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझ्याकडे वळ.

२ )मी तर दीन आणि दुःखी आहे;
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला 
उच्चस्थानी नेऊन ठेवील. 
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन; 
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.

३) दीन हे पाहून हर्ष करतील; 
देवाचा शोध करणाऱ्यांनो, 
तुमच्या हृदयात नवजीवन येवो. 
कारण परमेश्वर गरजूंचे ऐकतो; 
बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो 
तुच्छ मानत नाही.

४) कारण देव सियोनेचे तारण करील, 
तो यहुदाची नगरे बांधील. 
सियोन त्यांच्या दासाच्या संततीचेही वतन होईल; 
ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.

दुसरे वाचन  कलस्सै १: १५-२०
वाचक:  पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“सर्व वस्तू ख्रिस्तामध्ये तयार केल्या आहेत आणि सर्व त्याच्यासाठी आहेत.

येशू ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे; कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले, दृश्य आणि अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे ख्रिस्तसभेचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता असावी आणि त्याच्या क्रुसावरील रक्ताच्याद्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः‍ पित्याला बरे वाटले. : बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                     योहान २०:२९
आलेलुया, आलेलुया !   
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात;
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १०:२५-३७
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“माझा शेजारी कोण ?"

कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” येशूने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे ? तुझ्या वाचनात काय आले आहे ?” त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर." येशूने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”
पंरतु स्वत:ला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर दिले “एक मनुष्य येरुशलेमहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला; त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले आणि त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, 'ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन.' तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला ?" तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, "जा, आणि तूही तसेच कर."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : देवप्रीतीला शेजारप्रीतीची जोड कशी द्यायची हे चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्याद्वारे येशूने आजच्या शुभवर्तमानात दाखवून दिलेले आहे. ह्या शुभवर्तमानात एकूण आठ पात्रे आहेत 
: येशू, श्रीमंत तरुण, शास्त्री, लुटारू, जखमी माणूस, याजक, लेवी आणि चांगला शोमरोनी. श्रीमंत तरुणाला सार्वकालिक जीवन हवे होते. परंतु त्याला पृथ्वीवरील ऐषारामी जीवनही हवेहवेसे वाटत होते. शास्र्याला नियमशास्त्राची माहिती होती. परंतु येशूला नियमशास्त्राचा गर्भितार्थ ठाऊक होता. तो त्याने चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातून स्पष्ट केला. सदर दाखल्यातील पात्रे तीन भागात विभागता येतील : 
अ. लुटारूः “तुझे ते माझे प्रवृत्तीचे प्रतिनिधी : लुटारूंनी त्या माणसाला लुटले, त्याला मार दिला आणि त्याला ते अर्धमेल्या अवस्थेत टाकून निघून गेले. जक्कय सारखा श्रीमंत जकातदारही लोकांना लुटत होता. येशूला भेटल्यानंतर तो आपली संपत्ती लोकांना वाटू लागला. 
ब. लेवी आणि याजक : 'माझे ते माझे प्रवृत्तीचे प्रतिनिधी : लेवी आणि याजक ह्यांनी त्या जखमी माणसाला पाहिले खरे परंतु “माझा कार्यक्रम, माझ्या योजना, माझा वेळ, माझी शक्ती” ह्याच चिंतेने ते ग्रासलेले असल्याने ते शेजारप्रीती करू शकले नाहीत. त्यांची देवप्रीती हे कोरडे कर्मकांड ठरले. शुभवर्तमानातील श्रीमंत तरुण ह्याच प्रवृत्तीचा बळी बनलेला होता. 
क. चांगला शोमरोनी : "माझे ते तुझे” ह्या प्रवृत्तीचे प्रतिनिधी : त्या चांगल्या शोमरोन्याला जखमी माणसाचा कळवळा आला. त्याने आपला वेळ, शक्ती, पैसा, जनावर, तेल, द्राक्षारस, उतार शाळेविषयीचे ज्ञान या सर्वांचा वापर त्या जखमी माणसासाठी केला. त्याने पहिल्या वाचनातील आज्ञेचा आणि दुसऱ्या वाचनातील ख्रिस्तकेंद्रित विचारसरणीचा खऱ्या अर्थाने अवलंब केला.

आत्मपरीक्षण : देवप्रीती व्यक्त करण्यासाठी मी माझ्या शेजाऱ्यासाठी काय काय करतो/ते?

प्रार्थना :हे प्रेमळ परमेश्वरा, माझ्या अंत:करणातील प्रेमाचा अंकूर विकसित  व्हावा आणि स्वतःवर तसेच इतरांवर प्रेम करण्यास मला प्रेरणा मिळावी म्हणून  मला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या