सामान्यकाळातील १५वा सप्ताह
बुधवार १३ जुलै २०२२
“पुत्रावाचून पित्याला कोणी ओळखीत नाही."
संत हेन्री दुसरा
सम्राट, वर्तनसाक्षी (९७३-१०२४)
आज प्रभू येशू प्रामुख्याने तीन महत्त्वाची सत्ये समजावून सांगत आहे.
पहिले म्हणजे ज्ञानी नव्हे तर साध्या, भोळ्या आणि नम्रवृत्तीच्या माणसांनाच देवाच्या शहाणपणाचा आणि सत्याचा उलगडा होत असतो.
दुसरे सत्य म्हणजे प्रकटीकरण पित्या परमेश्वराने केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच केलेले आहे आणि सर्व अद्भूत कृत्ये करण्याचे सामर्थ्य येशूलाच देण्यात आले आहे.
तिसरे सत्य म्हणजेच त्याची इच्छा असणाऱ्या निवडलेल्यांनाच देवाचे प्रकटीकरण होत असते. आपण आज प्रभू येशूने दिलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन करु या.
पहिले वाचन :यशया १०:५-७,१३-१६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन सोटाआपणास हाती धरणाऱ्याला गरगर फिरवी ल काय?
परमेश्वर म्हणतो, “जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या असिरियाचा धिक्कार असो. मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधाला पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मालमत्तेचा अपहार करावा आणि त्यांना रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबधाने त्यांना आज्ञा करीन. तथापि त्याचा विचार काही असा नाही; त्यांच्या मनाचा समज असा नाही, कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे."
परमेश्वर म्हणतो, “माझ्याच बाहुबलाने आणि माझ्या स्वतःच्या अकलेने हे मी केले आहे, मी चतुर आहे; मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत आणि त्यांची भांडारे लुटली आहेत; बलाढ्य वीराप्रमाणे मी तक्तांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे. पक्ष्यांच्या कोटराप्रमाणे राष्ट्राचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडावले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केले नाही."
कुऱ्हाडीने तोडणाऱ्यापुढे कुऱ्हाड घमेंड करील काय? करवत, आपणाला चालवणाऱ्या पुढे, आढ्यता मिरवील काय? सोट्याने, आपणास हाती धरणाऱ्याला गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतराला उचलावे तसा मी आहे. यास्तव प्रभो, सेनाधीश प्रभो, त्याच्या पुष्ट जणांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९४:५-६, ७-८, ९-१०,१४-१५
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.
१ )हे परमेश्वरा,
ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात.
तुझ्या वतनाला पीडतात.
ते विधवा आणि उपरी ह्यांचा जीव घेतात,
अनाथांना ठार मारतात.
२) ते म्हणतात, “परमेश्वर पाहत नाही,
याकोबचा देव लक्ष देत नाही.”
अहो, पशुतुल्य लोकहो, लक्ष द्या;
मूर्खानो, तुम्ही कधी शहाणे व्हाल ?
३) ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय ?
ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय ?
जो राष्ट्रांचा शास्ता, मानवांचा ज्ञानदाता,
तो शासन करणार नाही काय ?
४ )कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही;
तो आपले वतन सोडून देणार नाही.
न्याय नीतिमानाकडे वळेल आणि
सरळ मनाचे सर्व जन त्याला अनुसरतील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे,
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ११:२५-२७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्ञानी लोकांपासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रकट केल्या."
येशू बोलू लागला: “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या; खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : बुद्धीमान माणसं आणि शहाणी माणसं हे दोन वेगवेगळे शब्द प्रयोग आपल्या परिचयाचे आहेत. काही लोक ही जन्मतःच बुद्धीमान असतात. मात्र माणसामध्ये शहाणपणा दिसून येण्यासाठी अनुभव व व्यावहारिक ज्ञान हे फायदेशीर ठरते. आपण कितीही हुशार असलो तरीही देवाविषयी ज्ञान हे सहजा सहजी प्राप्त होत नसते. त्यासाठी आपले देवाबरोबर कशाप्रकारचे नाते आहे हे पाहिले जाते. प्रभू येशू आपल्या पित्याबरोबर एकनिष्ठ राहिला होता. देवाचे प्रकटीकरण हे एक रहस्यमय योजना आहे. देवाचे प्रकटीकरण किंवा ज्ञान अवगत करण्यासाठी आपल्यामध्ये साधेपणा व नम्रवृत्ती असावी लागते. येशू आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे की, “ज्ञानी (हुशार) आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेऊन तू बाळकांस प्रकट केल्या.” लहान बाळके ही देवावर सर्वस्वी अवलंबून असतात. ते स्वतःला देवावर सोपवून देतात. निरागसवृत्ती, नम्रपणा, साधेपणा, दुसऱ्याचा स्वीकार करण्याची वृत्ती देवाविषयी प्रकटीकरण अवगत करण्यासाठी नेहमी साहाय्यक ठरते. माझ्याठायी लहान मुलांप्रमाणे गुण दिसून येतात का ?
प्रार्थना : हे प्रभो, नम्रतेने व प्रामाणिकपणे तुला ओळखण्यास व खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या