Marathi Bible Reading | Tuesday 12th July 2022 | 15th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १५वा  सप्ताह 

मंगळवार १२ जुलै २०२२

“न्यायाच्या दिवशी सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल.'




संत जॉन गोल्बर्ट 

मठाधिकारी, वर्तनसाक्षी (९८५-१०७३)


परमेश्वराने घडविलेली अनेक अद्भूत कृत्ये देवाच्या प्रजेने प्रत्यक्ष अनुभवली होती, याची नोंद बायबलमध्ये आहे. परमेश्वराच्या तारणकार्य योजनेतील महत्त्वाचे अद्भूत रहस्य म्हणजेच त्याचा एकूलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे देहधारण  येशू ख्रिस्ताने मानवांच्या तारणासाठी स्वतःला समर्पित केले. त्याने केलेले  चमत्कार आणि अद्भूत कृत्ये प्रत्यक्ष लोकांनी पाहिली आणि अनुभवली, तरी पण दुष्टतेच्या बेड्या पायात अडकून पडल्यामुळे अनेकांना त्याच्या कृपेचा वरदहस्त लाभत नाही.

 प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या पापासाठी वधस्तंभी खिळला गेला. त्याच  प्रभू येशू ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मरणात आपण बाप्तिस्मा घेतला असून आपण ह्यापूढे पापाला मेलो आहोत (रोमकरांस पत्र ५:१४). आपल्या पापांबद्धल क्षमेचे वरदान देऊन प्रभू येशू आपला देवाबरोबर व बंधु-भगिनींबरोबर समेट घडवून आणित असतो. देवाच्या कृपेत व प्रेमात जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त वारंवार आपल्या पापांबद्धल पश्चाताप करण्यासाठी आवाहन करीत आहे. आज आपण त्या दयाधना प्रभू जवळ जाऊन पश्चातापी अंक:करणाने आपल्या सर्व पापंबद्धल क्षमा मागू या.


पहिले वाचन :यशया ७:१-९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"तुम्ही भाव ठेवला नाही, तर तुमचा निभाव लागणार नाही. "

यहुदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जिया याच्या काळी असे झाले की, अरामचा राजा रसीन अणि इस्राएलचा राजा पेकह बिन रमाल्या हे येरुशलेम बरोबर लढायला चढाई करून गेले; परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. “अरामची एफ्राइमशी जूट झाली आहे." असे दावीदच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे त्याचे मन आणि त्याच्या लोकांची मने कंपित झाली.
तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, "तू आपला पुत्र शआरयाशूब (अवशेष परत येईल) याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजला भेटावयास जा आणि त्याला सांग की, 'सावध हो आणि शांत राहा, भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणाऱ्या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन आणि रमाल्याचा पुत्र याच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस.' अराम, एफ्राईम आणि रमाल्याचा पुत्र यांनी तुझ्याविरूद्ध दुष्ट संकल्प केला आहे की, “आपण यहुदावर चालून जाऊन त्यांस धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू, " प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सफळ व्हावयाचे नाही, हे घडावयाचे नाही. अरामचे शीर दिमिष्क आणि दिमिष्कचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राइम भंग पावेल आणि त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही) एफ्राईमचे शीर शोमरोन आणि शोमरोनचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवला नाही, तर तुमचा निभाव लागणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४८:२-८
प्रतिसाद :  "देव त्याचे नगर सर्वकाळ स्थिर राखील."

१ परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, 
त्याच्या पवित्र पर्वतावर,
तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे; 
उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे.

२)उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, 
राजाधिराजाचे नगर ! 
देव त्याच्या प्रासादांमध्ये
आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.


३ )कारण पाहा, राजे एकत्र झाले 
आणि एकजुटीने चढाई करून आले. 
हे नगर पाहताच ते विस्मित झाले 
आणि घाबरे होऊन पळत सुटले.

४ )तेथे त्यांना कंप सुटला;
त्यांना प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या.
पूर्वेच्या वाऱ्यांने तार्शिशची गलबते तू. फोडतोस.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास 
माझे अंतःकरण वळव 
आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ११:२०-२४
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
“न्यायाच्या दिवशी सोर, सिदोन आणि सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल. "

ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती. तेथील लोकांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूम, तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय? नव्हे अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमाला तुझ्यापेक्षा सोपे जाईल.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : देवाची योजना व माणसाची इच्छा यामध्ये सतत संघर्ष चाललेला असतो. माणसाने जर देवाच्या योजनेला होकार दिला तर देव त्याला आशीर्वाद देतो. जर तो देवाच्या इच्छेविरुद्ध गेला तर जीवनात अपयश व दुःख येत असते. इस्रायलचा राजा येरुसलेमवर हल्ला करण्यासाठी सिरीयाच्या राजाला सामोरी गेला. अशावेळी परमेश्वर देव आहाज राजाला संदेष्टा यशयाद्वारे असा संदेश देतो की, जर तू माझ्याबरोबर उभा असशील म्हणजे माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवशील तर तुझे मी संरक्षण करीन. खोराजीन, बैथसैदा व कफर्णहुम या शहराविषयी येशूने व्यक्त केलेला राग व त्यांनी पश्चात्ताप करण्यास दिलेला नकार आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो. येशूने केलेले अद्भूत चमत्कार व कार्ये गालीलभर पसरले होते. येशूचे कार्य हे देवाचे कार्य होते तरीसुद्धा या शहरांनी सरळसरळ त्यांचा धिक्कार केलेला होता. माणसांच्या कठोरपणामुळे सुद्धा अनेकदा | आपण देवाच्या शिकवणुकीचा स्वीकार करीत  नाही. माझ्यासाठी देवाची योजना काय आहे हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न करतो का ?

प्रार्थना : हे आमच्या स्वर्गीय पित्या, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला प्रलोभनात पडू देऊ नकोस, तर सर्व प्रकारच्या पापापासून आम्हाला सोडव, आमेन.
  

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या