सामान्यकाळातील १५वा सप्ताह
सोमवार ११ जुलै २०२२
“जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो "
संत बेनेडिक्ट ह्यांच्या ज्ञानाची कीर्ती त्या काळात दिगंतापर्यंत पसरलेली होती. त्यामुळे महागुरू, मठाधिकारी, सरदार, राजे, राजपुत्र आणि सामान्य जनता आपल्या जीवनातील प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी या ज्ञानपिपासू व नीतिमान साधुपुरुषाकडे येत असत. त्यांच्या शांतचित्त, पवित्र, संयमी आणि समतोल विचारसरणीने थक्क होऊन जात. सार्वजनिक ठिकाणी ज्या व्यक्ती अधिकाराच्या जागी आहेत त्यांनी सामान्य जनतेमध्ये आपल्याविषयी धाक आणि भीती नव्हे तर प्रेम उत्पन्न करायला हवे असे त्यांना वाटे. गोरगरिबांना संत बेनेडिक्ट ह्यांच्याठायी एक सहानुभूती देणारा सत्पुरुष लाभलेला होता.
समाजातील सर्व थरातील लोकांचा आसरा आणि आश्रयदाता बनलेला ऋषीतुल्य संत बेनेडिक्ट २१ मार्च ५४७ रोजी हजारो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवून देवाघरी निघून गेला. मुख्य वेदीवरून पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारून आपले हात स्वर्गाकडे उंचावलेल्या अवस्थेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
चिंतन : प्रार्थनापूर्वक परिश्रम करा आणि परिश्रमपूर्वक प्रार्थना करा.• संत बेनेडिक्टचे ब्रीदवाक्य
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू त्याच्या सामर्थ्याशाली जीवनावर चिंतन करुन स्वीकार करण्यास आवाहन करीत आहे. आपण सर्वांनी ख्रिस्ती हे नाव धारण केले आहे. ख्रिस्ती म्हणजेच ख्रिस्ताचे अनुयायी. ख्रिस्ती म्हणजेच ख्रिस्तानुकरण करणारे. ख्रिस्ती म्हणजेच जीवनातील वधस्तंभ उचलून जीवन जगणारे. ख्रिस्ती म्हणजेच देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन समर्पित जीवन जगणारे, देवाच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन जगणारे असे ख्रिस्ती जीवन प्रभू येशूला अपेक्षित आहे. आपल्या जीवनातील सर्व संकटे, दु:खे, वेदना, आजार, अपयश, निराशा ह्यांचे क्रुस उचलून घेऊन ख्रिस्ताबरोबर चालू या. प्रभू येशू जीवनाच्या अंतिम क्षणी| आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक सुखात नेणारा आहे.
पहिले वाचन :यशया १:११-१७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन "तुम्ही स्वतःला निर्मळ करा, माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा."
सदोमच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका, परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे ? मेंढरांचे होम, पुष्ट वासंराची वपा यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल कोकरे आणि बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही."
तुम्ही माझे दर्शन घ्यायला येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बाथ आणि मेळे भरवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने आणि सण याचा द्वेष करतो; त्याचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणांला धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दृष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करायला शिका, नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा; अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५०:८-९,१६-१७,२९,२३
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला
मी तारण प्राप्त करून देईन.
१ )तुझ्या यज्ञांसंबंधाने तर मी तुला बोल लावीत नाही;
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच
तुझ्या घरचा गोन्हा किंवा तुझ्या
मेंढवाड्यातला बोकड मला घ्यावयाचा नाही.
२) दुर्जनाला तर देव म्हणतो:
माझे नियम जाहीर करणारा तू कोण ?
माझा करार आपल्या मुखात उच्चारणारा तू कोण ?
तू तर शिस्तीचा द्वेष करतोस,
माझी वचने मागे झुगारून देतोस.
३ )असे तू केले तरी उगा राहिलो,
मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले.
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो.
आणि जो सरळ मार्गाने चालतो
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास
आणि ते मनापासून पाळावयास मला शिकव.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १०:३४-११:१
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी शांतता आणण्यास आलो नाही तर तरवार चालवण्यास आलो आहे."
येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले, “मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो आहे असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवायला आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू ह्यांच्यात फूट पाडायला मी आलो आहे आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आणि आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही; ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील.
“जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल आणि ह्या • लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गा पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचित सांगतो." येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवायला आणि उपदेश करायला गेला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : येशूला स्वीकारणे, त्याचा प्रतिनिधी होणे हा विशेष हक्क जरी असला तरी ते धोक्याचे देखील आहे असे संकेत प्रभू येशू आपल्या शिष्यांना देतो. येशूवर निष्ठा ठेवल्याने केव्हा केव्हा घरात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी येशूवरील निष्ठेला अधिक प्राधान्य द्यायला हवे. येशूची शिकवणूक व मूल्ये ही जागतिकमूल्यांविरुद्ध आहेत. "मी सेवा करून घ्यावयास नये तर सेवा करावयास आलो आहे." (मत्तय २०:२८) येशूशी असलेली आपली एकनिष्ठा इतर व्यक्ती व गोष्टी, किंबहुना स्वतःच्या जिवापेक्षाही महत्त्वाची आहे. येशूबरोबर कुसाची वाट चालण्यास एखादी व्यक्ती तयार असेल तर तिला त्याचे सामर्थ्यही दिले जाईल. येशूने आपल्या उपदेशाचा शेवट हा त्याने दिलेल्या शाश्वतीने होत आहे. शिष्य हा नेहमीच येशूचा प्रतिनिधी राहील व शिष्याला दिलेली चांगली वागणूक ही येशूलाच दिलेली वागणूक समजली जाईल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्वस्व समर्पित करुन तुला स्वीकारण्यास व तुझे अनुकरण करण्यास मला धैर्य व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या